माझे शेल्फ
कॉलेज
महाविद्यालयातील ‘राजकारण’… कोणत्याही महाविद्यालयात असतं तसंच वातावरण असणाऱ्या शिवापूरच्या महाविद्यालयातलं वातावरण या कादंबरीत लेखिकेने मांडलं आहे. सुमती सुखटणकर या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. झुऑलॉजीच्या विभाग प्रमुख म्हणून त्यांना ज्या समस्यांनासामोरे जावे लागते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा आलेख महाविद्यालयातील राजकारणाभोवती गुंफुन कॉलेजचे लिखाण केलेले आहे. आशा वाकडे नावाच्या प्राध्यापिका सुखटणकर यांच्याच शिफारशीने त्यांच्या विभागात पार्टटाईम म्हणून येतात आणि सुखटणकर यांना कॉलेजमधील राजकारणाचे भयंकर दर्शन घडते. लपवाछपवी, बनवेगिरी करत ‘थ्रू प्रॉपर चॅनेल’ सुममीमार्फत पूर्णवेळ होण्याच्या तयारीत असणाऱ्या या वाकडेबाईमुळे जे काही राजकारण घडते त्याचे सविस्तर वर्णन लेखिकेने केले आहे. रिमा डिसिल्व्हा या इंग्रजीच्या विभागप्रमुख सुमतीची मैत्रिण. प्राचार्य ग्रामीण भागातून आलेले. त्यातून संस्थाचालकांच्या गळ्यातील ताईत. संस्था आणि प्राध्यापक यांच्यात ताळमेळ घालून हा अप्पलपोट्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी देतो. रिमा आणि सुमती त्यांच्या विभागाच्या प्रमुख झाल्या, त्या त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर. पण संस्थाचालकांच्या वशिल्याने महाविद्यालयात नव्याने घेतलेल्या मर्जीतल्या प्राध्यापकाची वर्णी हळूहळू कशी पूर्णवेळ म्हणून लावली जाते. हा या कादंबरीचा मूळ विषय. या अनुषंगाने सुमती, तिचा नवरा जयंत, मुलगा रोहन, परदेशात राहणारा भाऊ दिलीप, आई, सामाजिक कार्य करणारी मैत्रिण जयू या व्यक्तिरेखा कादंबरीच्या ओघात येतात. प्राचार्यांनी सुमतीच्या विभागात दोन नव्या जागा निर्माण करण्यासाठी राजकारण सुरू केले. त्यांच्या मर्जीतल्या विसपुते नावाच्या माजी विद्यार्थ्यालाच प्राध्यामक म्हणून ते घेतात आणि त्याला पूर्णवेळ करण्यासाठी अनेक हिकमती करतात. वर्कलोड असताना प्राचार्यांच्या अनुपस्थितीत विभाग प्रमुख या नात्याने सुमतीने पारमार नावाच्या एका गरजू आणि गरीब विद्यार्थ्याला प्राध्यापक म्हणून नेमले. प्राचार्यांना हे कळताच त्यांच्या रागाचा पारा चढतो. सुमतीला मग ते घालून पाडून बोलणे सुरू करतात. पारमारच्या शिकवण्यावर विद्यार्थी नाराज आहेत, अशी तक्रार आल्याचे सांगून सुमतीवर दडपण आणायला सुरुवात करतात. सुमतीच्या विभागातील एका प्राध्यापकाला प्राचार्य सुमतीच्या नकळत शिष्यवृत्ती मिळवून देऊन त्यांना वर्षभरासाठी बाहेरगावी पाठवतात. त्यामुळे नवीन जागा भरण्याची गरज भासते. याच काळात सुमतीला एनएसएसच्या कॅम्पसाठी आठवडाभर बाहेरगावी पाठवून तिच्या अनुपस्थितीत मर्जीतले दोन नवीन प्राध्यापक रुजू करून घेण्यात ते यशस्वी होतात. या प्रकारचा सुमतीला त्रास सुरू होतो. सुमतीला विभागाकडे फारसे लक्ष देता येऊ नये म्हणून हळूहळू विविध कमिट्या तिच्यावर लादल्या जातात. सुमती मैत्रिण रिमाला प्रथम याचा संशय येतो. माटे नावाच्या दुसऱ्या कॉलेजातील प्राध्यापिकेकरवी सुमतीची ओळख काढून वाकडे नावाच्या नव्या प्राध्यापिकेची जागा निर्माण करण्यामागे प्राचार्यांचाच कट आहे. हे ती दाखवून देते. सुमतीने नेमलेल्या परमारवर आरोप आणि मर्जीतल्या अर्धवेळ प्राध्यापकांना कमिट्यांवर नेमण्यात येऊ लागले. कमवा आणि शिका योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त कार्यक्रमात बाहेरच्या विद्याथ्र्यांना बक्षिसे दिल्याचे जगजाहीर होताच ते प्रकरण सुमतीवर ढकलण्याचा प्रयत्न होतो. या काळात सुमती सुट्टीवर गेल्याचे पाहून प्राचार्य नवीन पर्यावरणाचा प्रकल्प तिच्या विभागाला जोडून वर्कलोड निर्माण करतात. सुमतीने तात्पुरती नेमणूक दिलेल्या परमारला काढून टाकले तर वाकडे आणि विसपुते या प्राचार्यांच्या मर्जीतल्या दोन प्राध्यापकांना कायम करता येऊ शकते म्हणून बाहेरगावी गेलेले प्राध्यापक परत येताच परमारला काढून टाकण्यात येते. गरीब परमार कॉलेजमध्येच आत्महत्या करतो. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागते. पोलीस तपास सुरू होतो. या चौकशीत कॉलेजचे बिंग बाहेर पडू लागते. चटर्जीना मुद्दाम शिष्यवृत्ती देऊन बाहेरगावी पाठवणे, त्यापूर्वी विसपुते आणि वाकडे यांच्यासाठी तात्पुरती जागा करणे, एक वर्ष आधी असूनही केवळ मर्जीत नसल्यामुळे परमारला काढून टाकणे, चटर्जी परत येताच वर्कलोड वाढला म्हणून विसपुते-वाकडे यांना सहा महिन्यांची ऑर्डर देणे, त्यासाठी रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे या गोष्टी बाहेर पडतात, प्राचार्याचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत, हे पोलीस संस्थाचालकांना दाखवून देतात सर्वांचे धाबे दणाणतात. अधिक तपासात वाकडे केवळ एम.एस्सी असल्याचे आणि विसपुते याच्यावर कॉलेजचा माजी विद्यार्थी असताना कॉपीप्रकरणात पकडल्याचे निष्पन्न होते. परमारने लिहिलेली पोलिसांच्या हातात पडताच सारेच गोत्यात येतात. सुमतीने त्यांचे बिंग पोलिसांसमोर फोडू नये म्हणून तिला आलेली परदेशी शिष्यवृत्तीची ऑफर संस्था तिला स्वीकारायला लावतात आणि प्राचार्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू होते.