माझे शेल्फ
कॅच मी इफ यू कॅन
प्रख्यात दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेला ‘कॅच मी इफ यू कॅन’ हा चित्रपट बघून ज्योत्सना लेले यांनी तो चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे, ते पुस्तक मिळवून वाचून काढले. ते पुस्तकही त्यांना आवडले. ते मराठीत आणायला हवे असे त्यांना वाटे. कारण वयाच्या १६ ते २१ वर्षाच्या दरम्यान एका देखण्या तरुणाने खोटे चेक देऊन जगभराच्या बँकांना लुबाडण्याच्या भामटेगिरीतले त्या पुस्तकातील एकाहून एक अफलातून किस्से हे केवळ कल्पनेने रंगवलेले नव्हते तर ते प्रत्यक्षात घडलेले होते आणि तेही भामटेगिरी करणाऱ्या फ्रँक अबॅग्नेल याने स्वत:च लिहून काढलेले होते. १९८० साली फ्रँकचे ‘कॅच मी इफ यू कॅन’ हे पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले. त्यावेळी फ्रँक बत्तीस वर्षांचा होता, आणि त्याने गुन्हेगारी सोडून अमेरिकेतील एफबीआय या केंद्रीय गुन्हा अन्वेषण संस्थेशी सहकार्य करून आर्थिक क्षेत्रातील अनेक गैरव्यवहारांचा बीमोड केलेला होता. अनेक बँकांमधील लबाडीच्या तसेच फसवणुकीच्या घटनांचा छडा लावून जगातील एक अग्रगण्य कॉन्फिडन्स मॅन म्हणून त्याने लौकिक मिळवलेला असतो. चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात, या उक्तीप्रमाणे फ्रँकने पाच वर्षाच्या आपल्या गुन्हेगारीच्या जीवनाचा त्याग करून, गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आपले उत्तरायुष्य सार्थकी लावले. अमेरिकेतील न्यायखात्याचेही कौतुक करायला हवे कारण आर्थिक गुन्हे सफाईने करणाऱ्या फ्रँकला जन्मठेपेची वा तत्सम शिक्षा देऊन कारावासात डांबून ठेवण्याऐवजी अमेरिकन लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला विनामोबदला मदत करण्याच्या अटीवर त्याला मुक्त केले आणि त्याच्या या क्षेत्रातील बुद्धिमत्तेचा आणि प्राविण्याचा उपयोग देशहितासाठी करून घेण्याचे धोरण राबवले. सोळाव्या वर्षापर्यंत फ्रँकचे जीवन एखाद्या मध्मयवर्गीय कुटुंबातील मुलाप्रमाणेच गेले. न्यूयॉर्कमधील ब्रांक्सव्हिल भागातील एका सुखवस्तू ज्यु कुटुंबात फ्रँकचा जन्म झाला. वडील दुसऱ्या महायुद्धात सैन्यदलात होते. युद्ध संपल्यावर ग्रामर्सीज नावाचे स्टेशनरी दुकान ते चालवत. राजकारण, क्रीडा क्षेत्र यातही ते सक्रिय होते. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा दबदबा होता. खोल पाण्यातल्या समुद्रातले मासे पकडण्याचा छंद त्यांना होता. त्यासाठी ते मासेमारी मोहिमेवर अधूनमधून जात. २८ व्या वर्षी त्यांनी पॉलेट या पंधरा वर्षे वयाच्या सुंदर तरुणीशी लग्न केले. या दांपत्याला ४ मुले झाली. फ्रँक हा चार भावंडामधला तिसरा मुलगा. फ्रँक बारा वर्षाचा असताना आईने मुलांसह नवऱ्याचे घर सोडले आणि ब्राँक्स डेंटल कॉलेजमध्ये टेक्निशियनच्या कोर्ससाठी नाव घातले. फ्रँकच्या वडिलांचे बायकोवर प्रेम होते. त्यांनी खूप मनधरणी केली, मुलांच्या मार्फत रदबदली केली. पण फ्रँकच्या आईने दाद दिली नाही. फ्रँक १४ वर्षांचा असताना आई-वडील यांचा घटस्फोट झाला. फ्रँक वडिलांबरोबर राहू लागला. वडिलांचे मित्र हे उच्च स्तरातील असल्याने फ्रँकला शेअर ब्रोकर्स, काँट्रॅक्टर्स, उद्योगपती, कामगार नेते, ट्रकचालक वगैरेंचे जीवन बघायला मिळाले. तो चलाख होता. शाळेच्या अभ्यासापेक्षा वाह्यात मित्रांबरोबर तो कँडी चोरणे, सिनेमागृहात तिकीटाशिवाय घुसणे, गाड्या चोरणे असले धंदे करायला लागला. पोलिसांनी त्याला पकडले. वडिलांनी त्याला सोडवले. त्याच्या चोरीतल्या सहभागाचा पुरावाही खोडून टाकायला लावला. फ्रँकला हे प्रकरण जादूच्या कांडीसारखे वाटले. वडील त्याला न रागावता म्हणाले, ‘‘चुका सर्वांच्याच हातून होतात, तू काय काय भानगडी करतोस ते मला ठाऊक आहे. पण या गोष्टी अशा प्रकारे करायच्या नसतात. कायद्याच्या दृष्टीने तू अजून बच्चा आहेस, पण तू दिसतोस प्रौढ तेव्हा तू आता प्रौढ व्यक्तीप्रमाणे विचार करायला शिक. लहान मुलासारख्या खोड्या करण्यात वेळ घालवू नकोस.’’ त्यावेळी फ्रँक फक्त १५ वर्षांचा होता पण तो ६ फूट उंच होता. १७० पौंड वजन होते. दांडगा, दणकट होता. शिक्षकही त्याला टरकून असत. वडिलांच्या बोलण्यामुळे तो प्रौढाप्रमाणे वागू लागला. बाँक्सव्हिलच्या गोदामात अर्धवेळ नोकरी करू लागला. त्यामुळे खुश होऊन वडिलांनी त्याला एक जुनी फोर्ड कार घेऊन दिली.या कारमुळे फ्रँकला भलताच चेव आला. पोरींना गटवण्यात तो तरबेज झाला. पोरींना फिरवण्यात त्याला मजा वाटू लागली. पेट्रोलसाठी वडीलांकडे पैसे मागणे भाग पडे. तेव्हा तो एकदा म्हणाला, ‘‘मला एक गॅस क्रेडिट कार्ड घेऊन द्या. तुमच्याकडे सारखे पैसे मागण्याचा संकोच वाटतो. शाळा, खेळ, जेवण, डेटिंग, पेट्रोल याला तुम्ही देता तो पॉकेटमनी कमी पडतो. गॅसकार्ड दिलेत तर पैसे मी भरीन.’’ वडील त्याला आपले स्वत:चे मोबिल गॅसचे कार्ड देतात. ‘हे कार्ड वापर... त्याचे दरमहाचे बिल मात्र भरायची काळजी घे. तुझ्यावर माझा विश्वास आहे.’ पहिल्याच महिन्यातले मोलिब गॅसचे बिल भरल्यावर फ्रँक कफल्लक झाला.