माझे शेल्फ
जॅपनीज ऑर्किड
जेनेटिक संशोधन क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. विज्ञानाच्या रहस्याची उकल करण्यात वर्षानुवर्षे स्वत:ला झोकून देणाऱ्या संशोधकांचे स्वत:चेही एक विश्व असते. अशाच एका जेनेटिक शास्त्रात निष्ठेने काम करणाऱ्या तेत्युयोच्या वयाच्या उत्तरार्धात आलेली संकटमालिका जॅपनीज ऑर्किड’ या कादंबरीत वाचायला मिळते. भूतकाळातली भूतं त्याला त्रस्त करतात. त्याच्या आईविषयी काही खासगी गोष्टी माहित असल्याचे धमक्यांचे मेल येताहेत. आजवरची प्रतिष्ठा, लौकिक उधळून लावण्याचा समोरच्याचा डाव त्याला अस्वस्थ करतो. व्यवसायाने वकील असलेल्या मित्राला तो गतकाळातल्या अशा घटनेचा छडा लावण्याबद्दल सांगतो. त्यातून सुरू झालेले घटनाक्रम आणि समोर येणाऱ्या व्यक्तिरेखा यांचा सुरेख संगम या कथेत वाचायला मिळतो. ‘जॅपनीज ऑर्किड’ ही तेत्सुयो आर्किनचो या लौकिकप्राप्त धनाढ्य वैज्ञानिकाची गोष्ट. त्याच्या जन्माच्या वेळीच आई स्वर्गवासी झालेली असते. आता इतक्या वर्षांनी तिच्याबद्दल कुणाला अशी काय माहिती आहे ज्यामुळे तेत्सुयो कष्टित होतो? हे वाचताना जपानी लोकांबद्दल जपानी लेखिकेकडूनच बरंच काही समजतं. जपानी लोक काम अगदी निष्ठेने करतात. सेवा देण्यात कुचराई करत नाहीत. जपानी टॅक्सी ड्रायव्हर, नोकर, वेटर तुम्हाला उत्तम सेवा देतात पण दिलेली बक्षिसीही नम्रपणे नाकारतात. न्यूयॉर्क, टोकियो, सिंगापूर ही या कथेतील महत्त्वाची स्थळं. जिमी, पॉल, मायुमी, अकिरा, सॅण्ड्रा या पात्रांची कामगिरी. अशा साखळीने ‘जॅपनीज ऑर्किड’ वाचावे लागते. सॅड्राने उघड केलेले रहस्य वाचून वाचक अंतर्मुख होतो. लेखिकेच्या मते ‘दु:ख हे एकटं असतं तेव्हा ते बिकट प्रश्न घेऊन समोर येतं. तेव्हा त्याला तोंड देण्यासाठी एकट्यानेच सामोरं जावं लागतं. दुसरं कुणीही तुमच्यावर कितीही प्रेम करत असलं तरी तुमचं दु:ख तुम्हालाच सोसावं लागतं. दु:ख हे मृत्यूसारखंच अगदी वैयक्तिक असतं. ते एकट्यालाच सहन करावं लागतं. ‘जॅपनीज ऑर्किड’ ही एक अनुवादित कादंबरी आहे. याच्या मूळ लेखिका आहेत रेई किमुरा आणि अनुवादक आहेत स्नेहल जोशी. मूळ जपानी लेखनातला आशय अनुवादिकेने भारतीय पद्धतीत बेमालूम मिसळला आहे. भाषा सोपी आणि ओघवती आहे. वाचताना पुढे काय असेल याची उत्कंठा वाटते. डीएनएवर संशोधन करून नाव मिळवलेल्या वैज्ञानिकालाच त्याच्या जन्माची काहणी समजून घेण्यासाठी जंग जंग पछाडावे लागते ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे.