माझे शेल्फ
कलाकार
‘कलाकार : सर्जनशील मनांचा व्यक्तीवेध’ हे श्री. रा.अ. कुंभोजकर यांचे पुस्तक वाचनीय ललित लेखसंग्रह आहे. महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, त्यांची आपल्या व्यवसायाशी असलेली निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेले श्रम यांची रोचक आणि वाचनी माहिती या पुस्तकातून मिळते. आताच्या पिढीला ज्ञात नसलेले अनेक कलाकार, त्यांची असामान्य अभिनय क्षमता, दिग्दर्शकांची कल्पकता आणि चित्रपट संस्थाचालकांची कलाकारांना समजून घ्यायची मनोवृत्ती व व्यावसायिक शिस्त या पुस्तकातून वाचकांना समजते. श्री. कुंभोजकर हे सुरुवातीला वि.स. खांडेकरांकडे लेखनिकाचे काम करत होते. खांडेकरांना जवळचे लोक ‘भाऊ’ म्हणत. भाऊंकडे बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, कवी यशवंत यांसारखे अनेक लेखक-कवी भेटायला येत. त्यांच्या साहित्यिक गप्पांतून लेखक बहुश्रुत झाले. त्याच प्रमाणे भाऊंकडून लेखकाला लेखनाचे तंत्र आणि मंत्रही मिळाले. त्याचाच परिणाम म्हणून हे लेख वाचताना वाचक पुस्तकाला चिकटून बसतो. ओघवती भाषाशैली हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे. कुंभोजकरांनी ‘अमृत’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ या प्रसिद्ध मासिकांमधे सहाय्यक संपादक किंवा कार्यकारी संपादक अशी पदे भूषवली आहेत. बेळगावच्या तरुण भारतच्या रविवारच्या अक्षरयात्रा पुरवणीचे संपादकपदही भूषवले आहे. या वाटचालीत त्यांचा चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रातील दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर संपर्क आला. त्यातूनच ही व्यक्तीचित्रणे निर्माण झाली. सदर पुस्तकात एकूण १५ व्यक्तीचित्रणे आहेत. ‘प्रभात फिल्म कंपनी’ हा लेख म्हणजे प्रभात फिल्म कंपनीशी जोडलेल्या अनेकांचे एकत्रित व्यक्तीचित्रण आहे. प्रभातचे मुख्य चालक विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही.शांताराम तसेच प्रभातच्या प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित घटना पुस्तकात वाचायला मिळतात. प्रभातने सामाजिक महत्वाचे विषय जसे जरठ-कुमारी विवाह हे आपल्या चित्रपटातून मांडले. दिग्दर्शक म्हणून शांतारामबापू कसे होते त्याचे चित्रण प्रभात फिल्म कंपनी या लेखात वाचायला मिळते. प्रभात मधे काम करणार्या कलाकारांना आपल्या भूमिकेचे इथे सोने होत आहे याची जाणीव असायची. सध्याच्या तरुण पिढीला यातील बरीचशी नावे माहिती नाहीत. या पुस्तकामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपट आणि नाट्यसृष्टीबद्दल बर्यापैकी माहिती मिळते. त्यातून अभ्यासूंची उत्सुकता वाढेल. बाबुराव आणि भालजी पेंढारकर यांनी पार्श्वनाथ आळतेकरांच्या सोबत ‘वंदे मातरम’ हा त्याच नावाचा त्यांच्या संस्थेचा पहिला बोलपट काढला. इंग्रजी राजवटीत हा चित्रपट ४ वेळा सेन्सॉर झाला. यावरची लेखकाची टिप्पणी चपखल आहे. ते म्हणतात, ‘चार-पाच वेळा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची जी अवस्था होईल तीच या चित्रपटाची झाली. तो सपशेल आपटला.’बाबुरावांनी मुख्यत: खलपुरुष साकारला. पण त्याबरोबर ‘भक्त दामाजी’ मधील विठू महार, ‘अमृत’ मधील कृष्णा चांभार, ‘श्यामची आई’ मधील भाऊराव, ‘महात्मा फुले’तील जोतिबा अशा विविधांगी आणि अभिनयाचा कस लावणार्या भूमिका त्यांनी केल्या. बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दाजी भाटवडेकर, अप्पा टिपणीस, दिनकर कामण्णा, धुमाळ असे जुने कलाकार आणि आरती अंकलीकर-टिकेकर या सध्याच्या प्रसिद्ध गायिका आपल्याला या पुस्तकात भेटतात. विशेष म्हणजे वि.स.खांडेकरांच्या पत्नी उषाताईंचेही व्यक्तीचित्रण यात अंतर्भूत केले आहे. एका साहित्यिकाचा संसार चालवायची कसरत ही देखील कलाच म्हणली पाहिजे असा त्यामागचा दृष्टीकोन असावा. खरतर रोचक ललित लेखन ही देखील एक कलाच आहे. त्यामुळे एक वाचनीय ललितलेखांचा संग्रह देणारे लेखक श्री. कुंभोजकर हेही एक कलाकारच म्हणले पाहिजेत. एका कलाकाराने इतर कलाकारांना दिलेली ही मानवंदनाच आहे.