मुखपृष्ठ
कॅलिस्टो

माझे शेल्फ

कॅलिस्टो

इंग्रजी शीर्षक
Callisto
सारांश

खिळवून ठेवणारं रहस्य... ‘कॅलिस्टो’ ही अमेरिकेतील एका निर्जन प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील अनुवादित मराठी कादंबरी. विलक्षण रहस्यमय आणि तितकीच रंजक. एकामागोमाग एक अनपेक्षित घटना कशा घडत जातात आणि त्यातून ओडेल डीफस या तेवीस वर्षांच्या निग्रोसारख्या दिसणा्या देखण्या, उंच, धिप्पाड आणि बेरोजगार असलेल्या अमेरिकन तरुणाचं आयुष्य वाऱ्याच्या वेगाप्रमाणे कसं भरकटत जातं याची ही विलक्षण गुंतागुंतीची उत्कंठामय कथा... प्रसिद्ध पाश्चात्त्य कादंबरीकार टोस्र्टन क्रोल यांनी लिहिलेल्या या जाडजूड कादंबरीचा मराठी अनुवाद उज्ज्वला गोखले यांनी अतिशय साध्या, सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत केला आहे की, आपण परकीय कादंबरीचा अनुवाद वाचत आहोत असं वाचकांना वाटणारही नाही. यातील नायक ओडेल डीफस आत्मनिवेदनातून ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीने आपली कहाणी सलग सांगतो. मुळात तो राकट असला तरी अतिशय संवेदनशील आहे. जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी विनोदी, खेळकर आणि बिनधास्त आहे. तो फारसा शिकलेला नाही. अमेरिकन सैन्यात भरती होऊन इराकशी चाललेल्या युद्धात दहशतवादी कट्टरपंथी मुस्लिमांचा बदला घ्यावा या भावनेने तो पछाडलेला असला, तरी आपल्या नोकरीचा प्रश्न सुटेल हा त्यामागचा खरा हेतू असतो. तो लष्करी भरतीसाठी कॅलिस्टो येथे जायला निघतो. त्या प्रवासात त्याची खटारा मोटार वाटेत बंद पडल्यावर तो त्या निर्जन परिसरातील एका जुनाट घरात पाणी प्यायला जातो. त्यानंतर त्याच्या जीवनात जे चक्रीवादळ घोंघावत येतं त्याची ही अतर्क्य कोटीतील कथा. एकामागून एक संकटं त्याच्यावर कोसळत जातात आणि त्यांना तोंड देताना त्याची उडणारी त्रेधातिरपीट आणि भंबेरी त्याच्यापुढे आणखी नवनवीन संकटं उभी करते. ओडेल डीफस हा तरुण आणि तिथे त्याच्या जीवनात येणाऱ्या गूढ व्यक्ती यांच्या पाठशिवणीचा हा खेळ त्याला यातनाचक्रात गुरफटवून टाकतो. त्या गुंतागुंतीची ही कहाणी ब्लॅक कॉमेडीसारखी. पण अतिशय उत्कंठावर्धक आणि ओघवती. ही ओडेल डीफसच्या जीवनात घडणारी कथा असली तरी, ती अमेरिकन प्रशासकीय यंत्रणांच्या काळ्या बाजूवर नकळत प्रकाश टाकते. इथे एक स्त्री पोलीस आणि तिचे सहकारी ड्रग्जचा धंदा करतात. तुरुंगातील कैद्यांना ड्रग्ज पुरवतात. निरागस ओडेल डीफस केवळ एका चुकीच्या वळणामुळे ठरवलेली वाट चुकतो आणि विक्षिप्त, तऱ्हेवाईक इसम ड्रग्ज विकणारे अट्टल बदमाश, कट्टर धर्मपंधीय आणि कुटील पोलीस यांच्या ढोंगी, अत्याचारी, खुनी विश्वात कसा फसत जातो याची ही कहाणी अमेरिकेच्या काळ्या विश्वाची सफर घडवून आणते. नीतिनियम बासनात गुंडाळून ठेवलेल्या चित्रविचित्र स्वभावांचं विदारक दर्शन इथे घडतं. त्या घरातील इस्लामी दहशतवादाकडे झुकलेला तरुण डीन लोरी, त्याची पोलीस असलेली बहीण लोरेन, खून करून फ्रीझरमध्ये लपवलेली ब्री मावशी, खिश्चन धर्मगुरू प्रीचर बॉब या आणि इतरांच्या व्यक्तिरेखा लेखकाने ठसठशीत रेखाटल्या आहेत. घराच्या मागील अंगणात खणलेल्या माणूस पुरता येईल एवढ्या खोल खड्ड्याचं रहस्य प्रत्येक वेळी चक्रावून टाकतं. हा खड्डाही या कथानकातील जणू एक मुख्य पात्र ठरतो. ओडेल डीफसचा मुस्लीम दहशतवादी समजून अमेरिकन सैनिकांनी केलेला अमानुष छळ हा या कादंबरीतील बीभत्स रसाचा भयानक आविष्कार आहे. एका विशाल पटावर घडणाऱ्या मानवी कौर्याचं, फसवणुकीचं, विनोदाची झाक असलेल्या संवेदनशीलतेचं आणि रहस्यमय गुंत्याचं दर्शन कादंबरीत घडतं. ओडेल डीफस या तरुणाच्या सहनशक्तीची परिसीमा पाहण्यासाठी तरी ही रहस्यमय कादंबरी वाचायला हवी. शेवट सुखान्त असला, तरी त्या सुखाला बोचणारे काटे अस्वस्थ करणारे आहेत. अस्सल कलाकृतीचं हे यश म्हणावं लागेल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद