मुखपृष्ठ
क्रोमोझोम-६

माझे शेल्फ

क्रोमोझोम-६

इंग्रजी शीर्षक
Chromosome-6
सारांश

अमेरिकेत ‘बेस्टसेलर’ कादंबऱ्या म्हणजे एक मोठंच प्रकरण आहे. एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी जसे त्याच्यात काही विशिष्ट घटक आवश्यक असतात. तसंच या कादंबऱ्यांचंही असतं आणि चित्रपट किती धंदा खेचतोय याचा जसा दर आठवड्याला आढावा घेण्यात येतो. आदल्या महिन्यातजास्तीत जास्त खपलेल्या पहिल्या दहा पुस्तकांची नावं जाहीर करण्यात येतात. तीच ‘बेस्टसेलर लिस्ट.’ या कादंबऱ्यांमधला विषय अगदी नवा असतो. लेखकाने वर्णन केल्या जाणाऱ्या विषयाचा अगदी सखोल अभ्यास केलेला असतो आणि त्याचं कथानक अत्यंत गतिमान असतं. वाचक गुंतून राहील असं घट्टपणे कथानक बांधलेलं असतं. शिवाय बाकी हमखास यशस्वी मसाला असतोच. पण म्हणजे मसाला हा चटकदारपणासाठी असतो. मुख्य विषयावर लेखकाने प्रचंड मेहनत घेतलेली असते. म्हणून मग त्या कादंबऱ्या जगभर तुफान खपतात आणि लेखकाला श्रीमंत बनवतात. जेफ्री आर्चर, हेरॉल्ड रॉबिन्स, मारिओ पुझो, फ्रेडरिक फोरसिथ, मायकेल क्रायटन हे सध्याचे बेस्टसेलर लेखक आहेत. त्यांच्याच पंक्तीतलं आणखी एक नाव म्हणजे रॉबिन कुक. स्वत: निष्णात डॉक्टर आहेत. साहजिकच त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये वैद्यक शास्त्रीय विश्वातले विषय भन्नाटपणे हाताळलेले असतात. ‘क्रोमोझोम-६’ ही डॉ. रॉबिन कुक यांची अशीच एक भन्नाट कादंबरी. जेनेटिक्स किंवा जनुकशास्त्र या विषयात वाचकाला आरपार घुसवणारी, खिळवून ठेवणारी. डी.एन.ए. हा शब्द आपल्याला माहीतच आहे. व्यक्तीची सगळी आनुवंशिक माहिती डी.एन.ए.मध्ये सांकेतिक भाषेत साठवलेली असते. हे डी.एन.ए. ज्यांच्यामध्ये असतं अशा प्रत्येक पेशीतील लांबट आकाराच्या रचना किंवा समजुतीसाठी म्हणूया डी.एन.ए.च्या डब्या म्हणजे क्रोमोझोम किंवा गुणसूत्रं. गुणसूत्रं एकूण सेहेचाळीस असतात आणि ती नेहमी जोड्यांमध्ये असतात. माणसामध्ये आणि मानवसदृश वानरांमध्ये गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात. सध्या अवयवारोपणाच्या शस्त्रक्रिया सर्रास केल्या जातात. पण अनेकदा रुग्णाचं शरीर तो आरोपित अवयव नाकारलं. कारण त्याच्या शरीरासाठी तो अवयव ही ‘फॉरिन बॉडी’ असते. मग शस्त्रक्रिया फुकट जाते. डॉ. केविन मार्शल या मॉलिक्युलर बायोलॉजी तज्ज्ञाला यावर एक उपाय सुचतो. प्रत्येक माणसाचीच एक प्रतिकृती बनवायची. प्रतिकृतीमधली सगळी गुणसूत्रं ही मूळ व्यक्तीशी मिळतीजुळतीच ठेवायची. म्हणजे मूळ व्यक्तीला गरज लागेल तेव्हा प्रतिकृतीतला अवयव काढून त्याचं आरोपण करता येईल. मूळ व्यक्तीचं शरीर ‘फॉरिन बॉडी’ म्हणून तो नाकारणार नाही. कल्पना तर अफलातून असते. पण ती प्रत्यक्षात उतरवायची कशी? प्रत्येक माणसाची प्रतिकृती घडवायची कशी? निसर्ग हा असा महान शास्त्रज्ञ आहे की दोन जुळी भावंडं देखील तो निराळी घडवतो. डॉ. केविन मार्शलचं यावरचं संशोधन असं की, चिपांझी वानरांमधल्या बोनोबो या जातीमध्ये मानवी शरीरातील क्रोमोझोम-६ आरोपित करायचा. म्हणजे उदाहरणार्थ, एका बोनोबो नराच्या शरीरातला मूळ क्रोमोझोम-६ काढला आणि डॉ. केविन मार्शलच्या शरीरातला क्रोमोझोम-६ तिथे घातला की, तो नर म्हणजे केविनची प्रतिकृती झाली. भविष्यात केव्हाही केविनला एखादा अवयवाची गरज पडली की, त्या नराच्या शरीरातला हवा तो अवयव काढून त्याचं आरोपण केविनच्या शरीरात करता येईल. डॉ. रेमंड लियॉन्स नावाचा व्यापारी दृष्टीचा डॉक्टर केविनच्या संशोधनावर बेहद्द खूष होतो. त्याच्या दृष्टीने हे संशोधन म्हणजे सोन्याची खाण असते. आफ्रिका खंडातल्या इक्वेटोरियल गिनी या देशातलं घनदाट झाडीचं एक बेट निवडण्यात येतं. तिथे बोनोबो वानरांची वसाहत करण्यात येते. डॉ. केविन मार्शलला एक अत्याधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा उभारून देण्यात येते. जगभरातले धनिक स्त्री-पुरुषही डॉ. रेमंडची गिऱ्हाईकं असतात. भरपूर भाडं घेऊन त्या श्रीमंतांची प्रतिकृती निर्माण करणं हा डॉ. रेमंडचा शास्त्रीय धंदा बनतो. हे सारं वैज्ञानिक नितीमत्तेला सोडून असतं. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत गुप्त ठेवण्यात येतो. पण न्यूयॉर्कचा कुख्यात माफिया कार्लो फ्रॅंकोनी याचा खून होतो. त्याचं प्रेत शवागारातून अचानक गायब होतं. परत सापडतं तेव्हा त्या प्रेताचं यकृत छिन्नविछिन्न केलेलं असतं. शवविच्छेदनात तज्ज्ञांना आढळतं की, हे यकृत मूळचं नाही, आरोपित केलेलं आहे. इथून शोधाला सुरुवात होते आणि कथानक डॉ. जॅक स्टेपलटन, डॉ. लॉरी मॉनृगोमेरी, डॉ. केविन मार्शल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह इक्वेटोरियल गिनीच्या दाट जंगलात घुसतं. शेवट अर्थातच गोड होतो. पण त्या शेवटपर्यंत डॉ. रॉबनि कुक वाचकाला असं काही थरारून टाकतात की, पुस्तक हातातून खाली ठेववत नाही.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद