मुखपृष्ठ
झुबेदा

माझे शेल्फ

झुबेदा

इंग्रजी शीर्षक
Zubeda
सारांश

झुबेदाच्या आत्मशोधाची व्यामिश्र कहाणी... झुबेदा बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची कामगिरी केलेल्या, एका लब्धप्रतिष्ठित जोडप्याची दत्तक मुलगी. आपल्या जन्मदात्यांची पाळेमुळे जाणून घेण्याचा पराकोटीचा ध्यास घेऊन आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेल्याझुबेदाची ही कहाणी. झुबेदाची हार्वर्ड युनिव्हर्सिटीत जीवशास्त्राचे शिक्षण घेताना मुक्त जीवनशैलीशी ओळख होते. इथेच तिची एलिजाशी गाठ पडते. तिच्या प्राणप्रिय एलिजाला, तिच्या या आत्मशोधाच्या प्रवासाची कहाणी तिने ‘द बोन्स ऑफ ग्रेस’ या प्रदीर्घ पत्रातून सांगितली आहे. या प्रदीर्घ पत्राचा मराठीत अनुवाद केला आहे. सरिता आठवले यांनी. मराठी अनुवादाचं शीर्षक आहे ‘झुबेदा’. झुबेदाच्या या पत्रकहाणीत एक व्हेल, एक जहाज, एक पियानो, भरकटलेला पण भानावर आलेला प्रियकर आणि त्याची हतबल झालेली प्रेयसी यांच्या व्यथांचाही गुंता आहे. अमेरिकेची आधुनिक आणि बांगलादेशाची परंपरावादी संस्कृती यांच्या संघर्षात भांबावून गेलेल्या प्रतिष्ठित घराण्यातील दत्तक मुलगी असलेल्या झुबेदाला एलिजाच्या संपन्न अमेरिकन वंशवृक्षाचे अप्रूप वाटते. शिक्षणाच्या दरम्यान तिला पाकिस्तानात एका जीवश्माच्या उत्खननाची संधी मिळते. काही अकल्पित घटनांमुळे हे उत्खनन अर्धवट टाकून तिला मायदेशी परतावे लागते. या अयशस्वी मोहिमेनंतरच्या निराश मन:स्थितीत कुटुंबाच्या दबावाखाली ती बालमित्राशी - रशीदशी लग्न करते. या सगळ्या घडामोडींमुळे तिचे खरेखुरे प्रेम तिला विसरून जावे लागते. पण स्वत:चे वादग्रस्त जन्मरहस्य उलगडताना सासरच्या ख्यातनाम घराण्याची प्रतिष्ठाही तिला पारखी होते. घरच्या भुकेल्या तोंडात चार घास घालण्यासाठी, नौकाविखंडनाचे खडतर, प्रसंगी जिवावर बेतणारे काम, नाइलाजाने पत्करणाऱ्या अशिक्षित मजुरांपैकी अन्वर, अचानकच झुबेदाच्या जीवनात येऊन ठेपतो आणि तोच तिच्या घराण्याचा शोध घेण्यात महत्त्वाचा दुवा ठरतो. पण नशिबाच्या फेऱ्यात सगळेच अडकतात. झुबेदा,रशीद, एलिजा, अन्वर, मी आणि शौना. झुबेदाच्या जन्मरहस्याच्या धाग्यादोऱ्याची गुंफण म्हणजे ‘द बोन्स ऑफ ग्रेस.’ ग्रेस हे पंचतारांकित जहाज व झुबेदाचे सुखवस्तू आणि प्रतिष्ठित आयुष्य यांच्यातील साम्यस्थळे तहमिमा अनमच्या रचनाकौशल्याने, प्रकर्षाने जाणवतात. कॅप्टनची आत्महत्या आणि जहाजावर झालेला साथीच्या रोगाचा उद्रेक यामुळे ग्रेसला विखंडनाच्या निर्णयाला सामोरे जावे लागते. दिमाखदार ग्रेसचे वैभव दर दिवसागणिक ओरबाडले जात असताना अमेरिका आणि बांगलादेशातील सांस्कृतिक तफावत झुबेदाला न परतीच्या एकाकी वाटेवर नेऊन सोडते. झुबेदा, एलिजाविषयी वाटणाऱ्या वेड्या प्रेमात स्वत:ला झोकून देते आणि आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या शोधात एलिजाचे भावुक प्रेम आणि रशीदची जन्मभराची साथही गमावते.कादंबरीच्या भाषेचा आत्मकेंद्रित स्वर नायिकेच्या चढेल व्यक्तिमत्वाशी सुसंगत वाटतो आणि त्यामुळेच तिच्या जन्मदात्रीच्या, जुळ्या बहिणीच्या व बहिणीच्या प्रियकराच्या अन्वरच्या विकल आयुष्यांची कहाणीही अधिकच भेसूर वाटू लागते. अमेरिकेतील मुक्तजीवन, आशियातील दहशतवाद आणि बांगलादेशातील सामाजिक असमतोलाचे यथार्थ वर्णन करण्यात तहमिमा अनम कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. कादंबरीची कथा उलगडत जाताना, पेरलेले अनेक धागेदोरे शेवटी सुसूत्रपणे गुंफण्याचे अप्रतिम कौशल्य लेखिकेला साधले आहे. चार सहा वाक्यात सामावलेल्या या कथावस्तूचा व्यापक आविष्कार तहमिमा अनमच्या भाषेच्या सक्षम हाताळणीने नटला आहे. त्यामुळेच ‘द बोन्स ऑफ ग्रेस’ अर्थात ‘झुबेदा’ ही प्रदीर्घ कादंबरी वाचनीय ठरते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद