माझे शेल्फ
कर्मयोगिनी (अहिल्याबाई होळकर)
अहिल्याबाई होळकर यांची पुण्यश्लोक ही ओळख बऱ्याच जणांनी रंगवली आहे. त्याला अनेक कारणे आहेत जसे त्यांचा श्रद्धाळू स्वभाव, त्यांनी केलेला बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार, त्यांनी केलेला दानधर्म आणि इतर बरेच काही. पण लेखिकेने या पुस्तकात त्यांच्या पुण्यश्लक या प्रतिमेबरोबरच त्या कशा कर्मयोगिनी होत्या हे ही उत्तमरीत्या सांगितले आहे. त्यांचा मुत्सद्दी स्वभाव, फडणिशीत केलेले अतुल्य काम, राज्यकारभारी गुण, त्यांची न्यायदानी वृत्ती, राजपूत चंद्रावतांचा केलेला बिमोड, राघोबादादांना युद्ध न करताच घ्यायला लावलेली माघार, आप्त स्वकीय इहलोक सोडून जातानाही दाखवलेला खंबीरपणा अशा अनेक सद् गुणांचे दर्शन यात घडते. पुस्तकाला दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात त्यांचे बालपण, सासरकडचे सुरुवातीचे दिवस, सासरे मल्हाररावांकडून घेतलेले राजकारणाचे धडे, सासवांबरोबरची जवळीक, पती खंडेरावाकडून झालेला त्रास, स्वतःचे पोटच्या लेकरामुळे आलेली हतबलता लेखिकेने खूप उत्कृष्ठरित्या रंगवली आहे. दुसऱ्या भागात त्यांचे उत्तर जीवन दाखवले आहे ज्यात सुभेदार तुकोजी बरोबरचे सुरुवातीला असलेले चांगले आणि नंतर बिनसलेले संबंध, दुसरे मल्हारराव , रखमाबाई, नारो गणेश, बापू होळकर आदींशी आलेले संबंध, त्यांनी केलेले राजकारण, महादजी शिंदे सोबत भावांसारखे संबंध असूनही शिंदे आणि होळकर यात भांडणे होत असताना आलेली विवशता ते त्यांचा इहलोकीपर्यंतचा प्रवास छानरीत्या मांडला आहे. अहिल्याबाईनीं त्यांच्या जीवन काळात बरेच मृत्यू पाहिले. त्यांची सख्खी सासू , सासरे, सती गेलेल्या सावत्र सासवा, नवरा, सती गेलेल्या सवती, मुलगा मालेराव, सती गेलेल्या सुना , नातू नथोबा, सती गेलेल्या नातसूना, जावई यशवंतराव, सती गेलेली स्वतःची मुलगी मुक्ता आणि बरेच आप्तस्वकीय त्यांना सोडून गेले. अहिल्याबाई सासरे मल्हाररावांच्या विनंतीमुळे सती गेल्या नाहीत पण इतर लोकांकरवी त्यामुळे लागलेले बोल तसेच त्यांचे सती आणि तत्सम रूढी परंपरेवरचे विचार लेखिकेने सुंदररित्या मांडले आहेत. अहिल्याबाईंच्या जीवनकाळात बरेच पेशवे होऊन गेले. थोरले बाजीराव ज्यांनी छोट्या अहिल्येवर प्रभावित होऊन मल्हररावांना तिला सून करायला सांगितले त्यांपासून ते नानासाहेब, थोरले माधवराव , नारायणराव , रघुनाथराव आणि सवाई माधवरावांपर्यंत त्यांचे सर्वांशी कडूगोड सम्बन्ध राहिले. पेशवाईतल्या घडामोडी अहिल्येला सुरुवातीला मल्हाररावांकडून, नंतर तुकोजी कडून आणि इतर हेरांकडून खलित्या मार्फत समजताना अहिल्याबाईंचे त्यावरील वैयक्तिक मते आणि विचार मात्र वाचकांना कळत राहतात. अहिल्याबाईंनी जीवनात स्वकीयांबरोबर खूप झुंज दिली पण त्यांना बदलण्यात वा सुधारण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या जसे पती खंडेराव, मुलगा मालेराव, दुसरे सुभेदार तुकोजी, दुसरे मल्हारराव आणि इतर. त्याकाळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेली मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांची नासधूस आणि या अवहेलनेने हिंदू सैनिक आणि लोकांमध्ये आलेली हतबलता रोखण्यासाठी सर्व प्रमुख धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करून त्यांना पुनः प्रेरित करणे ही अहिल्याबाईंची दूरदृष्टी दाखवते. लेखिकेने पुस्तकात जुनी (18 व्या शतकातली मराठी) भाषा वापरली आहे त्यामुळे अहिल्याबाईंचे आणि इतर पात्रांचे संवाद हे खरे खरे वाटतात. जुन्या मराठी भाषेचा साज चढवून लेखिकेने या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे हे चरित्र फक्त ऐतिहासिक कादंबरी न राहता अभ्यासपूर्ण इतिहासलेखन झाले आहे. या पुस्तकावर दोन जणांनी M. Phil. केले हे समजल्यावर आश्चर्य वाटायला नको. एकंदरीत ऐतिहासिक कादंबरी आवडणाऱ्याबरोबर मराठी इतिहास संशोधक तसेच विद्यार्थी यांनी आवर्जून वाचावे असा हा अमूल्य ठेवा आहे.