माझे शेल्फ
कुंधा
खानदेशातील उद्धवस्त होऊ पहाणारे खेडे आणि तेथील असह्य शेतकरी जीवन, त्यांच्या जगण्याच्या वाताहतीची, पडझडीची, दु:खाची कहाणी या कादंबरीत चितारली आहे. या कादंबरीतून शेतकर्याला आत्महत्येच्या गर्तेत ढकलणार्या व्यवस्थेचा चिकित्सक वेध घेतला आहे. सोबतच लेखनासाठी खास खानदेशी तावडी बोली वापरली आहे. गावरहाटीतली सनातन संघर्षघंटा वाजल्यावर राजकारणाचा कुंधा वावर आणि शेतच उखडून फेकायला सज्ज झाला. शिवाय गावातील हितसंबंध सडवत ठेवणारी काळोखजन्य वृत्ती सूड, लोभ, बदला, वचपा आणि तंटा यांना एकत्र मिसळून सतत वर नागफणा काढते, याचे भेदक चित्रण 'कुंधा' कादंबरीतून आलेले आहे. कुंधा प्रतीकरूपाने सिद्ध झाला असला तरी शेतीच्या कर्माधर्माशीच तो जखडलेला नाही. गावातील झगड्याच्या मूळाशी हा कुंध्याचा राक्षस आहे. राजकारणानिमित्त बखेडा उत्पन्न करणारा कुंधा तर कादंबरीत खलनायकासारखा वर्धित झालेला आहे. कादंबरी वतनदार वाडा आणि आसामी वाडा या दोन संघर्षपीठांचा पीळ प्रगट करते. ही दोन्ही संघर्षपीठं क्षीण मतलबांसाठी जीवांवर उठतात. आणि एका अर्थानं दोघंही रक्तबंबाळ होतात.गावरहाटीतली सनातन संघर्षघंटा कादंबरीतून लेखकाने अशी काही वाजवली की, राजकारणाचा कुंधा वावर आणि शेतच उखडून फेकायला कसा सज्ज झाला; यासंबंधीचा थरार उभा करण्यात ही कादंबरी पुष्कळ विजयी झाली आहे. लेखकाकडे मोठे भाषादव्य आहे, अनुभव सोलून मांडण्याची ऊर्जा त्याच्याकडे आढळून येते. शिवाय गावातील हितसंबंध सडवत ठेवणारी काळोखजन्य वृत्ती सूड, लोभ, बदला, वचपा आणि तंटा यांना एकत्र मिसळून सतत वर कसा नागफणा काढते, याचे भेदक चित्रण 'कुंधा' कादंबरीतून आलेले आहे. पोलिसपाटीलकी, सरपंचपद, डेअरी, पेढ्या, ग्रामपंचायत, निवडणुका; यातून वाढणारा संघर्ष; किंवा बेडकाप्रमाणे पदाभिमानामुळे फुगणारी माणसं, बारीक गोष्टींसाठी कुरवाळले जाणारे अहंकार, सत्तांधता आणि त्यातून तंटा आणि शिव्यांचा वाहणारा जाळ लेखकाने हिकमतीने रंगवून साकार केलेला आहे. झगड्याचा आवाज कादंबरीतून येकू येतो. परंपरेची काळी सावली माणसाला मोठी होऊ देत नाही; आणि तंट्यातून ग्रामव्यवस्थाच कशी बरबादीच्या दिशेनं घरंगळत चालली आहे; यावर ही कादंबरी उजेड टाकू पहाते. लेखकाकडे वर्णन रंगविण्याचं कसब भारी असल्यामुळे वतनदार आणि आसामी हे दोन्ही वाडे मनोवृत्तीच्या अनुरोधाने कादंबरीतून अधिकच ठसठशीत झाले आहेत.