माझे शेल्फ

कविता महाजन यांनी पुस्तकविश्वच्या काही निवडक प्रश्नांना दिलेली उत्तरे

सारांश

नमस्कार मित्रहो,
कविता महाजन यांनी आपल्या दिवाळी अंकासाठी मुलाखत तर दिलीच, वर आपल्या काही प्रश्न आणि प्रतिक्रियांसाठीही अगदी वेळात वेळ काढून रातोरात उत्तरे पाठवली. ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रश्नकर्त्यांच्या नावासोबत इथे देत आहे.

प्रश्न १, प्रेषकः चिंतातूर जंतू
चळवळीतले किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या लिखाणाबाबत नेहमी येणारा एक अनुभव म्हणजे ज्यांना तुमचं सामाजिक कार्य पटतं/आवडतं त्यांना तुमचं त्याबद्दलचं लिखाणही आवडतं. आणि ज्यांना तुमच्या कार्याविषयी काही आक्षेप/अढी असेल ते तुमच्या लिखाणालाही नावं ठेवतात. त्यामागे चळवळीतली क्षुल्लक राजकारणं, असूया वगैरे अशीही कारणं असतात. ज्यांना तुमच्या लिखाणातूनच त्या त्या सामाजिक समस्येची जाणीव झाली आणि त्यामुळे जो सकारात्मक फरक पडला त्याविषयी तुम्ही बोललाच आहात. पण 'सामाजिक समस्येवरच्या तुमच्या दृष्टिकोनाबाबत आपले मतभेद आहेत, पण कादंबरी आवडली' किंवा त्याउलट 'सामाजिक समस्येवरचा तुमचा दृष्टिकोन पटला, पण कादंबरी मात्र आवडली नाही.' अशा काही प्रतिक्रिया आल्या का? आल्या असल्यास त्यांविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.

उत्तर :
सामाजिक समस्येवरील दृष्टिकोनात मतभेद अजूनतरी कुणीही स्पष्टपणे नोंदवले नाहीत. कादंबरी आवडली / नावडली अशा प्रतिक्रिया अर्थातच पुष्कळ आल्या. 'भिन्न'च्या वेळी एका कार्यकर्त्या मैत्रिणीचे खूप सहकार्य झाले होते. ती प्रत्यक्षात भिन्न वाचून खूप दुखावली गेली. तिने पहिल्यांदा फोन केला तेव्हा तिला नीट बोलताही येत नव्हते, इतकी ती रडत होती. मी एक तरी 'पूर्ण चांगले / आदर्श' पात्र रंगवायला हवे होते. ज्यामुळे तिच्यासारख्यांना काम करताना धीर / दिलासा मिळेल, असे तिचे म्हणणे होते. "आमच्या क्षेत्रात ९० % लोक असेच आहेत, हे कबुल; पण तरीही जे १० % चांगले आहेत, त्यांच्यावरच फोकस करायला हवा होता." असे तिचे म्हणणे होते. अनिल अवचटांनी अनेक कार्यकर्त्यांची अशी केवळ चांगली बाजू मांडलेली आहे; तीच भूमिका इतर लेखकांचीही असावी, अशी तिची अपेक्षा होती. त्यानंतर बराच काळ आमचे संबंध ताणलेले राहिले, पण पुढे निवळले. :-).
सांगलीला झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी एका स्वयंसेवी संस्थेच्या लोकांनी ठरवून हल्लाबोल केला होता. "कार्यकर्त्यांची इमेज मी भिन्नमधून खराब केली आहे." असा त्यांचा आक्षेप होता.
बाकी जे त्या क्षेत्रांमध्ये रुळलेले 'सराईत' आहेत, त्यांना ना पुस्तके वाचण्याची गरज वाटते, ना चांगले-वाईट म्हणण्याची. 'दुर्लक्ष' त्यांना सोयीचे असते. 'कितीही लिहा काय फरक पडतो?' अशी त्यांची रोखठोक भूमिका असते.
मला स्वतःला अगदी नव्याने लिहीत होते तेव्हा 'प्रतिक्रियेचे कुतूहल' असायचे. नंतर ते ओसरले. आपण जे लिहिले आहे, ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि शक्य ते सर्व कष्ट घेऊन, सगळ्या किमती मोजून लिहिले आहे. हे स्वतःला माहीत असले की पुरे, असे मला वाटते. खरी मजा लेखनाच्या प्रक्रियेत असते. नंतरच्या प्रतिक्रिया, समीक्षा, पुरस्कार इत्यादी गोष्टी सोपस्काराच्या. त्यामुळे लेखन सुरू असलं की मी 'नॉर्मल' असते.

प्रश्न २, प्रेषकः ऋषिकेश
शहरीकरण आणि आदीवासी संस्कृती यांच्या पेचात कविता महाजन कुठली बाजु योग्य समजतात. जसे अंदमानच्या आदीवासींना वेगळे जंगल राखीव आहे. त्यांचा इतर जगाशी संबंधही नाहि. त्यांचे स्वतःचे असे विश्व आहे. तसेच इतर आदीवासी, जे निसर्गाला धरून राहतात, निसर्गाची जंगलाची देखभाल करतात त्यांच्या वस्तीचे गावात व पुढे शहरात रुपांतर होणे चांगले की वाईट असे महाजन यांना वाटते?
त्याच बरोबर, आदिवासींच्या वेगळ्या औषधोपचार पद्धतीवर संशोधन झाले आहे का? असल्यास त्याबद्दलही वाचायला आवडेल

उत्तरः
शहरीकरणाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. तोटे अधिक आहेत. आदिवासींना राखीव जंगल दिले आणि जसे आहेत तसे राहू दिले तरी बाहेरची माणसे तिथे जाणारच आणि त्याचे भले-बुरे परिणाम होणारच. संस्कृती, तत्त्वज्ञान, विचार करण्याची मूलभूत पद्धतच निराळी अशा गोष्टींमुळे आदिवासींचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जातो. आज झारखंड, बस्तर अशा भागांमधील आदिवासींची स्थिती बघवत नाही. किलोभर मिठासाठी चार किलो चारोळी अशी लुबाडणूक आजही आहे. आर्थिक, शारीरिक, लैंगिक अशा अनेक तर्‍हांनी शोषण होते आहे आणि उत्तरोत्तर ते वाढतेच आहे. बदलाच्या काळात कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. हाच एकमात्र उपाय आहे. योग्य-अयोग्य ठरवणे आपल्या हातात नसतेच.

आदिवासींच्या वेगळ्या औषधोपचार पद्धतींवर शास्त्रीय पद्धतीने अजून संशोधन झालेले नाही. मात्र काही वनौषधींची माहिती देणारी संकलने इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत. ( त्या पुस्तकांची नावे आत्ता मला आठवत नाहीयेत. पण ती माझ्या संग्रहात आहेत. सवडीने पाहून नक्की कळवेन. ) मराठीत केवळ एक पुस्तक माझ्या बघण्यात आले आहे. डॉ. राणी बंग यांचे 'गोईण.'

प्रश्न ३, प्रेषकः सागर
दिवसेंदिवस माणूस हा प्रगती करतो आहे. पण त्याच बरोबर तो निसर्गापासून दूर देखील जातो आहे. अशा वेळी आदिवासी लोकांनी जपलेली निसर्गाशी जवळीक कविता महाजन यांना कशी वाटते? आणि आदिवासींनी शहरीकरणात सहभागी व्हावे का? उत्तर हो असेल तर त्यांनी शहरी विचारधारेत कितपत सहभागी व्हावे? आणि हे आदिवासी लोक निसर्गाशी जवळीक पिढ्यान् पिढ्या उलटल्या तरी देखील कशी जपतात? त्यांच्या मुलांना वारसा जपण्यासाठी कोणते संस्कार देतात? शहरीकरण आणि प्रगतीच्या या प्रचंड झगमगाटात आदिवासींना त्याची ओढ न वाटण्याचे कारण काय?यावर मला कविता महाजन यांचे मत जाणून घ्यायला आवडेल Smile

उत्तरः
आमची प्रगतीची व्याख्या ही आज आम्ही केलेली नाहीये. आमचा विकास कशात आहे, आनंद कशात आहे, काय केले ( विकत घेतले ) म्हणजे आम्हांला सुखी वाटेल, हे सारे आज 'बाजार' ठरवतो आहे आणि त्या गोष्टींचा अभाव असेल तर "दु:खी" हे आपसुकच आले. लहानपणापासून याच वातावरणात वाढल्याने आपल्या स्वतःच्या अशा खर्‍या आणि खास आवडीनिवडी / गरजा आपल्याही माहीत नसतात. क्वचित कधी 'आपल्याला अमुक खरेच हवे होते का?' असा प्रश्न विचारला की साक्षात्कार झाल्यासारखी उत्तरं सापडायला लागतात. हा बाजार जसा बदलतो आणि बाजार ज्यांच्या हातात आहे ते लोक बदलतात, तसे आपले कलही बदलायला लागतात. इतके आपण त्या प्रवाहात अडकलेलो आहोत. आणि आपली मुळे कोणत्या मातीत आहेत हे विसरून गेलो आहोत.

आदिवासींनी स्वतःचे तत्त्वज्ञान जपले आहे. ते त्यांना जपता आले याचे कारण ते त्यांच्या जगण्याला कुणा 'गुरू-महात्मा-प्रेषिता'ने चिकटवलेले नाही. ते त्यांच्या अनेक पिढ्यांच्या जगण्यातून विकसित होत आले आहे. त्याचा 'ग्रंथ' न बनल्याने ते ग्रंथपूजेपुरतेच उरण्याचा धोका टळलेला आहे. ते त्यांच्या दैनंदिन जीवनाचा, रोजच्या सवयींचा भाग बनलेले आहे. पावसाळा सुरु झाला की वाटेवर उगवणार्‍या पालेभाज्या कुणीही उगाच तोडून खायला सुरुवात करणार नाही. विधीपूर्वक घरटी एकाने असे समुहाने जाऊन डोंगरावर जाऊन 'कौला' खुडून आणायचा. शिजवून ती भाजी प्रत्येकाच्या हातावर प्रसादासारखी देऊन सगळ्यांनी एकदम खायची. अशी एक प्रथा वारल्यांमध्ये आहे. बहुतेक आदिवासी जमातींमध्ये अशा अनेक प्रथा दिसतात. पूजा होत नाही तोवर बारकी पोरंही झाडाखाली पडलेली कैरी उचलणार नाहीत. संयम इथूनच सुरू होतो. आदर इथूनच सुरू होतो. जपणूक इथूनच सुरू होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांना कदाचित 'संस्कार' म्हटले जात नसेल, पण ते संस्कारच असतात. साठवणूक नाही. हावरटपणा नाही. लुबाडणे, चोरी, बलात्कार नाही. खरा आनंद, खरे सुख, जगण्यातला सोपेपणा, सहजता कशात आहे, हे ज्यांना समजले त्यांना या झगमगाटाचे काय कौतुक वाटणार? त्रासच होतो आणि उबगच येतो. नव्याचे कुतूहल वाटेल. पण हव्यास वाटणार नाही. अर्थात आता इतर जाती-जमातींच्या लोकांच्या सहवासाने ही वृत्ती विरत जाऊ लागली आहे.

मी एखाद्या आदिवासी भागातून परतते तेव्हा भिवया कोरलेल्या आणि मेकअप केलेल्या बायका पाहून मला मळमळायला लागते. कुरूप दिसतात त्या. पण हे केले नाही तर त्या गबाळ्या, मागास, स्वतःकडे लक्ष न देणार्‍या ( वा इतरांचे लक्ष वेधून न घेणार्‍या ), गावंढळ इत्यादी समजल्या जातात.हे सुंदर दिसते असे कुणी आणि कधी ठरवले हे त्यापैकी एकही बाई सांगू शकत नाही.

प्रश्न ४, प्रेषक: इंद्रराज पवार
'ब्र' पेक्षा मी ज्यावेळी 'भिन्न' चा विचार करतो त्यावेळी लेखिका म्हणतात "मी दहा टक्केच वस्तुस्थिती लिहिली आहे..." ती बाब प्रकर्षाने नजरेसमोर येते. या कादंबरीवर [त्यातील भाषेमुळे वा विषयाच्या दाहकतेमुळे] जशी प्रखर टीका झाली तसेच वाट्याला कौतुकही आली. पुरस्कारही मिळाले. इथपर्यंतचा प्रवास जनमान्य म्हणू या. पण आता प्रश्न असा आहे की, ज्यावेळी एखाद्या कादंबरीला शासकीय वा लोकमान्य पुरस्कार मिळतात त्यावेळी ती कादंबरी विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याविषयीची बीओएसची शिफारसही येते. पण इथेही झारीतले शुक्राचार्य असतात जे लिखाणावर झळझळीत कात्री चालवू इच्छितात [त्यांच्यात, कात्रीशिवाय, आपण येणार्‍या पिढीचे भले करू शकत नाही असा एकप्रकारचा गंड असतो]. थोडक्यात पुस्तकाचा बोर्‍या वाजवायचा असेल तर पुस्तक अभ्यासक्रमाला लावावं असे म्हटले जाते. आजचा विद्यार्थी 'भिन्न' कादंबरीवर [अभ्यासक्रमाला लावली असे गृहीत धरतो] लिहिण्याइतपत पक्व झाला आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर तो त्यातील भूमिकेला न्याय देऊ शकेल?
[यातच एक उपप्रश्न : विद्यार्थी - मेल्+फीमेल - वाचणार म्हणून काटछाटीला तुम्ही मान्यता द्याल?]

उत्तरः
काटछाटीला मान्यता अशा कारणांसाठी नक्कीच देणार नाही. माझे लेखन जे अभ्यासताहेत ते एमफील व पीएच.डी.चे विद्यार्थी आहेत. तिथे काटछाटीची गरज भासली नाही. झारीतील शुक्राचार्य असतात हे मान्य. मात्र ते काटछाट करण्याच्या लहान भानगडीत पडत नाहीत, ते सरळ तुमचा / तुमच्या पुस्तकाचा पत्ताच कट करतात.

शालेय पुस्तकांमध्ये माझ्या कविता असू नयेत अशी माझ्या लेकीची जबर इच्छा होती. "किमान एक लाख मुलांच्या करोडो शिव्या खायच्या असतील, तर शाळेच्या पुस्तकात कविता दे." असं तिनं मला ती इयत्ता पाचवीत होती तेव्हाच सांगितलं होतं. : -). त्यामुळे तिचं सांगणं मी आजवर तरी ऐकलेलं आहे. तुमच्या बोर्‍या वाजण्याच्या मताशी तिचे म्हणणे तंतोतंत जुळते.

दुसरा थोडा वेगळा मुद्दा... विद्यार्थ्यांच्या पक्वतेचा. तो कलाशाखेत जे असंख्य विद्यार्थी एमफील / पीएचडी करताहेत त्यांच्या एकुणच आकलनाबाबत संशय वाटावा अशी परिस्थिती आहे. ( या विषयावर जयदेव डोळे यांनी एक अप्रतिम प्रदीर्घ लेख लिहिला आहे. तो मिळाल्यास जरूर वाचावा.) विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर त्यांच्या प्राध्यापकांच्या बाबतही हेच म्हणता येईल. "लेखकाची परवानगी त्याच्या लेखनावर संशोधन करण्यासाठी आवश्यक" असा काही नियम असता, तर माझी मोठ्या संकटातून सुटका झाली असती. :-).

प्रश्न ५, प्रेषकः रोचीन
कुहु हे मराठीतील पहिलं मल्टिमिडिया पुस्तक आहे. त्याबद्दल मात्र कुतुहल आआहे.पुस्तक म्हंट्ल्म कि आपल्यासमोर येतेते म्हणजे बाईडेड कागदी स्वरुप! पण हे मात्र असं नाही!!असणार ती १ डिस्क फक्त! यात ऍनिमेशन, व्हिडिओ, फोटोग्राफ, पेंटिंग, कॅलिग्राफी अशी अनेक माध्यमं हाताळली आहेत. सर्वसामान्य माणूस या सर्वाचा कितपत स्वीकार करु शकेल?? तो या सर्वांना कितपत न्याय देउ शकेल?? म्हणजे या सर्वाची माहिती असणारी व्यक्तीच फक्त याचा आस्वाद घेउ शकेल ना?? रिटायर्ड व्यक्ती/ग्रुहीणी, ज्यांना संगणकांच अतिशय जुजबी ज्ञान आहे/पेन्शनर लोकं / अगदी लहान मूलं इत्यादी याचा आस्वाद कसा घेउ शकतील?? ज्यांच्याक्डे काँप्युटर नाही/जी लोकं पुस्तकं विकत घेउन वाचू इच्छित नाहित त्यांचं काय??

उत्तरः
'कुहू'ची डीव्हीडी केवळ संगणकावरच नव्हे तर डीव्हीडीप्लेअरवर देखील बघता येईल. या सुविधा आता घरोघर पोचल्या आहेत. तरी एक मोठा वर्ग यापासून वंचित आहे. तसेतर छापील पुस्तकांपासूनही वंचित असलेला खूप मोठा वर्ग आहे. "सगळ्यांसाठी" असे आपल्या समाजात काही असू शकत नाही. कारण आपण एकाच काळात अनेक काळ जगतो आहोत. वय, पेशा, गृहिणी असणं किंवा लहान असणं याचा आणि तंत्राचं ज्ञान असल्याचा काही संबंध नाही. माझी अडीच वर्षांची भाची चित्रावरून सीडी ओळखते आणि आपली आपण डीव्हीडी प्लेअर सुरू करून पाहते.हातात पुस्तक ( वयानुसार ) धरवत नाही ( मग ते हिंदूच्या निम्म्या आकाराचे असले तरी! :-)असो.) अशा एका आजींना आम्ही नॅबमधून पुस्तकांच्या सीडी ऐकायला आणून देतो. अशीही अनेक उदाहरणे सापडतील. ब्र आणि भिन्न या माझ्या कादंबर्‍यांच्या आणि निवडक कवितांच्या ऑडियो सीडीज ऐकून मला प्रतिक्रिया कळवणारे वाचकही मोठ्या संख्येने आहेत.

तथापि, 'कुहू' फक्त डीव्हीडीवर नव्हे तर पुस्तकरूपातही उपलब्ध होत आहे. हे पुस्तक पूर्ण रंगीत असेल. त्याचे मुखपृष्ठ ३ डी असेल. इतर तपशील तुम्हांला 'कुहू'च्या साईटवर पहायला / वाचायला मिळतील. जरूर पहावे. http://kuhoo.in

प्रश्न ६, प्रेषकः रोचीन
आपल्याकडे अजुनहि मोबीपॉकेट्/कींड्ल वगैरे गोष्टींचा एवढा प्रसार नाही. म्हणजे पुस्तक वाचायचं तर कंपल्सरी घरातच बसलं पाहीजे हि या पुस्तकाची एक मर्यादा आहे असे नाही का वाटंत??

उत्तरः
आधुनिक गोष्टी लगेच आपल्या भाषेत याव्यात असे वाटणे स्वाभाविक आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. काही काळ त्यात जाईल हे निश्चित.

प्रश्न ७, प्रेषकः रोचीन
लेखनाच्या स्वामित्त्वहक्कांबद्दल आपलं काय मत आहे?? लेखकाला पुर्ण न्याय मिळतो असं वाटतं का तुम्हाला?? जर हो/नाही का?? नाही तर काय करता येइल?

उत्तरः
स्वामित्वहक्क असले पाहिजेतच. मुळात त्याबाबत आपल्याकडे लेखक पुरेसे जागरूक नाहीत आणि प्रकाशक त्याचा चलाखीने फायदा घेतात. अनेक मोठ्या व स्थिरावलेल्या प्रकाशन संस्थांमध्येही रीतसर करारपत्रे केली जाताना दिसत नाहीत. अनुवाद, माध्यमांतर असे काही करायचे असेल की मग पळापळ सुरू होते. त्या गडबडीत लेखक त्यातल्या अटी नीट वाचतही नाहीत. संबंध चांगले असतात तोवर सारेच ठीक असते. पण बिघडायला सुरुवात झाली की वाद सुरू होतात. व्यवहाराच्या जागी व्यवहार न ठेवता भावनिक मुद्दे अकारण मध्ये आणून करारपत्र, रॉयल्टी अशा गोष्टींबाबत काही ठरवले, केले जात नाही. 'राजहंस'सारखे व्यवहाराला चोख असलेले प्रकाशक मला मिळाले, ही व्यक्तिशः समाधानाची गोष्ट आहे.

पण त्याचवेळी इतर प्रकाशकांचा अनुभव चांगला नाही. उदा. 'रजई'ची दुसरी आवृत्ती आली हे मला मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळे यांनी कळवलेही नाही. पहिल्या संपलेल्या आवृत्तीची रॉयल्टी देणे दूरच, पण पुस्तकाच्या पाच प्रती पाठवायच्या असतात, त्याही पाठवल्या नाहीत. 'कुरीयरचा खर्च खूप होतो' म्हणून कधी दादरला / गिरगावात आलात तर प्रती घेऊन जा, असे सांगितले. वर पुन्हा "हे पुढच्या ग्राफिटीवॉल मध्ये लिहू नका" असे हसत-हसत सांगितले. ( तो विनोद होता म्हणे!).

मौज प्रकाशनानेही 'धुळीचा आवाज' ची दुसरी आवृत्ती काढली हे मला वाचकांकडून समजले. कवीला आपल्या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाल्याचे ऐकून हार्टअ‍ॅटक येईल असे त्यांना बहुतेक वाटले असावे. म्हणून काळजीपोटी त्यांनी कळवले नसावे.

मी माझ्या पुस्तकांची रीतसर करारपत्रे केलेली आहेत. आणि माझ्या मृत्यूनंतर त्यांचा हक्क माझ्या मुलीकडे जाईल, हेही सर्व लेखी कायदेशीर पद्धतीने केले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
यांखेरीज रोचीनचा आणखी एक प्रश्न होता: आपण फेसबुक वरहि आहात. तीथे येण्याचं काही खास कारण?? तीथे तुमच्या फ्रेंड्स लीस्ट मधे विविध वयोगटातील लोकं आहेत. त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो?
या प्रश्नावर मुलाखतीच्या वेळेस सुरूवातीलाच अनौपचारिक चर्चा झाली होती. आता मला अगदी त्यांच्या शब्दात सांगता नाही यायचं, पण भावना नक्की पोचवू शकते.
कविताताईंच्या मते: आपल्याला आपल्या मित्रांसोबत बरेच काही शेअर करायचं असतं. आजकालच्या जमान्यात ते शेअर करायचं मोठं आणि सोपं साधन म्हणजे, फोन किंवा मोबाईल. आता ते अशा माध्यमांतून आपल्या प्रियजनांपर्यंत पोचवायचं म्हणजे त्यासाठी आपण स्वतः वेगळा वेळ देऊन कॉल करून किंवा मेसेज पाठवून करावं लागेल. असं करताना मुख्यतः आपल्या वेळेचा मोठा प्रश्न येतो आणि थोडेफार पैशाचं गणितही येतं. हे दोन्ही जरी आपल्याकडून सांभाळता आलं, तरी किती लोकांना फोन करणार किंवा मेसेज पाठवणार यावर बंधनं आलीच. त्याहीपलिकडे जाऊन, आपण आपल्या वेळेसोबत आणखी इतरांचाही वेळ अप्रत्यक्षरित्या मागतो, जो प्रत्येकवेळी प्रत्येकाकडे तितकाच मुबलक असेलच असे नाही. आणि उत्तर देताना आपसूकच त्यांचाही खर्च होऊच शकतो. पण तेच जर फेसबुक सारख्या माध्यमाचा वापर करून केलं, तर आपण आपल्या सवडीने एखादं काम करता करताही ती गोष्ट स्टेटस मेसेज मधून लिहू शकतो, ती सगळ्यांपर्यंत पोचते, ज्याला किंवा जिला उत्तर द्यायचं, ती व्यक्तीसुद्धा तिच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार उत्तर देऊ शकते. आणि यात खर्च म्हटलं तर तसा नगण्यच!!!
फेसबुकमधल्या विविध वयोगटातील लोक असतील तरी प्रतिसाद खूपच चांगला मिळतो. एखादा नवीन स्टेटस मेजेस टाकल्यानंतर बर्‍याचदा पाचेक मिनिटांत किमान चाळीसभर प्रतिसाद येतात.
हा माझा देखिल अनुभव आहे. आणि प्रत्येक मेसेजला प्रत्येकाचा वेगळया दृष्टीकोनातून येणारा प्रतिसाद वाचणं म्हणजे गंमत असते. एक उदाहरण देते. एकदा कविताताईंनी एक मस्त संध्याकाळचा फोटो टाकला होता आणि त्या मूडला साजेशा अशा छानशा ओळी फोटोला कॅप्शन म्हणून होत्या. मग सगळ्यांची त्यावर कविता/गझलांच्या ओळी टाकण्याची स्पर्धाच लागली. सगळे प्रतिसाद एकसे बढकर एक होते. आणि एक प्रतिसाद आला, "बांगडा दिसतोय!!!". [फोटोत सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर दोन काठ्यांवर टांगलेले मासे होते] अर्जुनाची दृष्टी, दुसरं काय? :-)

कविताताई, या उत्तरांसाठीही मी पुस्तकविश्वतर्फे तुमचे आभार मानते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी

अभिप्राय

ऋषिकेश

ऋषिकेश · Mon, 29 Nov 2010 - 17:49

कविता महाजन यांचे उत्तराबद्दल अनेक आभार व ते पोचवल्याबद्दल मकचे डब्बल आभार. :)
आता राणी बंग यांचे पुस्तक शोधतो

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Mon, 29 Nov 2010 - 18:26 · उत्तर

कविताताईंचा वाचकांशी संवाद साधण्याचा उपक्रम आवडला.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Mon, 29 Nov 2010 - 18:33

"....विद्यार्थ्यांच्या पक्वतेचा. तो कलाशाखेत जे असंख्य विद्यार्थी एमफील / पीएचडी करताहेत त्यांच्या एकुणच आकलनाबाबत संशय वाटावा अशी परिस्थिती आहे. ....."

~ विविधतेने नटलेल्या आपल्या कामात अत्यंत व्यग्र अशा लेखिकेने वाचकांच्या प्रश्नांना रातोरात उत्तरे पाठविली/लिहिली [अन् तेही सविस्तरपणे] ते पाहून त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदरात भरच पडली असे मी म्हणतो. त्यांच्या [माझ्या प्रश्नाच्या] उत्तरातील वरील भाग तर संशोधकांच्या गुणवत्तेची नक्की व्याख्या काय असावी असा प्रश्न निर्माण करणारी सध्याची (सर्वच) विद्यापीठातील परिस्थिती आहे....जिचा विचार आता युजीसी पातळीवर चालू आहे....त्यातून काही भरीव आणि उपयुक्त असे काही निष्कर्ष येतील याची सुतराम शक्यता नाही, त्याला कारण म्हणजे पीएच.डी. आणि वेतनातील दोन/तीन इन्क्रिमेन्ट्सचे "व्यावहारिक" गणित.

महाजन मॅडमनी लिहिल्याप्रमाणे श्री.जयदेव डोळे (जे स्वतः एक नावाजलेले पत्रकार-प्राध्यापक आहेत) यानी या वेदनेला विविध माध्यमातून वाचा फोडली आहेच. ज्या विद्यापीठातून १ महिन्याला सरासरी २३ संशोधक विद्यार्थी पीएच.डी. घेऊन बाहेर पडतात ते पाहून संशोधनाची पातळी कुठल्या लेव्हलला आली आहे यावरही श्री.डोळे यानी प्रखर आसूड ओढले आहे. पण तरीही, दुर्दैवाने, ते अरण्यरुदन ठरणार असेच विषण्ण करणारे चित्र सध्या विद्येच्या प्रांगणात दिसत आहे.

पण असो. कविता महाजन यानी कादंबरी 'काटछाटीला मान्यता देणार नाही...' ही भूमिका या निमित्ताने मांडली, तिचे मी स्वागत करतो....त्यांच्या मराठी शारदेच्या प्रांगणातील उज्ज्वल वाटचालीसाठी एक वाचक या नात्याने मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

इन्द्रा

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Mon, 29 Nov 2010 - 18:51 · उत्तर

इंद्रा आणि वाचक मित्रमैत्रिणींनो,
या धाग्याचा दुवाही मी कविताताईंना पाठवला आहे. त्यांना वेळ मिळाल्यास त्या इथल्याही चर्चेत काही मत मांडतील अशी मला आशा आहे.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Tue, 30 Nov 2010 - 03:45

संयम इथूनच सुरू होतो. आदर इथूनच सुरू होतो. जपणूक इथूनच सुरू होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांना कदाचित 'संस्कार' म्हटले जात नसेल, पण ते संस्कारच असतात. साठवणूक नाही. हावरटपणा नाही. लुबाडणे, चोरी, बलात्कार नाही.

बालिश दावा.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Tue, 30 Nov 2010 - 12:51 · उत्तर

आपण आपले मत स्पष्टपणे मांडल्याबद्दल धन्यवाद. पण असे वाटण्यामागची कारणे समजून घ्यायला आवडेल.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Wed, 1 Dec 2010 - 03:38 · उत्तर

चिंतातुर जंतू यांनी या धाग्यात पुढे 'नोबल सॅवेज' या संकल्पनेचा उल्लेख केला आहेच. विकीपीडियावरील लेख बहुतांशी, 'साहित्यिकांनी त्या संकल्पनेला दिलेली वागणूक' या दृष्टीनेच लिहिलेला आहे. ऐतिहासिक माहितीचा अभ्यास आणि वैज्ञानिक निरीक्षणे यांनुसार ती संकल्पना निराधार आहे.
एकच उदाहरण देतो: "ते साठवणूक करताना का दिसत नाहीत? तर त्यांच्याकडे साठवणुकीसाठी तंत्रज्ञान नसते म्हणून!" अशी उत्तरे सापडतात. व्याभिचार, साठवणूक, बलात्कार, चोरी, इ. या जैविक प्रेरणा आहेत. सुसंस्कृत समाजात त्या दडपल्या जातात, आदिम समाज निसर्गाच्या अधिक जवळ असतात ना!
आदिवासींना वनौषधींची माहिती असते. त्या माहितीचा एक महत्वाचा उपयोग "व्याभिचारिणीने पतीचा खून करणे" हा आहे.

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Wed, 1 Dec 2010 - 08:31 · उत्तर

व्याभिचार, साठवणूक, बलात्कार, चोरी, इ. या जैविक प्रेरणा आहेत.

व्याभिचार, साठवणूक, बलात्कार, चोरी आणि जैविक प्रेरणा यांच्या व्याख्या काय आहेत?

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Wed, 1 Dec 2010 - 08:40 · उत्तर

कविता महाजन यांनी ज्या अर्थांनी "व्याभिचार, साठवणूक, बलात्कार, चोरी" हे शब्द वापरले त्याच अर्थांनी मीही वापरले आहेत. तुम्हाला व्याख्या हव्या असतील तर आधी त्यांच्याकडे मागणे सयुक्तिक ठरेल.
जैविक प्रेरणा म्हणजे "उत्क्रांतीमध्ये यशस्वी जनुकांनी ठरविलेल्या प्रवृत्ती" अशी व्याख्या पटते काय ते कृपया सांगा.

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Wed, 1 Dec 2010 - 08:47 · उत्तर

तुम्हाला व्याख्या हव्या असतील तर आधी त्यांच्याकडे मागणे सयुक्तिक ठरेल.

मूळ व्याख्या न समजताच 'बालीश', 'निराधार' अशा शब्दांचा वापर? चालू द्या असंही म्हणवत नाही आणि प्रतिवाद करण्यासाठी माझं डोकं हिरा किंवा फायबरचं नाही. तेव्हा " ......... " हेच बरं!

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Wed, 1 Dec 2010 - 09:16 · उत्तर

ज्या काही व्याख्या कविता महाजन ठरवतील त्या मला मान्य असतील. मला व्याख्या समजल्या आहेत. परंतु त्या तुम्ही माझ्याकडे मागितल्यात. कविता महाजन यांनीही ते शब्द वापरलेले असूनही त्यांना व्याख्या मागितल्या नाहीत, या खोडसाळपणाचा विरोध म्हणून मी व्याख्या देणार नाही.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Wed, 1 Dec 2010 - 10:52 · उत्तर

चिंतातुर जंतू यांनी या धाग्यात पुढे 'नोबल सॅवेज' या संकल्पनेचा उल्लेख केला आहेच. विकीपीडियावरील लेख बहुतांशी, 'साहित्यिकांनी त्या संकल्पनेला दिलेली वागणूक' या दृष्टीनेच लिहिलेला आहे. ऐतिहासिक माहितीचा अभ्यास आणि वैज्ञानिक निरीक्षणे यांनुसार ती संकल्पना निराधार आहे.
एकच उदाहरण देतो: "ते साठवणूक करताना का दिसत नाहीत? तर त्यांच्याकडे साठवणुकीसाठी तंत्रज्ञान नसते म्हणून!" अशी उत्तरे सापडतात. व्याभिचार, साठवणूक, बलात्कार, चोरी, इ. या जैविक प्रेरणा आहेत. सुसंस्कृत समाजात त्या दडपल्या जातात, आदिम समाज निसर्गाच्या अधिक जवळ असतात ना!
आदिवासींना वनौषधींची माहिती असते. त्या माहितीचा एक महत्वाचा उपयोग "व्याभिचारिणीने पतीचा खून करणे" हा आहे.

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद. आपले म्हणणे सयुक्तिक आहे की नाही हा विषय बाजूला ठेवू. पण आपल्या युक्तिवादामुळे कविताचे म्हणणे फार तर निराधार ठरते. ते बालिश कसे हे नाही समजले. का निराधार आणि बालिश हे एकच असते? समजून घ्यायला आवडेल.

आता निराधार कडे वळू.

एखादी व्यक्ति एखाद्या समस्येवर काम करताना वर्षानुवर्षे एखाद्या मानवसमूहात पूर्णपणे मिसळून राहत असताना केलेल्या निरिक्षणांवर आणि साधलेल्या संवादांच्या आधारे काही मत मांडत असेल, आणि त्या काळात केलेली निरिक्षणे नीट टिपून ठेवली असतील, त्याचे विश्लेषण केले असेल तर, ते मत निराधार म्हणता येईल का? फारतर विश्लेषण चूक आहे असे म्हणता येईल / सिद्ध करता येईल. पण निराधार कसे?

वरील दोन्ही प्रश्नांबद्दल तुमचे मत वाचायला आवडेल.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Wed, 1 Dec 2010 - 12:49 · उत्तर

आपल्या युक्तिवादामुळे कविताचे म्हणणे फार तर निराधार ठरते. ते बालिश कसे हे नाही समजले. का निराधार आणि बालिश हे एकच असते? समजून घ्यायला आवडेल.

आता निराधार कडे वळू.

एखादी व्यक्ति एखाद्या समस्येवर काम करताना वर्षानुवर्षे एखाद्या मानवसमूहात पूर्णपणे मिसळून राहत असताना केलेल्या निरिक्षणांवर आणि साधलेल्या संवादांच्या आधारे काही मत मांडत असेल, आणि त्या काळात केलेली निरिक्षणे नीट टिपून ठेवली असतील, त्याचे विश्लेषण केले असेल तर, ते मत निराधार म्हणता येईल का? फारतर विश्लेषण चूक आहे असे म्हणता येईल / सिद्ध करता येईल. पण निराधार कसे?

वरील दोन्ही प्रश्नांबद्दल तुमचे मत वाचायला आवडेल.

त्यांचे मत हे निरीक्षणावर आधारित असल्याच्या दाव्यावर बहुसंख्य निरीक्षकांचे दावे संशय उत्पन्न करतात. माझा असा संशय आहे की ते विधान विशफुल थिंकिंग आहे. विशफुल थिंकिंगला बालिश म्हणणे तुम्हाला मान्य असेल तर "बहुसंख्य निरीक्षकांचे दावे" काय आहेत याची चर्चा करता येईल.

कविता महाजन

कविता महाजन · Tue, 30 Nov 2010 - 04:52

१. इंद्रराज पवार :
अजून एक निरीक्षण : युजीसीने एक सवलत अजून दिलेली आहे. प्राध्यापक मंडळी जी पुस्तके स्वतः विकत घेतील, त्यातील अर्धे पैसे युजीसी देईल. १० ते २५ % पुस्तकविक्रेत्यांकडून मिळणारी सवलत + युजीसीकडून मिळणारी रक्कम हे पाहता पुस्तक मूळ किमतीहून साधारण ५०-६०% सवलतीने पदरी पडते. तरी या योजनेचा फायदा घेणारे प्राध्यापक सापडत नाहीत. "कॉलेजच्या लायब्रीत असतेच. नसलं तं मागवू... सोता काऊन पदराले खार लावायचा?" अशी भूमिका दिसते. स्वतःचा ग्रंथसंग्रह असावा, असे या लोकांना वाटत नाही, ही किती शरमेची गोष्ट आहे!

२. स्पिन डॉक्टर :
तुम्हांला हे 'बालिश' वाटणे स्वाभाविक आहे. भाबडे, अतिशयोक्त, एकांगी अशी अजूनही काही विशेषणे मी इतरत्र अशा विधानांवर ऐकलेली आहेत. आपल्या समाजात आज अशी परिस्थिती कुठे असू शकते, यावर विश्वास बसू नये, असेच सारे आपण बघत / अनुभवत आलो आहोत. पण मी जी विधाने करते ती केवळ 'भावनिक' नसतात, ( माझ्या वा इतरांच्या ) अनुभवांमधून / निरीक्षणांमधून विचारान्ती केलेली असतात.
आदिवासींनी आपले आयुष्य खूप सोपे बनवून ठेवलेले आहे. लग्न, घटस्फोट, विधवेचा वा घटस्फोटितेचा पुनर्विवाह, दत्तक पद्धती इत्यादी गोष्टींची प्रक्रिया अत्यंत सोपी व कमी वेळेत होणारी आहे. त्यामुळे तिथे बलात्कार तर दूरच, व्यभिचारही आढळत नाही. जर कधी अशी घटना घडलीच तर त्यासाठीच्या शिक्षा भयानक आहेत, ज्यांच्या दंतकथा कायम ऐकवल्या जातात. इतक्या वर्षांत व्यभिचाराची एक केस मी शहापूरला ठाकूर या आदिवासी जमातीत पाहिली होती. त्या बाईची डोक्यावर दगडी पाटे ठेवून, गावातून नग्न धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर तिच्या घरातले सर्व सामान विकून टाकून दंड पंचायतीकडे जमा झाला आणि त्या बाईचा 'लिलाव' करण्यात आला. तिला जो माणूस जास्तीत जास्त त्रास देईल ( मारहाण / बेवडेगिरी / शिवीगाळ / अधिक काम करवून घेणे ) अशा माणसाला केवळ १०० रु. किमतीला तिची विक्री झाली. याबाबत संघटनाही काही भूमिका घेऊ शकली नाही, कारण 'नैतिक' मुद्दा होता! त्याबाबत संघटनेचं काहीही ऐकण्यास आदिवासी कार्यकर्ते तयार नव्हते.
ज्यांना लग्नखर्च शक्य नाही, त्यांच्यासाठी 'घरोरी' सारख्या प्रथा ( आपले लिव्ह इन हो!) समाजमान्य आहेत. तिथे कुठे 'भिकारी'देखील दिसणार नाहीत, दिसलाच तर तो 'बाहेरून आलेला' असणार हे नक्की!
अजून एक न सापडलेली गोष्ट म्हणजे - ज्योतीष / रमल. "पुढचे काय" याची उत्सुकता नाही. दोन पिढ्या आधीची नावेही सांगता येत नाहीत. 'वर्तमानात जगणारी' माणसे आहेत ही.
"साठवण नको" अशा काही ज्या सवयी आहेत, त्यांचे भरपूर तोटेही आहेत. पण त्याबाबत सांगून-समजावून काही फरक पडत नाही, असाच अनुभव आहे. घरात मांस शिल्लक आहे म्हटल्यावर समोरून ससा गेला तरी शांत बघत बसतील, पण बेगमी करणार नाहीत. संपले म्हटल्यावर निघाले शिकारीच्या शोधात!
अशी अनेक वास्तवं आहेत. जी वास्तवं आपल्या अनुभवाच्या कक्षेत नसतात, ती आपल्याला 'काल्पनिक'च वाटत राहतात.

३. रोचीन :
फेसबुकसह आता मी अधूनमधून 'पुस्तकविश्व'वर देखील फेरी मारणार आहे. :-). मुळात मला 'संवाद / गप्पा / बडबड' इत्यादी आवडते. आणि इथे 'पुस्तकांच्या आतले आणि आजूबाजूचे' ऐकता/ बोलता येणार आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

आनंदयात्री

आनंदयात्री · Tue, 30 Nov 2010 - 06:45 · उत्तर

सुरेख मुद्देसूद प्रतिसाद. अत्यंत आवडला.

रोचीन

रोचीन · Tue, 30 Nov 2010 - 12:11 · उत्तर

सर्व प्रश्नांना न कंटाळता उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद !!
कुहु ला अनेक शुभेच्छा!!बाकी इथेही भेट होत राहीलच!!
पण खाली मेघनाला पडलेला प्रश्न मलाहि पडला आहे!!त्याचं निराकरण जर झालं तर बरं होईल!!

सागर

सागर · Tue, 30 Nov 2010 - 07:01

कविताजींनी खूप मोलाचे विचार मांडले आहेत. सविस्तर उत्तर दिल्याबद्दल कविताजींना शतशः धन्यवाद
पुढील विचारांनी मला तरी खूप प्रभावित केले.
हेच ते वास्तव जीवन ज्यात आनंद लपला आहे. :)

बाजार ज्यांच्या हातात आहे ते लोक बदलतात, तसे आपले कलही बदलायला लागतात. इतके आपण त्या प्रवाहात अडकलेलो आहोत. आणि आपली मुळे कोणत्या मातीत आहेत हे विसरून गेलो आहोत

पावसाळा सुरु झाला की वाटेवर उगवणार्‍या पालेभाज्या कुणीही उगाच तोडून खायला सुरुवात करणार नाही.

पूजा होत नाही तोवर बारकी पोरंही झाडाखाली पडलेली कैरी उचलणार नाहीत. संयम इथूनच सुरू होतो. आदर इथूनच सुरू होतो. जपणूक इथूनच सुरू होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांना कदाचित 'संस्कार' म्हटले जात नसेल, पण ते संस्कारच असतात. साठवणूक नाही. हावरटपणा नाही. लुबाडणे, चोरी, बलात्कार नाही. खरा आनंद, खरे सुख, जगण्यातला सोपेपणा, सहजता कशात आहे, हे ज्यांना समजले त्यांना या झगमगाटाचे काय कौतुक वाटणार? त्रासच होतो आणि उबगच येतो.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 07:02

सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मनापासून आभार.

निसर्गाशी वागताना आपण बर्‍याच गोष्टी आदिवासी समाजांकडून शिकलो तर फार बरे होईल.

पण शेवटी दोन संस्कृतींचा संघर्ष अटळ आहे. आजूबाजूच्या नागर समाजात आदिवासी संस्कृतीचे बेट टिकणे; बेट व इतर समाज यांनी परस्परांबद्दल आदर बाळगणे आणि एकमेकांचे शोषण न करणे - हे अशक्यप्राय आहे. या बदलांतून काय काय निघते ते पाहायचे.

बाकी माझं चुकतही असेल, मला काही बाजू दिसल्याही नसतील. तसं असेल तर सांगा, पण हे मात्र फार खटकले -

आदिवासींनी आपले आयुष्य खूप सोपे बनवून ठेवलेले आहे. लग्न, घटस्फोट, विधवेचा वा घटस्फोटितेचा पुनर्विवाह, दत्तक पद्धती इत्यादी गोष्टींची प्रक्रिया अत्यंत सोपी व कमी वेळेत होणारी आहे. त्यामुळे तिथे बलात्कार तर दूरच, व्यभिचारही आढळत नाही. जर कधी अशी घटना घडलीच तर त्यासाठीच्या शिक्षा भयानक आहेत, ज्यांच्या दंतकथा कायम ऐकवल्या जातात. इतक्या वर्षांत व्यभिचाराची एक केस मी शहापूरला ठाकूर या आदिवासी जमातीत पाहिली होती. त्या बाईची डोक्यावर दगडी पाटे ठेवून, गावातून नग्न धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर तिच्या घरातले सर्व सामान विकून टाकून दंड पंचायतीकडे जमा झाला आणि त्या बाईचा 'लिलाव' करण्यात आला. तिला जो माणूस जास्तीत जास्त त्रास देईल ( मारहाण / बेवडेगिरी / शिवीगाळ / अधिक काम करवून घेणे ) अशा माणसाला केवळ १०० रु. किमतीला तिची विक्री झाली. याबाबत संघटनाही काही भूमिका घेऊ शकली नाही, कारण 'नैतिक'
मुद्दा होता! त्याबाबत संघटनेचं काहीही ऐकण्यास आदिवासी कार्यकर्ते तयार नव्हते.

ज्या समाजात व्याभिचारासारख्या गोष्टीला (गृहितकः स्त्री-पुरुष दोहांचीही संमती संबंधांना असेल) अशा प्रकारची भीषण शिक्षा होते, ही मनुष्यविक्रीपर्यंत जाणारी शिक्षा फक्त स्त्रीला होते (जर माझी माहिती चुकीची असेल, तर सुधारणा करा, पण पुरुषाला केलेल्या शिक्षेचा उल्लेख नाहीय आणि एकटी स्त्री व्याभिचार करणे कठीण आहे)आणि त्यात इतर कुणीही काहीही करत नाही / करू शकत नाही - त्या समाजात काहीतरी बदल व्हायला नको? नाहीतर जातिबाह्य विवाह केल्याची शिक्षा म्हणून जोडप्याला जाळणारे रानटी गावकरी आणि सुसंस्कृत आदिवासी यांत फरक काय राहिला?
संयम,आदर वगैरे गोष्टी इथे वापरल्या जात नाहीत? जायला नकोत? त्या वापरल्या जात नसतील, तर इतरांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे?
कडक शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला जरब आणि पर्यायाने गुन्हे कमी होत जाणे, असे खरेच घडते का? हे अमानुष नाहीये का?

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 30 Nov 2010 - 09:20 · उत्तर

मेघनाशी सहमत आहे. तिने विचारलेले प्रश्न मलाही पडले.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Tue, 30 Nov 2010 - 10:21

आता ही चर्चा काहीशी 'प्रिमिटिव्हिझम' किंवा 'नोबल सॅव्हेज'च्या अंगानं जात आहे असं दिसतंय. त्यामुळे तो दुवा आणि विशेषतः या संकल्पनेला विरोध करणार्‍यांविषयीची माहिती वाचावी. त्यात विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'चा उल्लेख आहे. तो इथल्या अनेकांना रोचक वाटावा.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 10:32 · उत्तर

मलापण 'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज'ची आठवण झाली!

श्रावण मोडक

श्रावण मोडक · Tue, 30 Nov 2010 - 12:19

कवितांचा प्रतिसाद, त्यावरचे प्रतिप्रतिसाद... चर्चा रंगते आहे. वाचतो आहे. :)

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Tue, 30 Nov 2010 - 12:50

खरं तर मराठीतील प्रथितयश साहित्यिकाने असे वाचकांबरोबर 'टू-वे' संवाद साधणे, ते पण ऑनलाईन ही एक फार मोठी घटना आहे. असा पायंडाच पडावा अशी आशा आहे. प्रश्न आणि उत्तरे आणि प्रतिप्रश्न आणि प्रतिउत्तरे आवडली. ही चर्चा अजून पुढे जावी.

सागर

सागर · Tue, 30 Nov 2010 - 13:20 · उत्तर

खरं तर मराठीतील प्रथितयश साहित्यिकाने असे वाचकांबरोबर 'टू-वे' संवाद साधणे, ते पण ऑनलाईन ही एक फार मोठी घटना आहे.

पूर्ण सहमत आहे.
असे किती लेखक आहेत जे ऑनलाईन माध्यमातून आपल्या वाचकांशी एवढ्या तत्परतेने आणि कार्यक्षमतेने संवाद साधतात? क्वचितच असे दृष्य पहावयास मिळते. यानिमित्ताने वाचकांना जशी लेखकाची भूमिका स्पष्टपणे कळते तसेच लेखकाला देखील वाचक कोणकोणत्या पैलूंनी त्यांच्या लेखनाकडे पाहतात हे देखील कळते. तेव्हा हा दोन्ही बाजूने होणारा प्रवास (खरे तर संवाद) आहे. पण त्यातून दोघांचाही फायदा होतो हे नक्की.

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 30 Nov 2010 - 14:30

"....तरी या योजनेचा फायदा घेणारे प्राध्यापक सापडत नाहीत. ..."

~~ कविताताईंनी सकाळीच वरील प्रतिसाद दिला होता; पण यावर लिहावे की नाही या संभ्रमात होतो. पण म.क.च्या या सुंदर धाग्यावर येत असलेले तितकेच स्पृहणीय प्रतिसाद पाहून हा धागा विविध अंगांनी फुलत जावा....{कदाचित महाजन याना पुढील कादंबरीची बीजेही सापडतील.} म्हणून एक अनुभव इथे विशद करण्याचे धाडस करीत आहे.

Teachers Personal Library ही विविध विद्यापिठांनी प्राध्यापकांसाठी राबविलेली अभिनव योजना मला माहित आहे (माझा एक मावसभाऊ सीनीअर स्केल प्राध्यापक असल्याने या क्षेत्रातील बरीच माहिती माझ्या दप्तरी आहेच, शिवाय या ना त्या निमित्ताने युनि.संबंधित चळवळीशींही मी सक्रीय निगडित असल्याने कित्येक विदादेखील न मागता येऊन पडतोच).

या चांगल्या स्कीमअंतर्गत जे पुस्तके खरेदी करत नाहीत, त्याना एकवेळ क्षमा करू, पण चांदोबाचा एखादा अंकही न घेता पुस्तकांची बिले महाविद्यालयामार्फत विद्यापीठात जमा करून ग्रॅन्ट्स 'वसूल' करणारे जे Stalwarts आहेत त्यांच्या प्रवृत्तीविषयी काय लिहू मॅडम? कोल्हापुरातील दोन पुस्तकालये मला (आमच्या ग्रुपला....तेथील मालकाचा मुलगाही आमच्याच बरोबर विद्यापीठात शिकत होता) माहिती आहेत जिथे अशी फॅब्रिकेटेड बिल्स टक्केवारी तत्वावर 'तयार' करून दिली जात असत... बरीच ओरड झाल्यावर त्यावर आता बर्‍यापैकी चाप बसला आहे, पण प्रकार पूर्णतया थांबलेला नाही.

प्राध्यापकांच्या असल्या सवयीविरूद्ध काही निवेदने सीनेट सदस्यांना दिली गेली....परिणाम शून्य. रजिस्ट्रारना विनंती केली की, 'ज्यावेळी पुस्तकांची बिले विद्यापीठात येतात त्यावेळी विद्यापीठ ग्रंथालयामार्फत त्या बिलातील पुस्तकांवर Purchased Under University Teacher's Personal Library Scheme असा एक छोटासा आयताकृती शिक्का मारल्यानंतरच ते बिल मंजूर करावे, म्हणजे निदान पुस्तके खरेच विकत घेतली असे सिद्ध होईल.....याला विद्यापीठ ग्रंथालयाने विरोध दर्शविला, त्यांच्या म्हणण्यानुसार अगोदरच ते "अंडरस्टाफ" काम करतात, तर अशात हे शिक्क्याचे खेंगटू आमच्या डोक्यावर लादू नका....थोडक्यात ती 'शिक्का' योजना बारगळली.....आणि प्राध्यापकांनी पुस्तक खरेदीचा 'उत्साह' नव्याने जनरेट केला.

सगळा आनंद आहे.....डॉ.जयदेव डोळे यानाही हे माहित असेलच...आणि यदाकदाचित जर त्यानी इथले प्रतिसाद वाचले तर तेही इथल्या मतांना टेकूच देतील.

इन्द्रा

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Tue, 30 Nov 2010 - 15:13 · उत्तर

बाप रे, हे गलिच्छ आहे... आपण काहीच नाही का करू शकत याविरुद्ध?

मस्त कलंदर

मस्त कलंदर · Tue, 30 Nov 2010 - 15:20 · उत्तर

ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, मी मुंबईतल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते.

आमच्या इथे प्रत्येक कायमस्वरूपी नोकरीवर असलेल्या व्यक्तीस (लेक्चरर ते प्राध्यापक सगळेच) दरवर्षी रू १००० पुस्तक खरेदीसाठी मिळतात. पैसे मिळण्यासाठी वर्षातून एकदा ती पुस्तके ग्रंथपालांना दाखवावी लागतात, आणि तिथल्या शिपायांकडून त्याच्या पहिल्या पानावर, नांव, विभागाच्या नावाचा शिक्का मारून ती माहिती भरली जात असे. त्यावर काही लोकांनी ते पहिले पान फाडायचे आणि तेच पुस्तक पुन्हा आणायचे असा प्रकार चालू केला. त्यामुळे आता पहिल्या पानावर तसेच पुस्तकाच्या स्पाईनच्या विरूद्ध बाजूला( जिथे आपण लहानपणी आपले नांव लिहायचो :-))तिथेही असाच शिक्का मारला जातो. त्यामुळे तेच पुस्तक पुन्हा शिक्क्यासाठी येऊ शकत नाही तसेच पुस्तक दाखवल्याशिवाय पैसेही मिळत नाहीत. सध्या मी स्टडी लिव्हवरती असले तरीही मला ही सवलत मिळते आहे.

अर्थात ही पद्धत विद्यापीठासारख्या ठिकाणी जिथे शिक्षकांची संख्या जास्त आणि शिपायांचा सर्कारी खाक्या यात कितपत अंमलात येऊ शकेल ही शंकाच आहे.
असो, आता खूपच अवांतर झाले. पुढील चर्चा आपण खव मध्ये करूयात. :-)

कविता महाजन

कविता महाजन · Tue, 7 Dec 2010 - 18:27

ज्या समाजात व्याभिचारासारख्या गोष्टीला (गृहितकः स्त्री-पुरुष दोहांचीही संमती संबंधांना असेल) अशा प्रकारची भीषण शिक्षा होते, ही मनुष्यविक्रीपर्यंत जाणारी शिक्षा फक्त स्त्रीला होते (जर माझी माहिती चुकीची असेल, तर सुधारणा करा, पण पुरुषाला केलेल्या शिक्षेचा उल्लेख नाहीय आणि एकटी स्त्री व्याभिचार करणे कठीण आहे)आणि त्यात इतर कुणीही काहीही करत नाही / करू शकत नाही - त्या समाजात काहीतरी बदल व्हायला नको? नाहीतर जातिबाह्य विवाह केल्याची शिक्षा म्हणून जोडप्याला जाळणारे रानटी गावकरी आणि सुसंस्कृत आदिवासी यांत फरक काय राहिला?
संयम,आदर वगैरे गोष्टी इथे वापरल्या जात नाहीत? जायला नकोत? त्या वापरल्या जात नसतील, तर इतरांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे?
कडक शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला जरब आणि पर्यायाने गुन्हे कमी होत जाणे, असे खरेच घडते का? हे अमानुष नाहीये का?

मेघना :
ही शिक्षा स्त्री आणि पुरुष दोघांनाही होते. मात्र त्याचे स्वरूप निरनिराळे असते. स्त्रीचा लिलाव केला जातो, तर पुरुषाला निरनिराळ्या 'शारीरिक शिक्षा' दिल्या जातात. बेदम मारहाण केली जाते. त्यातून शारीरिक व्यंग निर्माण होऊ शकते. त्याची 'मालमत्ता' जप्त केली जाते. त्याला वाळीत टाकून जातीबाहेर काढले जाते. त्याचे सर्व कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक हक्क नाहीसे होतात.
जातिबाह्य विवाह केल्याची शिक्षा म्हणून जोडप्याला जाळणारे रानटी गावकरी आणि सुसंस्कृत आदिवासी यांत निश्चितच फरक आहे. कारण इथे अनेक गोष्टींचे 'स्वातंत्र्य' आहे. कोणत्याही कारणास्तव माणसे ( स्त्री व पुरुष दोघेही) घटस्फोट घेऊन दुसरा संसार थाटू शकतात. ( त्यांनी पुन्हा लग्नच केले पाहिजे असाही नियम नाही. ) दुसरी व्यक्ती आवडली, असे स्पष्ट कारण सांगूनही पंचांसमोर देज परत देऊन स्त्री घटस्फोट घेऊ शकते. 'देज परत देणे' हीच एकमेव अट असते. काडीमोड इतकी सोपी असताना व्यभिचार करण्याची गरज का भासावी? तेही घटस्फोटानंतर 'सामाजिक प्रतिष्ठा' धोक्यात येत नसताना? - हा त्यांचा सरळ प्रश्न होता. लग्नाआधीचे मुक्त लैंगिक संबंध मान्य आहेत; पण लग्नानंतरचे नाही; कारण लग्न ही गोष्ट 'सामाजिक' नसून 'धार्मिक' मानली जाते.

दुसरा मुद्दा म्हणजे संयम, आदर या बाबत समाजागणिक, काळानुसार चौकटी बदलतात. 'ए आई' म्हटल्याने आपण आईचा निरादर करत नाही; पण 'ए बाबा' म्हणणे माझ्या पिढीत निरादराचे होते. ( आज आमची पोरे 'ए बाबा' म्हणतात! ) आजोळच्या नात्यांना 'ए' चालते, पण वडिलांकडच्या नात्यांत चालत नाही. हे पुन्हा प्रत्येक जातीत, धर्मात, समाजात निरनिराळे आहे. आपल्या संयमाच्या व्याख्या तिथे हास्यास्पद ठरू शकतात; कारण आपले वागणे त्यांना 'निसर्गाला अनुसरून नसलेले' वाटते. एक उदाहरण सांगते :
सलग पंधरा दिवस मी एका वस्तीत रहायला होते, तेव्हा जिच्या झोपडीत होते तिने वस्तीतला एक तरुण मुलगा दाखवून "कसा वाटतो?" असे विचारले. मी सहजपणे "चांगला आहे की..." असे उत्तर दिल्यावर तिने "त्याला रात्री तुझ्याकडे पाठवू का?" असे विचारले. मग मी गमतीनं उलट विचारलं की,"तुझा नवरा का नको?" तर ती म्हणाली,"हा मुलगा बिनलग्नाचा आहे. माझ्या नवर्‍याचं लग्न झालंय!" मग मला हा प्रश्न का विचारावा वाटला, असं मी तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली,"तू इतके दिवस घराबाहेर आहेस, तर तुला गरज लागणार नाही का? आणि पुन्हा गरज दडपून ठेवण्याचं काडीमोड झालेला असल्याने तुला काहीच कारण नाही."
आपण आपल्या जगण्यात असा 'अधिक सुसंस्कृत म्हणवणार्‍या इतरांचा' हस्तक्षेप सहन करू का?
निर्मला पुतुल या संथाळी कवियत्रीची एक या विषयावरची कविता मी लवकरच इथे देईन. त्यावरून आदिवासींची या हस्तक्षेपाबाबतची मते आणि अनुभव लक्षात येतील.

तिसरा मुद्दा : कडक शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला जरब आणि पर्यायाने गुन्हे कमी होत जाणे, असे खरेच घडते का? हे अमानुष नाहीये का?
असे घडते, हे खरे आहे. कारण कैक वर्षांत शहापूरची ही एकच घटना आम्ही पाहिली. ( तो लिलाव रोखण्यात तेव्हा आम्हांला यश मिळाले, पण त्या भागातला संघटनेचा प्रभाव त्यामुळे खूपच कमी झाला आणि चांगली सुरू असलेली इतर कामेही खुंटली. ) त्यानंतर आजपर्यंत पुन्हा व्यभिचाराची एकही घटना आढळली नाही.
हे अमानुष आहे, असे एका बाजूने नक्कीच वाटते. पण अशा केसेसचा कौटुंबिक, सामाजिक जीवनावर आणि विशेषतः स्त्रिया व मुलांवर जो विपरित परिणाम होतो, तो काही कमी अमानुष नसतो. फसवणूक, भावनिक छळ, लग्नाची खोटी आश्वासने, मारहाण, हत्या, बलात्कार असे गुन्हे ( स्त्री व पुरुष दोघांकडूनही ) त्यातून घडू शकतात. आणि अशा गुन्ह्यांची ( नोंदवलेल्या ) संख्या पाहिली, तर आपला समाज कोणत्या दिशेने जातो आहे, हे सहज लक्षात येते.

अजून एक म्हणजे आदिवासींमधला एक अनुभव असा आहे की गुन्हेगार गुन्हा नाकबुल करत नाहीत. तो कबुल करून पंचांनी दिलेली शिक्षा भोगतात. त्यांनी ती शिक्षा भोगून पूर्ण केली की त्याला 'पापमुक्त' समजले जाते. आणि पुन्हा समाजात सामावून घेतले जाते. आपण गुन्हेगाराला 'कायमचा' गुन्हेगारच बनवून ठेवतो.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 8 Dec 2010 - 08:39 · उत्तर

आवर्जून उत्तरल्याबद्दल अनेकानेक आभार. :)

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Fri, 10 Dec 2010 - 18:07 · उत्तर

काडीमोड इतकी सोपी असताना व्यभिचार करण्याची गरज का भासावी? तेही घटस्फोटानंतर 'सामाजिक प्रतिष्ठा' धोक्यात येत नसताना? - हा त्यांचा सरळ प्रश्न होता.

साधारणतः, अशी गरज "केक जपायचाही आहे आणि खायचाही आहे" या मनोवृत्तीतून येऊ शकते. "विवाहातून स्थैर्य आणि व्याभिचारातून आनंद" असा विचार त्यामागे असू शकतो.

लग्न ही गोष्ट 'सामाजिक' नसून 'धार्मिक' मानली जाते.

  1. यातून असे सूचित होते आहे की आजच्या समाजात लग्न ही गोष्ट 'सामाजिक' आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे लग्न ही गोष्ट आजच्या समाजात 'व्यक्तिगत' मानली जाते, 'सामाजिक' नव्हे! कोणत्याही वैयक्तिक कराराचा साक्षीदार/राखणदार म्हणून समाज जी भूमिका पार पाडतो तितकाच समाजाचा लग्नाशी संबंध असतो.
  2. "त्रासदायक स्वातंत्र्यापेक्षा भले करणारी गुलामगिरी चांगली" हा विचार यातून सूचित होतो आहे.

"In fact," said Mustapha Mond, "you're claiming the right to be unhappy."
"All right then," said the Savage defiantly, "I'm claiming the right to be unhappy." "Not to mention the right to grow old and ugly and impotent; the right to have syphilis and cancer; the right to have too little to eat; the right to be lousy; the right to live in constant apprehension of what may happen to-morrow; the right to catch typhoid; the right to be tortured by unspeakable pains of every kind."

मृदुला

मृदुला · Wed, 8 Dec 2010 - 19:17

प्रश्नोत्तरे आवडली. लेखक/ कार्यकर्त्यांशी असा संवाद साधण्याचा उपक्रम आवडला.

आदिवासींचे नीती-नियम म्हणजे आपल्या सध्याच्या कायद्यांचे पूर्वज असणार हे साहजिक आहे. सध्याचे भारतीय कायदे विवाहित पुरुषांच्या संबंधांना अनैतिक समजत नाहीत, पण स्त्रीच्या संबंधांना समजतात असे नुकतेच वाचनात आले. त्यात स्त्रीचा ज्या परपुरुषाशी संबंध आला असेल त्यालाही शिक्षा होते. स्त्री ही संपत्ती समजली जाणे हे पुरातन आहे. आदिवासी प्रथेतील लिलाव हे त्याचेच उदाहरण वाटते.

मी एखाद्या आदिवासी भागातून परतते तेव्हा भिवया कोरलेल्या आणि मेकअप केलेल्या बायका पाहून मला मळमळायला लागते. कुरूप दिसतात त्या. पण हे केले नाही तर त्या गबाळ्या, मागास, स्वतःकडे लक्ष न देणार्‍या ( वा इतरांचे लक्ष वेधून न घेणार्‍या ), गावंढळ इत्यादी समजल्या जातात.हे सुंदर दिसते असे कुणी आणि कधी ठरवले हे त्यापैकी एकही बाई सांगू शकत नाही

हे पटले नाही. (पण मतभेद असू शकतात हे मान्य आहे.) स्वतःकडे लक्ष देऊन सौंदर्य जपणार्‍या स्त्रिया लेखिकेला का पटत नाहीत हे समजले नाही. मला सौंदर्यवर्धनाचा कंटाळा आहे, पण ज्यांना नाही त्यांचे मला कौतुक वाटते. 'हे' सुंदर दिसते हे कोणी ठरवावे लागत नाही. ते आपल्याला आरशात दिसतेच.

चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतू · Fri, 10 Dec 2010 - 07:50

सध्याचे भारतीय कायदे विवाहित पुरुषांच्या संबंधांना अनैतिक समजत नाहीत, पण स्त्रीच्या संबंधांना समजतात असे नुकतेच वाचनात आले. त्यात स्त्रीचा ज्या परपुरुषाशी संबंध आला असेल त्यालाही शिक्षा होते.

माझ्या माहितीनुसार विवाहित व्यक्तीचे (स्त्री असो वा पुरुष) विवाहबाह्य शरीरसंबंध आहेत हे सिध्द झाल्यास तो घटस्फोटासाठी पुरेसा पुरावा मानला जातो. बहुपत्नीत्व हिंदू कायद्याने दंडपात्र आहे. विवाहाचे आमिष दाखवून एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवले (आणि विवाहाचे वचन पाळले नाही) तर ते दंडपात्र असते. पण अविवाहित व्यक्तीने विवाहित व्यक्तीशी परस्परसंमतीने संबंध ठेवल्यास अविवाहित व्यक्तीस दोषी ठरवले जात नाही (कारण त्याने/तिने कुणाशी विवाह केलेलाच नाही, सबब कुणाशी प्रतारणाही केलेली नाही). या व्यतिरिक्त विवाहबाह्य संबंधांना भारतीय राज्यघटनेनुसार काही कायदेशीर शिक्षा आहे असे ऐकिवात नाही.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Fri, 10 Dec 2010 - 14:13 · उत्तर

बहुपत्नीत्व हिंदू कायद्याने दंडपात्र आहे.

पहिल्या पत्नीने आक्षेप घेतले तरच ना?

पण अविवाहित व्यक्तीने विवाहित व्यक्तीशी परस्परसंमतीने संबंध ठेवल्यास अविवाहित व्यक्तीस दोषी ठरवले जात नाही (कारण त्याने/तिने कुणाशी विवाह केलेलाच नाही, सबब कुणाशी प्रतारणाही केलेली नाही).

भादंवि ४९७ नुसार अविवाहित स्त्रीने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवण्यास विरोध नाही परंतु अविवाहित पुरुषाने विवाहित स्त्रीला (पतीच्या अपरोक्ष!) फितविल्यास दोघांनाही शिक्षा आहे (पण स्त्रीला कमी शिक्षा आहे).
माझे निष्कर्षः "स्त्रीला एवीतेवी निर्णयक्षमता कमीच असते" या गृहितकामुळे विवाहित स्त्रीची शिक्षा कमी ठरविलेली असावी. किंवा, तिला शिक्षा देण्याची थोडी जवाबदारी पतीकडून अपेक्षित असावी ;)
व्याभिचार हा गुन्हा म्हणजे एका पुरुषाने दुसर्‍याचे खेळणे चोरल्याबद्दल केलेल्या गुन्ह्यासारखा भासतो. या कलमातून स्त्री ही भोगवस्तू असल्याच्या गृहितकाला मूक मान्यता मिळते.
"पुरुष स्खलनशील आहे हे विवाहितेने मान्यच केलेले असते" या पारंपारिक गृहितकामुळे अविवाहित स्त्रीशी संबंध ठेवणार्‍यांना शिक्षा दिलेली नसावी.
(मी ही गृहितके मानत नाही.)

कविता महाजन

कविता महाजन · Fri, 10 Dec 2010 - 20:00

स्वतःकडे लक्ष देऊन सौंदर्य जपणार्‍या स्त्रिया लेखिकेला का पटत नाहीत हे समजले नाही.

मृदुला : स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले की सौंदर्य ( मग ते कुणाचेही असो ) जपले जातेच; असे अनुभवाच्या एका टप्प्यावर लक्षात येते. या उपर चालू फॅशन्स करणे, इतर रंगरंगोटी ही देखील प्रत्येक समाजात - प्रत्येक काळात आहे. आरोग्याचे, सौंदर्याचे, सौंदर्यप्रसाधनांचे, फॅशन्सचे मला मुळीच वावडे नाही.
माझा प्रश्न असा आहे की जे काळाच्या ओघात सहजगत्या आलेले नाही वा पारंपरिक ज्ञानातून आलेले नाही आणि 'बाजारा'ने ठरवून आकस्मिक मारा केल्यासारखे आणले आहे; ते आपण का स्वीकारतो? १०० ग्रॅम क्रीमची इवली डबी ९०० रु. ला असे माझे केस कापून देणार्‍या पार्लरमधल्या बाईने सांगितले. आणि चेहर्‍यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होण्याआधीचा मी हे क्रीम वापरणे सुरू करावे असे सुचवले. पाठोपाठ अशा अनेक गोष्टींनी तिची पोतडी भरलेली होती. जे असंख्य प्रयोग सौंदर्यवर्धनाच्या नावाखाली केले जातात, ते आरोग्यालाही हानीकारक असतात. पण कुणीतरी सेलिब्रेटीज त्याच्या जाहिराती करतात आणि मग सामान्यांपर्यंत ते लोण पसरत जातं. (मेघना पेठे यांच्या नातिचरामि मध्ये एक बाई हनुवटीवर उगवलेल्या एका केसाची काळजी करत बसते! )
आज इतक्या कंपन्यांची प्रसाधनं बाजारात आहेत आणि त्यांच्या इतक्या तर्‍हा आहेत... रंगपेटीत सापडणार नाहीत इतक्या शेड्स लिपस्टिक आणि नेलपेंटच्या सापडतात. पूर्वी खेड्यापाड्यांत फिरताना या प्रॉडक्टचे बनावट नमुने (उदा. पॉण्ड्स पावडर ) सर्रास आठवडी बाजारात सापडायचे. ( नावाचं स्पेलिंग थोडं बदलून, पण तसंच डिझाईन-रंग असलेले). पण आता शेकडो कंपन्या आहेत आणि बनावटीची गरजच राहिलेली नाही.
झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या परिसरात मध्यंतरी मी नक्षलवाद्यांसंदर्भात भटकत होते, तेव्हा पाहिलं की एखादा फेसपावडरचा डबा, एखादी नेलपेंटची बाट्ली कोवळ्या मुलींसाठी कसं आकर्षण बनू शकतात आणि त्यातून त्यांचा किती गैरवापर होऊ शकतो. नाना पाटेकरने जाहिरात केली म्हणून बीटी कॉटनच्या नादी लागणारे शेतकरी आणि या मुली सारखेच भाबडे. असो. खूप विषयांतर केले मी.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Sat, 11 Dec 2010 - 01:23 · उत्तर

माधव ज्युलियन म्हणतातः "धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे".
धावण्याची सुरुवात करताना शक्तीहीन, दिग्मूढ चाचपडल्यानंतर रस्ता सापडणार आहे!

माझा प्रश्न असा आहे की जे काळाच्या ओघात सहजगत्या आलेले नाही वा पारंपरिक ज्ञानातून आलेले नाही आणि 'बाजारा'ने ठरवून आकस्मिक मारा केल्यासारखे आणले आहे; ते आपण का स्वीकारतो? १०० ग्रॅम क्रीमची इवली डबी ९०० रु. ला असे माझे केस कापून देणार्‍या पार्लरमधल्या बाईने सांगितले. आणि चेहर्‍यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होण्याआधीचा मी हे क्रीम वापरणे सुरू करावे असे सुचवले. पाठोपाठ अशा अनेक गोष्टींनी तिची पोतडी भरलेली होती. जे असंख्य प्रयोग सौंदर्यवर्धनाच्या नावाखाली केले जातात, ते आरोग्यालाही हानीकारक असतात.

ना. धों. ताम्हनकरांच्या गोट्या या पुस्तकमालिकेत एक वाक्य आहे: "आमची सुमी लिपस्टिक, पावडर वगैरे काही वापरत नाही".
आधुनिक साहित्यिकही असे भाबडे लेखन करणार काय?
"जुने ते सोने" किंवा "जुने ते टाकाऊ" ही दोन्ही सार्वत्रिकीकरणे वाईटच आहेत. परंतु, बच्चन/खान यांनी ठरविल्याप्रमाणे जगणार्‍यांची आयुर्मर्यादा आदिवासींच्या आयुर्मर्यादेपेक्षा अधिकच असते. 'विच साईड टू अर ऑन' या प्रश्नाचे उत्तर निर्विवादपणे पुरोगामी आहे. पादत्राणे पायावर नीट बसल्याची खात्री करण्यासाठी पूर्वी क्ष किरण वापरत. घड्याळांतील चमकणारे रंग पूर्वी खर्‍या रेडियमने बनविले जात, त्यामुळे घड्याळे रंगविणार्‍या अनेक कारागिरांना कर्करोग झाला. C'est la vie, शिट हॅपन्स!
केशवसुत म्हणतातः "जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळा किंवा पुरून टाका. प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा." लेणी खोदताना काहीजण दरड कोसळून मरू शकतातच!

कविता महाजन

कविता महाजन · Sat, 11 Dec 2010 - 08:33

स्पिन डॉक्टर :
"आमची सुमी लिपस्टिक, पावडर... सगळे काही वापरते..." असे लिहिले म्हणजे ते 'आधुनिक' ठरेल काय? मला तर हे वाक्य अधिक भाबडे वाटते.
भाबडेपणाचा आणि आधुनिकतेचा काय संबंध?
आयुर्मर्यादा कमी-अधिक असणं आणि (स्वतःच्या व्याख्येनुसार) चांगलं / मनाजोगं जगणं याही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
"लेणी खोदताना काहीजण दरड कोसळून मरू शकतातच!"
पण लेणी खोदणारे आधी 'कोणत्या दगडा'त लेणी कोरायची याचा अभ्यास करतात. कोणत्या काळात, कशी, किती खोदकाम-कोरीवकाम याचेही तपशील ठरवतात. अपघाताने मरणे निराळे आणि निष्काळजीपणामुळे ( आपल्या वा इतरांच्या ) / अज्ञानामुळे मरणे निराळे. 'आपल्यासाठी इतर मेले तर चालतील,' असे म्हणणार्‍यांना 'इतरांसाठी आपण वा आपले कुणी' मारले जाण्याची' शक्यताही सहन होत नाही.

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Sat, 11 Dec 2010 - 12:53 · उत्तर

"आमची सुमी लिपस्टिक, पावडर... सगळे काही वापरते..." असे लिहिले म्हणजे ते 'आधुनिक' ठरेल काय? मला तर हे वाक्य अधिक भाबडे वाटते.

अधिक या शब्दाविषयी शंका आहे. दोन्हीही भाबडेच आहे हे मान्य.

आयुर्मर्यादा कमी-अधिक असणं आणि (स्वतःच्या व्याख्येनुसार) चांगलं / मनाजोगं जगणं याही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

सहमत आहे. परंतु, "परंपरागत 'ज्ञानातून' आलेल्या मतांचे अंधानुकरण करणे" आणि "बाजाराच्या मार्‍यामुळे स्वीकारणे" या दोन्हींतही "स्वतःच्या व्याख्येने जगणे" नाहीच! अंधानुकरण करायचेच झाले तर ते किमान, आयुर्मर्यादा वाढविण्यात यशस्वी जीवनशैलीचे तरी करावे! बाजाराच्या मार्‍यामुळे नेमक्या किती लोकांच्या आरोग्याची किती हानी झाली? शिवाय, पारंपारिक जीवनशैलीत पर्यायही नसतात (डायरेक्ट मारहाण आणि बहिष्कारच!). बाजार, किमान, भासमान पर्यायतरी देतो (तीन कोलांपैकी काहीही निवडा, संगणकाच्या पडद्यावरील कोणतेही बटन दाबा, इ. ;) ).
आमच्या पूर्वजांपेक्षा त्यांचे पूर्वज वेगळी जीवनशैली जगले ती स्वेच्छा होती की सक्ती होती की यदृच्छा होती ते मला माहिती नाही परंतु सत्य असे आहे की आमचे सरासरी आयुर्मान अधिक आहे. सबब त्यांची जीवनशैली तोट्याची वाटते.

फेसपावडरचा डबा, एखादी नेलपेंटची बाट्ली कोवळ्या मुलींसाठी कसं आकर्षण बनू शकतात आणि त्यातून त्यांचा किती गैरवापर होऊ शकतो.

त्या मुलींचे वय १८ वर्षांहून अधिक असेल तर 'गैरवापर' हा शब्द पेट्रनायजिंग आहे.

अपघाताने मरणे निराळे आणि निष्काळजीपणामुळे ( आपल्या वा इतरांच्या ) / अज्ञानामुळे मरणे निराळे.

दोन्ही पर्यायांत अज्ञानी आयुष्यच जगायचे असेल तर सरासरी आयुष्मान हा निकषच महत्वाचा ठरतो.

'आपल्यासाठी इतर मेले तर चालतील,' असे म्हणणार्‍यांना 'इतरांसाठी आपण वा आपले कुणी' मारले जाण्याची' शक्यताही सहन होत नाही.

याचा संबंध समजला नाही. "बाजाराचा मारा" दुर्लक्षिण्याची कुवत प्रत्येक सज्ञान व्यक्तीकडे अपेक्षित असते. सौंदर्यप्रसाधने विकणारे रूढार्थाने काहीही सक्ती करीत नाहीत.

कविता महाजन

कविता महाजन · Sat, 11 Dec 2010 - 08:57

मेघना : निर्मला पुतुल या संथाळी कवियत्रीची कविता देईन म्हटलं होतं. ती अशी आहे -

माझं सारं काही नावडतं आहे त्यांच्या दृष्टीनं

ते घृणा करतात आमची
आमच्या काळेपणाची

हसतात, विनोद करतात आमच्यावर
आमच्या अडाणीपणावर मारतात टोमणे

टिंगल करतात आमच्या भाषेची

आमचं वागणं-सवरणं, आमच्या रीतीभाती
काहीच आवडत नाही त्यांना
आवडत नाहीत आमचे नेसूचे कपडे, ओढण्या

रानटी, असभ्य, मागासलेले म्हणून
तुच्छतेनं पाहतात आमच्याकडे
आणि स्वतःला सभ्य श्रेष्ठ समजून
नाकारतात आमच्या वस्तूंना
त्यांना नको असतं
आमच्या हातचं पाणी पिणं
आमच्या हातांनी रांधलेलं अन्न
सहज खावं वाटत नाही त्यांना

वर्ज्य आहे त्यांच्या घरात आमचा प्रवेश
ते शिकू इच्छित नाहीत
आमच्यातच राहत असूनही आमची भाषा
त्यांना वाटतं की त्यांची भाषा शिकावी आम्ही
आणि त्यांच्याच भाषेत बोलावं त्यांच्याशी

त्यांचा तर्क आहे की आम्हांला
सभ्य होण्यासाठी आवश्यक आहे त्यांची भाषा शिकणं
त्यांच्यासारखं बोलणं वागणं
उठणं बसणं
आवश्यक आहे आम्ही सभ्य होण्यासाठी त्यांच्यासारखे
कपडे घालणं

माझं तर सारं काही नावडतं आहे त्यांच्या दृष्टीनं

त्यांना आवडतात फक्त
माझ्या घामातून टपोरलेले धान्याचे दाणे
जंगलातली फुलं, फळं, लाकूडफाटा
शेतांमध्ये उगवलेल्या भाज्या
घरी पाळलेल्या गावठी कोंबड्या

त्यांना आवडतं
माझं गच्चमुच्च शरीर
माझं मांस आवडतं त्यांना!

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Sat, 11 Dec 2010 - 11:04 · उत्तर

आभार! सुंदर आहे कविता.
अशा प्रकारच्या संस्कृतिसंघर्षाचे प्रसंग तुम्हांला अनेकदा अनुभवायला मिळत असतील (हा अनुभवसमृद्ध करणारा भाग की सदसद्विकेकाची कसोटी पाहणारा हा तर अजूनच पुढचा भाग.) एक काळा आणि एक गोरा अशा प्रकारचे निर्णय घेणे तर अशा वेळी अशक्यच.
पण जसे 'मिळणारे फायदे वगळता आदिम ते सर्व वाईट' हा दृष्टिकोन चुकीचा आहे, तसाच 'आधुनिक ते सर्व वाईट' हाही दृष्टिकोन चुकीचा नाही का? (संदर्भ (आभार, जंतू!))

मृदुला

मृदुला · Sun, 12 Dec 2010 - 02:21

कविता,

जे काळाच्या ओघात सहजगत्या आलेले नाही वा पारंपरिक ज्ञानातून आलेले नाही आणि 'बाजारा'ने ठरवून आकस्मिक मारा केल्यासारखे आणले आहे; ते आपण का स्वीकारतो?

खरा प्रश्न असा आहे की पारंपारिक किंवा बाजाराने मारा केलेले उत्पादन बुद्धीला जरासे न पटणारे वाटले तरी आपण का स्वीकारतो. कारण गटापेक्षा फार वेगळे असू नये (कन्फॉर्म - मराठी?) ही भावना एखाद्या अंतःप्रेरणेसारखी (इन्स्टिंक्ट) प्रभावी ठरते. गटात थोडे वेगळेपण असावे पण फार जास्त नसावे असा बहुतेक सगळ्या कळपात राहणार्‍या प्राण्यांचा प्रयत्न असतो. असो.

माझा प्रश्न असा होता की तुम्हाला पारंपारिक ज्ञानातून आलेले उत्पादन पटते आणि बाजाराने आणलेले नाही, असे का?

मला असे वाटते की आदिवासी जेव्हा त्यांच्या कळपात असतील तेव्हा आदिवासींसारखे आणि शहरात शहरी लोकांसारखे वागले तर पुष्कळ गोष्टी सोप्या होतील. अर्थात, शहरी लोकांनीही तसेच करणे अपेक्षित आहे. देश तसा वेष.
--

स्पिन डॉक्टर,

तुमचा आयुर्मर्यादेबद्दलचा मुद्दा चांगला आहे. आफ्रिकेतील लोकांनी 'सुसंस्कृत' का व्हावे यासाठी पूर्वी तो आडून आडून सुचवला जात असे. तुम्हाला खरेच असे वाटते का की शहरी लोकांच्या जीवनशैलीमुळे त्यांची आयुर्मर्यादा जास्त आहे? आणि आदिवासी जीवनशैलीत राहून आयुर्मर्यादा वाढवणे अशक्य आहे?

पाश्चात्य जगाने त्यांचे लशीकरणाचे व निर्जंतुकीकरणाचे शोध, नफ्याच्या अमिषाने का होईना, भारतासारख्या तिसर्‍या जगातल्या लोकांना वापरू दिले म्हणून आपल्या शहरी लोकांची आयुर्मर्यादा वाढलेली आहे. त्यात जीवनशैलीचा फारसा संबंध नाही असे मला वाटते. एकोणिसाव्या शतकातल्या पुण्यातल्या लोकांची आयुर्मर्यादा आदिवासींपेक्षा फार वेगळी होती का?

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Mon, 13 Dec 2010 - 10:09 · उत्तर

तुम्हाला खरेच असे वाटते का की शहरी लोकांच्या जीवनशैलीमुळे त्यांची आयुर्मर्यादा जास्त आहे? आणि आदिवासी जीवनशैलीत राहून आयुर्मर्यादा वाढवणे अशक्य आहे?

आजवर कोणालाही जमलेले दिसत नाही. कदाचित जमेलही परंतु ७०० करोड लोकांना १० पृथ्व्यासुद्धा पुरणार नाहीत.

पाश्चात्य जगाने त्यांचे लशीकरणाचे व निर्जंतुकीकरणाचे शोध, नफ्याच्या अमिषाने का होईना, भारतासारख्या तिसर्‍या जगातल्या लोकांना वापरू दिले म्हणून आपल्या शहरी लोकांची आयुर्मर्यादा वाढलेली आहे. त्यात जीवनशैलीचा फारसा संबंध नाही असे मला वाटते. एकोणिसाव्या शतकातल्या पुण्यातल्या लोकांची आयुर्मर्यादा आदिवासींपेक्षा फार वेगळी होती का?

जुन्या पुण्यात आयुर्मर्यादा फारशी नसावी हे मान्य. पण, मुद्दा असा की आमच्या जीवनशैलीमध्ये बिनडोक जगणार्‍यांनाही फायदे मिळतातच कारण ती आता विज्ञानावर आधारित आहे, त्यांच्या जीवनशैलीत परंपरेव्यतिरिक्त काही उपायच दिसत नाही.

कविता महाजन

कविता महाजन · Sun, 12 Dec 2010 - 04:07

स्पिन डॉक्टर

त्या मुलींचे वय १८ वर्षांहून अधिक असेल तर 'गैरवापर' हा शब्द पेट्रनायजिंग आहे.

याचा संबंध समजला नाही. "बाजाराचा मारा" दुर्लक्षिण्याची कुवत प्रत्येक सज्ञान व्यक्तीकडे अपेक्षित असते. सौंदर्यप्रसाधने विकणारे रूढार्थाने काहीही सक्ती करीत नाहीत.

या दोन्ही वाक्यांत '१८' वर्षे आणि 'सज्ञान' असणे या ज्या गोष्टी आहेत, त्या 'आपल्या' जगातल्या आहेत. आदिवासींच्या नव्हे. इथे सज्ञान असण्याचा आणि आपल्या वर्तुळाबाहेरील गोष्टींचे ज्ञान असण्या-नसण्याचा संदर्भ विचारात घ्यावा लागेल. मी आदिवासी भागात कामाला-संशोधनाला सुरुवात केली तेव्हा वयाची पस्तिशी गाठलेली होती. पण आदिवासींच्या जगाबाबतचे माझे ज्ञान ( जे तोवर केवळ 'पुस्तकी' होते ) पाहता मी 'सज्ञान' नाही असेच तिथल्या कोणत्याही 'जाणकारा'ने म्हटले असते. कुठलाही प्रश्न मी विचारला की पोरासोरांनाही हसू यायचं किंवा "इतकंही माहीत नाही? कळत नाही? समजत नाही?" असा भाव बोलण्यातून डोकावायचा. ( आदिवासींचे चेहरे मला अजूनही नीटसे वाचता येत नाहीत. ते 'निर्विकार' आहेत, असेच वाटत राहते. 'देहबोली' एकुणातच 'वेगळी' असल्याचा हा परिणाम! )

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Mon, 13 Dec 2010 - 10:14 · उत्तर

या दोन्ही वाक्यांत '१८' वर्षे आणि 'सज्ञान' असणे या ज्या गोष्टी आहेत, त्या 'आपल्या' जगातल्या आहेत. आदिवासींच्या नव्हे. इथे सज्ञान असण्याचा आणि आपल्या वर्तुळाबाहेरील गोष्टींचे ज्ञान असण्या-नसण्याचा संदर्भ विचारात घ्यावा लागेल. मी आदिवासी भागात कामाला-संशोधनाला सुरुवात केली तेव्हा वयाची पस्तिशी गाठलेली होती. पण आदिवासींच्या जगाबाबतचे माझे ज्ञान ( जे तोवर केवळ 'पुस्तकी' होते ) पाहता मी 'सज्ञान' नाही असेच तिथल्या कोणत्याही 'जाणकारा'ने म्हटले असते. कुठलाही प्रश्न मी विचारला की पोरासोरांनाही हसू यायचं किंवा "इतकंही माहीत नाही? कळत नाही? समजत नाही?" असा भाव बोलण्यातून डोकावायचा. ( आदिवासींचे चेहरे मला अजूनही नीटसे वाचता येत नाहीत. ते 'निर्विकार' आहेत, असेच वाटत राहते. 'देहबोली' एकुणातच 'वेगळी' असल्याचा हा परिणाम! )

त्या भाबड्या आहेत हे मान्यच आहे. परंतु, त्यांना एक व्यक्ती म्हणून बाकी सारे अधिकार द्यायचे असतील तर कर्तव्येही द्यावी लागतील. की त्यांना जारवांप्रमाणे अस्पर्श्य ठेवून मानवापेक्षा वेगळी वागणूक देणे हा दुसरा पर्याय तुम्ही सुचविता आहात? आपल्या समाजात शिरताना त्यांना शिक्षण लागेल, अवघड जाईल इ. सर्व मान्य. परंतु, त्यांच्या भाबडेपणाला जपण्यासाठी तुम्ही 'आपल्या समाजातील जाहिराती बंद करणे' किंवा 'उत्पादनांवर आरोग्याची हानी करण्याचे आरोप करणे', इ.चे समर्थन करीत आहात काय?

कविता महाजन

कविता महाजन · Sun, 12 Dec 2010 - 04:26

मेघना : संस्कृतिसंघर्षाबाबत लिहिलेस ते अगदी खरे आहे. अगदी टोकाच्या वेगळ्या असलेल्या जगांमध्ये वावरावे लागते त्यामुळे गुंता वाढतोच. आदिवासींचे सगळे फक्त चांगलेच आहे, असे माझे अजिबातच मत नाही. ते तसे कुणाचेच आणि कुठलेच नसते. वाईटाचेही तसेच. पुन्हा आपले विचार, पूर्वग्रह, व्यक्तिगत आवडी-निवडी, इतिहास, प्रत्यक्ष अनुभव अशा अनेक गोष्टींनी या जगांकडे पाहण्याची नजर बनते, बदलते, विस्तारते. माझे काही नातलग, मित्र, सहकारी उद्योग -व्यवसाय, तंत्रज्ञान, मीडिया अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधले असल्याने त्यांची निराळ्या आर्थिक-सामाजिक स्तरातली जगंही मी थोडी / काळाच्या लहान तुकड्यापुरती का होईना पण अनुभवली आहेत.परिचित नक्षलवादी मित्रमैत्रिणींना जसं जाणून घेतलं, तसंच 'नक्षलवाद्यांचा त्रास होतो' म्हणून स्वतंत्र व्यवसाय बंद करून, पुन्हा दुसर्‍या व्यवसायाकडे वळून पुन्हा स्थिरावण्याचा संघर्ष करणारा माझा सख्खा मेव्हणाही जवळून पाहिला आहे. आपण कॅमेर्‍यासारखे भेदभाव न करता सारे समजुतीने टिपत जावे, इतकेच मला वाटते. आणि तसे करण्या-वागण्याचा माझा एक व्यक्ती व एक लेखक म्हणून प्रयत्न असतो. माझे निम्नमध्यमवर्गीय आयुष्य जगताना मी अनेक 'आधुनिक' गोष्टींच्या आधाराने पुढे सरकत असतेच की. उदा. आरोग्यविषयक तपासण्या-चाचण्या व औषधोपचार! त्यामुळे 'विरोध' वा 'तुच्छता' नाहीच. :-).

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Sun, 12 Dec 2010 - 05:00 · उत्तर

आपण कॅमेर्‍यासारखे भेदभाव न करता सारे समजुतीने टिपत जावे
अगदी अगदी.