माझे शेल्फ
लाइफ स्टाइल
रंगतदार व्यक्तिरेखांचा बहारदार प्रवास’… कला, क्रीडा, संगीत, नाट्य, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तींच्या जीवनशैलीबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच एक आकर्षण वाटत आलंय. ‘त्यांचे चालणे कैसे, बोलणे कैसे, सलगी देणे कैसे असे? याविषयी सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड कुतूहल असते. सुधीर गाडगीळ यांच्या ‘लाईफ स्टाईल’ या पुस्तकाने ही उत्सुकता, कुतूहल बऱ्याच अंशी शमते. पुस्तक वाचताना सुधीर गाडगीळ यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रसन्नता त्यांच्या लेखनातून ठायी ठायी जाणवते. पं. भीमसेन जोशी, बाबामहाराज सातारकर, आर. के लक्ष्मण, श्रीराम लागू, रामदास फुटाणे, दादा कोंडके, एस. एफ. हुसेन, गौतम राजाध्यक्ष, माणिक वर्मा यांच्यासह एकूण तीस व्यक्ती रेखाटने या पुस्तकात आहेत. गायनाइतकीच मोटार दुरुस्ती व ड्रायव्हिंगमध्ये ‘गती’ असणारे आणि प्रसिद्धीच्या झोतातही साधे-सरळ वागणारे भीमसेन जोशी, विश्वनाथ प्रताप सिंग अशी नावे शकुंतला परांजप्यांनी दिल्याचे वाचून आपल्याला गंमत वाटते आणि बाबामहाराज सातारकरांचं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्याचं समजल्यावर तर आपण थक्कच होतो. शंतनुराव किर्लोस्करांचा वक्तशीरपणा, आर. के. लक्ष्मण यांचा मिस्कीलपणा, शरद तळवलकरांचा खट्याळपणा या वैशिष्ट्यांमुळे ही व्यक्तिचित्रं मनाला स्पर्शून लागतात ते चितळे बंधू मिठाईवाले, स्टार फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष, शब्दांना दैवत मानणाऱ्या शांतबाई शेळके, इंग्रजीत धम्माल नाटकं करणारा ‘अमूल’ मॅन भरत दाभोळकर, पत्रकार देवयानी चौबळ, शोभा डे, ‘मी माझा’ फेम चंद्रशेखर गोखले, कॉपी रायटर रेखा निगम, योगतज्ज्ञ अय्यंगार गुरुजी, अनूप जलोटा, राजा गोसावी ही विविध क्षेत्रांतील ‘दादा- माणसं या संग्रहातून आपल्या भेटीला येतात! गाडगीळांची लेखनशैली चित्रदर्शी असल्याने प्रत्येक व्यक्तीचे वर्णन तिच्या हावभावासकट ते तपशिलाने करतात आणि एखाद्या ‘पोट्रेट’प्रमाणे ती व्यक्ती तिच्या खुब्यांसह वाचकांसमोर येते. वृत्तपत्रीय लिखाणाची छाप असलेलं तरीही ओघवत्या भाषाशैलीमुळं वाचकाला गुंतवून टाकणारं पुस्तक वाचनीय आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या लफ्फेदार अक्षरांनी सजलेलं देखणं मुखपृष्ठ लाभलेलं हे पुस्तक म्हणजे ‘रंगतदार व्यक्तिमत्त्वांचा बहारदार प्रवासच’ आहे!