माझे शेल्फ
कटिंग फ्री
सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपे्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारणी व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देते.