माझे शेल्फ
केतकर वहिनी
केतकर वहिनी हे चरित्र म्हणजे कोकणातील करंबळे या दुर्गम खेड्यात लग्न होवून खोत घराण्यात गेलेल्या स्त्रीची कहाणी आहे. सातवी पास झालेली ही मुंबईची मुलगी लग्न होवून ठार खेडे म्हणावे अशा पण मुलींना बाहेर गावी ठेवून उच्च शिक्षण देणाऱ्या घराण्यात जाते. घराणे खोत असल्याने तिकडचे ते राजेच असतात. नवरा कमी शिकलेला असून सुद्धा अनेक कामात वाकबगार असतो व कूळ कायद्याचा चांगला अभ्यास केलेला असतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकार जमीन विषयक नवे कायदे करते व कूळ व मालक यांच्यात जमिनीच्या मालकी वरून संघर्ष सुरू होतो. प्रकरण विकोपाला जाऊन नवऱ्याचा खून होतो. मारेकरी निर्दोष सुटतात. या खडतर परिस्थितीत, केतकर वहिनी खंबीर पणे उभ्या राहतात. स्वतः कूळ कायद्याचा अभ्यास करतात व अनेक न्यायालयीन लढे लढून बहुतेक जमिनी ताब्यात मिळवतात. पुढे गावातल्या माणसाना जरबेत ठेवतानाच त्यांचा आदर, विश्वास संपादन करतात. गावात अनेक सुधारणांना हातभार लावतात. हे करताना विधवेला होणारे त्रास, मुलांची परवड, प्रचंड मोठ्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची उठबस, आजारपण, गावातील विरोधी लोकांची कारस्थाने, एकटे पणाच्या वेदना, अनेक प्रकारच्या लोकांचे आलेले अनुभव व शेवटी परत त्या गावाची वाटत असलेली ओढ.. हा सर्व 80 वर्षाचा प्रवास मस्त उतरला आहे. एक स्त्री किती खंबीरपणे सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना आपला हक्क व सन्मान कसा परत मिळवते याची ही तेजस्वी कहाणी आहे. जरूर वाचा ! अनुवादक म्हणून प्रसिध्द असलेल्या उमा कुलकर्णी यांनी हे चरित्र लिहून त्यांच्यातल्या लेखकाला न्याय दिला आहे !