माझे शेल्फ
खुमासदार अत्रे
अत्रे यांच्या खुमासदार टिपणाचं अनोखे संकलन... श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि. पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. आतापर्यंत वििध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुमासदार’ ज्यातून त्यांनी आ. अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकांचे अंक वाचून त्यातला खुशखुशीत भाग निवडला आणि तो पुस्तकात संग्रहित केला. या पुस्तकात अत्रे त्यांच्या लेखणीनं प्रसवलेला स्फोटक मजकूर तर आहेच, पण दत्तू बांदेकरांचे, मजेदार, विनोदी किस्से आणि वचनं आहेत. ‘नवयुग’च्या वीस वर्षांच्या आमदानीत जे जे लेखकाच्या दृष्टिकोनातून-लक्षणीय लेखन ‘नवयुग’मध्ये आले ते इथं वाचकांच्या भेटीला आले आहे. त्याची मांडणी खास श्याम भुर्केच्या शैलीतून आहे. हे पुस्तक वाचताना आ. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि निष्णात संपादनाचा प्रत्यय तर येतोच, पण महाराष्ट्रातील वीस वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचा एक चित्रपटच डोळ्यांसमोरून सरकत जातो. नामवंत लेखकांच्या भेटीही या पुस्तकातून घडतात. त्यांची विशेष मौज वाटते. लेखकाला उत्तम विनोददृष्टी असल्यामुळे त्यांनी जे जे संग्रहित केलं ते निश्चितच ‘खुमासदार’ आहे. पुस्तकाचे वाचन करताना त्यातील विविधतेनं मन थक्क होते आणि क्षणभरही पुस्तक खाली ठेवावेसं वाटत नाही हे या सग्रहाचे खरे यश. ‘नवयुग’ने महाराष्ट्राच्या जीवनात एकमेद्वितीय स्थान सतत वीस वर्षे मिळवलं होतं. त्यांच्या यशात अत्रे यांच्या लेखणीचा सिंहाचा वाटा होता. पण दत्तू बांदेकरांचा खुसखुशीत विनोद, श्री. बाळ ठाकरेंची व्यंगचित्रे आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक ‘नवयुग’मधून उदयाला आले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलना’त तर या ‘नवयुग’ जी कामगिरी केली ती अजोड आहे. महाराष्ट्राचा सारा सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास म्हणजे ‘नवयुग’. एखाद्या विस्मृत बहारदार उपवनातून मधमाशीनं हिंडून हिंडून मध गोळा करावा तसं ‘नवयुग’चे वीस वर्षांचे असंख्य अंक बारकाईनं वाचून श्याम भुर्के यांनी त्यातून जो मधुसंचय केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन. काही खुमासदार उदा. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’ हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वराने एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात स्त्रीला आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला घातले. अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर!’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल!’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती?’ अशा रीतीने नवकाव्यातल्या अर्थहीनतेची ते टर उडवीत.हे पुस्तक वाचून वाचकांना आचार्य अत्रे यांच्या उत्साहवर्धक आणि प्रसन्नतेनं बहरलेल्या सहवासाचा आनंद मिळेल हे निश्चित!