माझे शेल्फ
कर हर मैदान फतेह
प्रेरक स्वानुभव... ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे विद्यमान पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे ‘कर हर मैदान फतेह’ हा आत्मकथनाचा दुसरा भाग ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केला आहे. ‘म में है विश्वास’मध्ये नांगरे पाटील यांनी त्यांचा सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू होता. ‘कर हर मैदान फतेह’ या दुसऱ्या भागात त्यांनी आयपीएस निवडीनंतर कुंभार मातीला आकार देतो, तसे एका युवकाचे एक अधिकाऱ्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध केले आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या पुस्तकातून नांगरे पाटील यांनी युवावर्गाला समजेल, अशा सोप्या शब्दांत सांगितल्या आहेत. सायबर गुन्हे, पोलीस प्रणाली, व्यसनाधीनता, सार्वजनिक जीवनात सुरक्षितता, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन, वेळेचे व कामाचे नियोजन या विषयांना नांगरे पाटील यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक त्यांच्या अनुभवांची, प्रशिक्षणाची व कर्तव्यांची सरमिसळ आहे. ज्याला जे पाहिजे, ते त्यातून निवडून घेऊन ते आपापल्या व्यक्तित्वाशी सांगड घालू शकतील, अशी या पुस्तकाची मांडणी आहे.