खाली जमीन वर आकाश
शर्थीच्या प्रयत्नांची कर्म कहाणी... शून्यातून जग निर्माण करणाऱ्या या शर्थीच्या प्रयत्नांची कर्म कहाणी आता साहित्याच्या प्रांतात ‘खाली जमीन वर आकाश’ होऊन अवतरलीय. २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन. या पुस्तकदिनाच्या निमित्तानं जगावेगळं आयुष्य जगलेल्या या मणसाच्या जीवनकहाणीची आणि त्याच्या पुस्तकनिर्मितीचा घेतलेला धांडोळा... अनाथाश्रमात जन्मलेला... रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते... जात-धर्म-कुल-गोत्र-वंश नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नॉन’ होता... त्याला नाव नव्हतं. होता एक नंबर. जसा कैद्यांना असतो तसा तो वयात आला तसा त्याचे प्रश्नही वाढत गेले. प्रश्नांनीच त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्व स्विकारलं. प्रश्नानीच तो शिकला-सवरला. नि सावलाही. अस्तित्वाच्या, परिचयाच्या कोणत्याच पारंपरिक खुणा नसलेला तो, समाजानं दिलेल्या जमिनीवर स्वत:च आकाश आकारत डॉ. सुनिलकुमार लवटे म्हणून चमकले. आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख निर्माण केली. एक अनाथ मुलगा ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य इथंपर्यंत झेप मारताना समाजतील अनेक विध क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलं. प्रत्येकजण बालपणी देवाकडं एक मागणं मागत असतो. ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ मात्र लवटे सराचं जीवनचं वेगळं. त्याचं बालपण छोट्या प्रश्नाचं मोठं काहूर होतं. शालेय जीवन प्रश्नग्रस्त होतं. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेल्या निरागस बालकाला ‘तुझं नाव काय? तुझे आई वडील कोण? गाव कुठलं? तू कुणापैकी?’ असे छोटे-छोटे प्रश्न थरकाप उडवून लावायचे. कारण या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसायची. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेल्या या मुलाला अनाश्रमात वाढावं लागलं. त्यामुळं त्याच्या बालवयात माणूसपणाचा मागमूसही नव्हता. लवटे सर आपली चित्तरकहानी सांगू लागतात, कधी काळी असा जन्मलेला मी... अनाथाश्रम, रिमांड होममध्ये, वाढलो, शिकलो, सावरलो आणि सावरलोही यामुळं माझे बालपण ‘अहा ते सुंदर दिन हरपले’ अशी हुरहूर लावणारेही नव्हते. माणूस सुजाण झाला की जमीन मागे पडते नि आकाश बार वर सरकत राहतं. आकाशात चंद्र-सूर्य असतात म्हणे. कळत्या उमलत्या वयात मी फक्त तळपणारा सूर्यच अनुभवला. कडाडणाऱ्या विजाच रात्री माझ्या सोबतीला असायच्या. ‘शुक्रतारा... मंद वारा’ मला कधी भावला, लाभला नाही. धु्रवपण नाही कधी आवडला. हा मात्र उल्का धुमकेतू का कुणास ठाऊक मला आपले वाटत आलेत, का ते नाही सांगता येत’ आयुष्यभर सोसलेल्या लवटे सरांनी आक्रोश, आक्रस्ताळेपणा, आरोप यांना बगल देत नि रचनात्मक मार्गाची कास धरत आपली जीवनकहाणी ‘खाली जमीन, वर आकाश’ मध्ये शब्दबद्ध केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्यावतीने नुकतेच हे आत्मकथन बाजारात आलंय. हे आत्मकथन रक्तसंबंध, जातपंचायत, धर्मसभा, संस्कार आदी पारंपरिकतेस भेदून घेतलेला माणूसपणाचा एक आत्मशोध आहे.