माझे शेल्फ
कुलामामाच्या देशात
कुलामामाच्या देशात .... उत्कंठावर्धक व्याघ्रकथा श्री. रवींद्र वानखडे यांनी स्व- अनुभवावरून सांगितलेल्या वाघांसंबंधीच्या चित्तथरारक अनुभवकथांचे हे संकलन श्री. जी. बी. देशमुख यांच्या समर्थ लेखणीतून आपल्याला जंगलसफारी घडवून आणते व आजपर्यंत वाघ न पाहिेल्यांना आपणसुद्धा व्याघ्र दर्शन करावे हे कुतूहल मनात उत्पन्न करते. लेखक स्वतः अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे अभ्यासक असल्यामुळे अमिताभ यांच्या चित्रपटातील डायलॉग्जचा विशेष उल्लेख पुस्तकात दिसून येतो. यातील मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन कथा म्हणजे आज्ञाधारक बच्चू आणि खुश रहना मेरे यार... आज्ञाधारक बच्चू या कथेत एका प्रसंगात वाघिणीचं पिल्लू एकाच जागेवर उभं राहतं. आज्ञाधारकपणा मनाला भावतो व त्यातून मानवप्राण्याने सुद्धा बोध घ्यावा अशी ही कथा आहे. प्रत्येक कथेत मानवाने प्राण्यांकडून शिकण्यासारखे काहीतरी आहेच. खुश रहना मेरे यार.... या कथेतील हत्तीच्या हातून चुकून झालेल्या आपल्या सवंगड्याची (माहुताची) हत्या त्याला अस्वस्थ करते आणि थोड्याच कालावधीत त्याचा सुद्धा करुण अं होतो. हे त्यांच्यातील मैत्रीचे अतूट नाते वाचकाला डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. कुलामामाच्या देशात या पुस्तकातील कथेच्या दीर्घकथा करण्याच्या मोहात न अडकता मोजक्या शब्दांत मांडणी करून ह्या लघुकथा आपल्याला खिळवून धरतात. कमीत कमी शब्दांत लेखांची मांडणी ही जी. बी. देशमुख यांची हातोटी सर्व पुस्तकांतून दिसून येते. अ- अमिताभचामध्ये सुद्धा त्यांनी हे कौशल्य दाखवले आहे. श्री. रवींद्र वानखेडे यांनी त्यांची चित्तथरारक, साहसी अनुभवांची पोतडी सामान्य वाचकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आणि लेखकांचे विशेष आभार !