मुखपृष्ठ
अ कॉल टू ऑनर

माझे शेल्फ

अ कॉल टू ऑनर

इंग्रजी शीर्षक
A Call To Honour
सारांश

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंग हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमधील बडे प्रस्थ होते. सुरवातीला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, नंतर परराष्ट्र मंत्री, काही काळ संरक्षण मंत्री आणि सगळ्यात शेवटी अर्थमंत्रिपदाचा भारही त्यांना सांभाळावा लागा होता. सुमारे साडेचार वर्षे टिकलेल्या वाजपेयी सरकारमधील त्यांच्या आठवणींवर अधारित ‘ए कॉल टू ऑनर’ हे पुस्तक अर्थातच घटनांची जंत्री आहे. पुस्तकाची सुरवातीची काही प्रकरणे जसवंतसिंग यांच्या राजस्थानातील कौटुंबिक पाश्र्वभूमीमध्ये जातात. तयानंतर ते पाकिस्तानची निर्मिती, फाळणीची वेदना, द्विराष्ट्राचा सिध्दांत यांचा तात्त्विक अंगाने वेध घेतात. ‘आत्मसन्मानाचा शोधा’ ही जी या पुस्तकाची ‘थीम’ आहे, त्याच्याशी ही सगळी प्रकरणे विसंगत वाटत राहतात. त्यामुळे सुरवातीसच पुस्तकावरील जसवंतसिंग यांची लेखक म्हणून पकड ढिली होत जाते. पुढे मात्र ‘एनडीए’ सरकारच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांमागील कथा ते उलगडत जातात आणि वाचक त्यात गुंतत जातो. १९९८ मध्ये केलेला अणुस्फोट, कारगिलचे युध्द, सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे विविध आरोप, आग्रा येथील वाजपेयी - मुशर्रफ यांच्यातील अपयशी ठरलेली परिषद, कंदाहार अपहरण प्रकरण, संसदेवर झालेला हल्ला आणि त्यानंतर सीमेवर झालेली सैन्याची जमवाजमव यांचा ते चित्तथरारक तपशील देतात.चीनी आक्रमणाच्या १२ वर्षे पूर्वीच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सविस्तर पत्र लिहून पंडित नेहरू यांना दिलेला धोक्याचा इशारा, अणुस्फोटाचा निर्णय वाजपेयी यांनी त्यांच्यापासूनही कसा गुप्त ठेवला होता, अणुस्फोटापूर्वी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे पोखरण येथे लष्करी वेशात कसे गेले होते, अशा आतापर्यंत फारशी माहीत नसलेल्या गोष्टी ते सांगतात. अमेरिकेशी ‘व्यूहतंत्रात्मक चर्चा’ सुरू करण्याचे श्रेय निश्चतपणे जसवंतसिंग यांना जाते. अमेरिकेचे तत्कालीन उप परराष्ट्रमंत्री स्ट्रोब टाल्बोट यांच्याशी ही चर्चा कशी सुरू केली, संशय-गैरसमज-भीती या अनेक अडथळ्यांना मागे टावूâन मैत्रीचा नवा धागा कसा विणला गेला, याचे त्यांनी केलेले वर्णन खूपच रोचक आहे. चीनबरोबरील ‘व्यूहतंत्रात्मक चर्चे’चा तपशीलही पुस्तकात सविस्तर येतो. जसवंतसिंग यांचे व्यक्तिमत्त्व लष्करी आहे. अवघड शब्द, लांबलचक पल्लेदार वाक्ये यामुळे त्यांचे बोलणे किचकट, गुंतागुंतीचे वाटते. नेमके याबाबीचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात पडले आहे. त्यातच त्यांनी हाताळलेले विषय तितकेच अवघड आहेत. परिणामी त्याचे सोप्या, सरळ, ओघवत्या मराठीत भाषांतर करणे, हे कठीण काम. अनुवादक अशोक पाध्ये यांनी ते चांगल्या पध्दतीने पार पाडले आहे; तरीही त्यांनी मराठीत वापरलेले काही पर्यायी शब्द खटकत राहतात. इंग्रजीतील पल्लेदार वाक्यांचे भाषांतर करताना त्याची धावपळ झालेली स्पष्टपणे जाणवते. हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या वेळीच जसवंतसिंग यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेचा गुप्तहेर कार्यरत होता, असा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर जसवंतसिंग यांनी उलटसुलट वक्तव्ये करून ज्या कोलांट्या उड्या मारल्या होत्या, त्यावरून त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. परिणामी या पुस्तकांबाबत ‘सेन्सेशन’निर्माण झाले खरे, पण त्याची विश्वासार्हता संपुष्टात येत गेली. नेमके हेच ‘इम्प्रेशन’ घेऊन पुस्तक वाचले जाते आणि जसवंतसिंहांनी ‘उगवत्या भारताच्या जयजयकारासाठी घातलेली साद’ अपूर्ण असल्यासारखी वाटत राहते. एकेकाळी फ्रान्सचे सर्वेसर्वा असणारे द गॉल यांच्या आत्मचरित्रावरून जसवंतसिंग यांनी या पुस्तकाचे नाव ‘ए कॉल टू ऑनर’ असे नाव ठेवले आहे; मात्र पुस्तकातील आशय बघता त्याचाही फारसा उपयोग झालेला दिसत नाही.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद