माझे शेल्फ
लेडीज कूपे
सहा वेगळी दु:खे… ही सहा सहप्रवासी स्त्रियांची जीवनगाथा आहे. लेडीज कूपेतून प्रवास करणाऱ्या या अनोळखी स्त्रिया काही तासांतच मैत्रिणींसारख्या एकमेकींची विचारपूस करून आपापसातील अपिचयाची अभ्रे बाजूला सारून भावनांना वाट करून देतात, त्यातून उमलत जातात. त्य त्यांच्या भावबंधातल्या ऋजू रेशमी पाकळ्या! आपल्या निसर्गदत्त स्वभाववैशिष्ट्यांमुळे स्त्रिया एकमेकींजवळ लवकर ‘मोकळ्या’ होऊ शकतात, एकमेकींना दिलासा देऊ शकतात. या कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या लेडील कूपेत जानकी प्रभाकर, प्रभादेवी, मार्गारिया शांती पैलराज, अखिलनंदेश्वरी (अखिला) शीला वासुदेवेन व मारी कोलान्थू अशा सहा जणी आहेत. यात सर्वांत वयस्क म्हणजे जानकी व सर्वांत लहान म्हणजे १४ वर्षांची शीला. यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अखिलाची. तिचा प्रवास सर्वांत लांबचा तसा तिचा जीवनप्रवासही लांबचा. म्हणून या कादंबरीची ती नायिका आहे, असे म्हणायला हरकत नाही. कथेची सुरुवात व अंत तिच्यावरच आहे. या प्रवासातील थोड्याशा सहवासामुळे अखिलाच्या मनातील आंदोलने व त्यानंतर तिच्या जीवनाला मिळालेले वेगळे वळण हाच कथेचा विषय आहे. अपघाती अकाली मृत्यू पावलेल्या वडिलांच्या जागी आयकर कार्यालयामध्ये लहान वयातच अखिला कामाला लागते. घरात मोठी असल्याने एका कुटुंबकर्त्याची सर्व कर्तव्ये पार पाडता पाडता कधी पंचेचाळीशीला येते ते कळत नाही. पाठची सर्व भावंडे मात्र मोठी होऊन लग्न करून मार्गी लागतात. अखिलाच्या लग्नाचा, तिच्या भविष्याचा विचार कोणाच्याही डोक्यात शिरत नाही. अगदी तिच्या आईच्यासुद्धा! ती जुन्या परंपरेतील जुन्या आचारविचारांची कर्मठ ब्राह्मण बाई असते. नवरा हेच तिचे जीवनसर्वस्व असते. तिच्या बाबतीतील अत्यंत विचित्र गोष्ट म्हणजे तिचे लग्न. तिच्या सख्ख्या काकांशीच वडिलांनी लावून दिलेले असते. अखिलाने एकदा याबद्दल विचारले असता तिला प्रचंड राग येतो. अखिलाला ती चांगलीच फ़ैलावर घेते; पण या घटनेने सर्वांनाच आश्चर्य वाटत असते. अशा कर्मठ वातावरणात वाढलेल्या अखिलाची आईच्या मृत्यूनंतर मात्र फारच घुसमट सुरू होते. आपल्या सख्ख्या भावंडांच्या मतलबीपणामुळे ती आतल्या आत कुढत राहते; पण निलोफर व कॅथरिन या मैत्रिणींमुळे तिच्यामध्ये मानसिक बदल सुरू होतात. निलोफर तर तिला जोरात बजावते, ‘तुझ्या त्या स्वार्थी बहिणीला पहिल्यांदा तू घरातून हाकलून दे. ती जळूप्रमाणे तुझे रक्तशोषण करते आहे.’’ अशा खंबीर व स्वतंत्र मैत्रिणींमुळे अखिलाही स्वत: खंबीर बनण्याचापक्का निश्चय करून आयुष्यात अगदी पहिल्यांदा एकटी कन्याकुमारीच्या प्रवासाला निघते. तिथे कूपेमध्ये ‘पुरुषाशिवाय स्त्री एकटी राहू शकते का?’’ या विषयावर बायकांची बरीच चर्चा होते. कन्याकुमारीला गेल्यावर या प्रश्नाचे अचूक उत्तर अखिलाला सापडते. तिच्या जीवाची तगमग थांबते, तिला तिच्या भावी जीवनाचा सुखाचा मार्ग सापडतो. इथेच कथा संपते; पण वाचकांपुढे प्रश्न उभा राहतो. ‘सुखासाठी या मार्गाचा अवलंब अखिला किती दिवस करू शकणार आहे?’ कूपेतील दुसरी सहप्रवासी म्हणजे जानकी प्रभाकर. कमी शिकलेल्या व स्वतंत्र विचाराची पात्रता नसलेल्या स्त्रियांची जी मनोवृत्ती असते तीच जानकीची असते. जुन्या विचारांचे जानकीचे उपदेश बाकीच्या जणी तिच्या वयाकडे पाहून ऐकून घेतात. कारण तिच्या बोलण्यात सरळपणा व कळकळ असते. तिच्यासमवेत ‘स्त्रियांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्त्व दाखवूच नये, तरच त्या समाधानी राहू शकतात.’ पती हाच परमेश्वर मानणारी स्त्री दुसरे काय सांगणार? हिच्या मनात एकच सल असते ती म्हणजे लग्नानंतर तिचा मुलगा सिद्धार्थ सतत आईची तुलना सासूशी करून तिला कमी लेखक असतो हेच. बाकी आपल्या संसारात ती समाधानी असते. तिसरी प्रवासी म्हणजे प्रभादेवी. ही सुखवस्तू स्त्री नवऱ्याबरोबर सहज म्हणून अमेरिकेला जाते व तेथून मानसिकदृष्ट्या बदलून येते. तिथल्या स्त्रियांप्रमाणे ती स्वतंत्र आचार-विचारांची, अधिक धीट व अधिक फॅशनेबल बनते. मुळातच ती माहेरची श्रीमंत घरातली मुलगी. वडिलांच्या सौन्या-चांदीच्या चार पेढ्या. जावयासाठी त्यांनी हिऱ्याची पेढी सुरू केलेली. ‘फिजिकल फिटनेस’साठी पोहणे शिकायचे असा निश्चय करून ती स्वत:च्या बंगल्याच्या तलावात मोठा धोका पत्करून स्वत:च-कोणाच्या मदतीशिवाय पोहणे शिकते. ही रुबाबदार, सुंदर, धाडसी व आनंदी स्त्री नावाप्रमाणेच परमेश्वराने दान केलेल्या संपन्न जीवनाचा पुरेपूर उपभोग घेत असते. चौथी मार्गारिटा शांती. सतत मानसिक छळ करणाऱ्या नवऱ्याचा ती अत्यंत अजब पद्धतीने सूड घेते. वास्तविक ही एम. एस्सी. सुवर्णपदकविजेती बाई. प्राचार्य असलेल्या नवऱ्याच्या शाळेत शास्त्र शिक्षक म्हणून काम करीत असते. नवऱ्याला त्याच्या आवडीचे पदार्थ रोज इतके खायला करून देते, की शेवटी अतिवजन वाढल्याने त्याला चालणेही कठीण होऊन जाते. तो परावलंबी बनतो. नवऱ्याची विवशता जसजशी वाढत जाते, तसतशी मार्गारेट खट्टू होत जाते.