मुखपृष्ठ
काळोखाचे थेंब

माझे शेल्फ

काळोखाचे थेंब

इंग्रजी शीर्षक
Kalokhache Themb
सारांश

१९६७ ते १९७१ या काळात लिहिल्या गेलेल्या या कथा ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘राजस’, ‘किर्लोस्कर’, ‘नवयुग’, ‘युगवाणी’, ‘मनोहर’ या त्या वेळच्या नव्या वाटेवरच्या साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नियतकालिकांत प्रसिद्धही झाल्या आहेत. विशेष हे मानायला हवे, की इतक्यावर्षांनंतरही त्या कालबाह्य वाटत नाहीत. आज भूतलावर सगळ्यात सामर्थ्यवान कोण असेल तर माणूस. त्याची विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची शक्ती, त्याची बुद्धी, नवनवीन शोधांची त्याची लालसा यामुळे त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालंय असं म्हटलं जातं. बुद्धीच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही करू शकतो असं माणसालाही वाटत असतं. पण प्रत्यक्षात हे खरं आहे का? निसर्गापुढे माणूस किती थिटा आहे हे तर आपण अनुभवतोच आहोत आणि तसंही या विश्वाच्या पसाऱ्यात एक व्यक्ती म्हणजे कुणीच नाही. जणू काळोखाचा थेंब. आपले अस्तित्व किती नगण्य आहे हे जेव्हा आणि ज्यांच्या लक्षात येते त्यांना जगण्यातला फोलपणा जाणवतो. पण आयुष्याची आसक्ती इतकी मोठी असते, की परिस्थितीवर मात करत जगायचा प्रयत्न प्रत्येक जणच करतो. काही त्यात यश मिळवतात. बाकीचे हातपाय मारत धडपड करत राहतात. या कथासंग्रहात अशाच व्यक्तीरेखा वाचकांना भेटत राहतात. ‘लाक्षागृहा’मधल्या शाळकरी सदूचे भावविश्व अशा घटनेने ढवळून निघते की ज्याचा त्याच्याशी प्रत्यक्षात काहीच संबंध नाही. पण तरीही काही नकोशा गोष्टींचा तो साक्षीदार होतो. ‘संध्याछाया’ ही अगदी परस्परविरोधी स्वभावाच्या दोन वृद्ध स्त्रियांची कथा सांगते. त्यातली एक परावलंबी आयुष्य पसंत करणारी, तर दुसरी हट्टाने स्वत:चे स्वातंत्र जपणारी. ‘काळोखाचे थेंब’ कथेची मांडणी वेगळीच आहे. नंदिनी आणि माधव यांचा एकमेकांचा अंदाज घेत बोलणे, प्रतिक्रीया देणे हे दुसऱ्यावर मात करण्यासाठी आहे. यातली तिसरी व्यक्तीरेखा अविनाश ही या दोघांच्या बोलण्यातून ‘दिसत’ राहते. या गोष्टीचा शेवट होतो तो नंदिनीसाठी जसा अकल्पित आहे तसा वाचकांसाठीही. ‘ट्याहा’ ही कथाही तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. यातल्या काही कथा गूढ वळणावरच्याही आहेत. ‘अंधाराच्या अरण्यात’मधला विश्वनाथ, ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’, ‘निर्जन किनारी’मधली ‘ती’ कथा संपल्यावरही लक्षात राहतात. माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याच्या व्यक्त अव्यक्त भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न लेखकाने ‘भोवळ’, ‘महारोगी’, ‘मन माळरान’, ‘कॅसिनो’ या कथात केला आहे. उदाहरणार्थ, ‘मन माळरान’मधला लेखक लेखनाच्या अनुभूतीचा, जीवनाच्या अस्सलतेचा साक्षात्कार घडतानाचा अनुभव सांगताना म्हणतो, ‘निर्लेप, निर्विकार व्हायचं, मरायचं मनात, कुठल्या तरी क्षणी ते जमेल क्वचित. पण तो क्षणच असायचा अनंताचा कण, इंद्रिय संवेदनांच्या पलीकडील अवकाशाचं ओझरतं दर्शन. देठ तोडून ओंजळीत घेतलेल्या कमलाप्रमाणे दिसायचं विश्व आपल्याला सामावून घेऊनही आपल्यापासून तुटलेलं.’ पुस्तकातल्या दोन अनुवादित कथांचाही उल्लेख करायलाच हवा. यातली पहिली आहे ती जेम्स जोइसची ‘द डेड’. त्यात गूढ छटा आहे. दुसरी त्याहूनही महत्त्वाची आहे ती ‘त्रयस्थ’. आंद्रेई सिन्यावस्की यांच्या मूळ कथेवर आधारलेली. ही कथा म्हणजे राजकीय रूपक आहे. त्याचबरोबर कलावंताना वाटणरी परकेपणाची, त्रयस्थपणाची भावनाही यात खूप प्रभावी पद्धतीने मांडली गेली आहे. त्यामुळेच एका बाजूला शहारा उमटवत असतानाच बराच काळ ती मनात रेंगाळत राहते. लेखकाची भाषा रुपकात्मक आहे. ‘उसळी मारून वर येताना अचानक डोह संपावा तशी झोप संपली’ अशी वाक्ये ते सहजपणे लिहून जातात. या कथा वर्णनात्मक जास्त आहेत. गाव, रस्ते, समुद्र, व्यक्ती यांची बारकाईने, तपशिलात जाऊन केलेली वर्णने आहेत. त्यामुळे तो तपशील डोळ्यांसमोर उभा राहायला मदत होते. त्यांच्या व्यक्तिरेखाही मोजक्या शब्दांत ठसठशीतपणे उभ्या राहतात. उदाहरणार्थ, ‘द रनिंग म्यान’मधली अनघा किंवा ‘लाक्षागृह’मधला विठ्ठल. अगदी ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’ आणि ‘संध्याछाया’मधल्या काकूही. आजार, पैशाची वानवा, अशांत मन, एकटेपणा यापैकी एका किंवा अनेक गोष्टींचा सामना करणारी ही सगळी माणसे. पण मग तरीही आयुष्याला बांधून ठेवणारा कुठला धागा असतो जो यांना तगवून ठेवतो? या कथांतला माणूस धडपडत, ठेचकाळत, जखमी होत का होईना पण जगत राहतो. परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करत राहतो. त्याचे माणूसपण टिकवायचा प्रयत्न करत राहतो. अशा आपल्या आजूबाजूच्या, किंबहुना आपल्यातल्याच सामान्य माणसांच्या या कथा आहेत. वाचकाला अस्वस्थ करणे हा चांगल्या लेखनाचा निकष मानला जातो. हा कथासंग्रह त्यावर खरा उतरतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद