माझे शेल्फ
क्युअर
एका खुनाच्या तपासाची थरारक कथा... रहस्यमय कथा म्हणजे खून आणि तपास असं एक समीकरण असतं; पण रॉबिन कुकसारखे लेखक या समीकरणाला विविध आयाम देतात. अशीच विविध आयाम असलेली रॉबिन कुकची कादंबरी आहे ‘क्युअर.’ जैवतंत्रज्ञान, जपान-अमेरिकेतील माफियांचा जैतंत्रज्ञाातील हस्तक्षेप, फॉरेन्सिक विभागाकडून केलं जाणारं संशोधन इ. विषयांना स्पर्श करत ही कादंबरी उत्कंठावर्धक पद्धतीने पुढे सरकत राहते. या कादंबरीचा अनुवाद केला आहे अनिल काळे यांनी. सातोशी माचिता हा जपानमधला जैवतंत्रज्ञान विषयामधील एक शास्त्रज्ञ असतो. त्यानं स्टेम सेल्सच्यासंबंधी एक महत्त्वाचा शोध लावलेला असतो; पण जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीत मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे तो असंतुष्ट असतो. बेन कोरी हा अमेरिकेतल्या ‘आयपीएस यूएसए’ कंपनीचा सीईओ. जैवतंत्रज्ञानामधील जगातील ‘बुद्धिमत्ता’ ताब्यात घेऊन नव्याने उदय होत असलेल्या जैवतंत्रज्ञान उद्योगावर अधिराज्य गाजवायचं आणि अफाट पैसा कमवायचा, हे त्याचं ध्येय असतं. त्याला सातोशीची माहिती समजते आणि तो अमेरिकेतील माफिया आणि जपानमधील याकुझा (माफियाची जपानी आवृत्ती) टोळ्यांच्या मदतीने सातोशीला त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत आणतो आणि सातोशीबरोबर करार करतो. सातोशी अमेरिकेत पळून गेला हे जपान सरकारला पसंत पडत नाही. याकुझामधल्या दुसऱ्या एका टोळीला हाताशी धरून जपान सरकार सातोशीचा अमेरिकेत काटा काढण्याचं कारस्थान रचतं. अमेरिकेत पेटंट मिळण्याची स्वप्नं बघत असलेल्या सातोशीची, न्यू यॉर्कमधल्या एका सब वे प्लॅटफॉर्मवर बेमालूमपणे हत्या केली जाते. न्यू यॉर्कमधल्या ‘ओसीएमई’ या फॉरेन्सिक विभागात काम करत असलेल्या लॉरी माँटगोमेरीच्यासमोर सातोशीचं प्रेत ‘बेवारस’ म्हणून येतं. ‘नैसर्गिक मृत्यू’ म्हणून ही केस जवळजवळ हातावेगळी केल्यानंतर तिला काहीतरी शंका येते आणि ती या केसचं संशोधन पुन्हा सुरू करते. सातोशीची केस लॉरीकडे असल्याची धास्ती घेऊन, जपानच्या त्या याकुझा टोळीशी सहकार्य करणारी अमेरिकेतील माफियांची टोळी, अप्रत्यक्ष धमक्या देऊन लॉरीला त्या केसच्या संशोधनापासून दूर ठेवायचे प्रयत्न करते; पण लॉरी तिचं काम तसंच पुढे रेटत असल्याचं बघून लॉरीच्या छोट्या मुलाचं– जेजेचं अपहरण केलं जातं. या दरम्यान लॉरी सिद्ध करते, की सातोशीचा मृत्यू नैर्सिगक नसून, ती हत्या आहे. जेजेचं अपहरण झाल्यानंतर लू सोव्गुलो या आपल्या पोलीस खात्यात डिटेक्टिव्ह असलेल्या मित्राच्या सल्ल्याने, लॉरी जेजेची सुटका करण्याचं काम सीआरटी नावाच्या एका कंपनीला देते. ग्रोव्हर आणि कोल्ट हे सीआरटीमध्ये भागीदार असलेले दोघे जण दुसऱ्याच दिवशी जेजेला सुखरूप सोडवून आणतात.यानंतर झालेल्या छाप्यांच्या प्रचंड सत्रामध्ये बेन कोरी, आयपीएस यूएसए कंपनी, जपानी याकुझा, अमेरिकन माफिया अशा सर्वांचे काळे धंदे आणि गुन्हे उघडकीला येतात. तर वाचकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी आणि रॉबिन कुकच्या कल्पनाशक्तीचं, अभ्यासपूर्णतेचं दर्शन घडविणारी ही कादंबरी आहे.