मुखपृष्ठ
मॅस्वी कान्हेरे

माझे शेल्फ

मॅस्वी कान्हेरे

इंग्रजी शीर्षक
Masvi Kanhere
सारांश

एका कल्पक उद्योजकाच्या जिद्दी वाटचालीची कहाणी… ‘मॅस्वी आणि कंपनी प्रा. लि.’ या १९४३ साली स्थापन झालेल्या कंपनीचे मालक शारंगधर पुरुषोत्तम कान्हेरे यांचे हे छोटेखानी चरित्र.हे चरित्र आनंद कान्हेरे या त्यांच्या मुलानेच लिहिलं आहे. उत्तम आर्थिक परिस्थित असल्याने शारंगधर कान्हेरे यांनी त्या काळात परदेशात, मँचेस्टरला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.एस्सी. टेक केलं आणि त्यानंतर बर्मिंगहॅम इथल्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कंपनीत रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात नोकरी केली. या काळात युरोपातही दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. कंपनीतलं उत्कृष्ट काम करून कान्हेरे राष्ट्रभक्ती आणि घरातील जबाबदारीची जाण ठेवत भारतात परतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात पाच जणांनी केली आणि त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांनी मॅस्वी हे नाव दिले. सुरुवातीच्या काळात मॅस्वीने मुख्यत्वे पंपसेट, मोठ्या इलेक्ट्रिकल मोटारी व स्वीचगिअरची विक्री केली. हा व्यवसाय मुख्यत्वे एजन्सीजच होता. त्याची वाढ होत असली तरी कान्हेरेंच्या शिक्षणाचा, अनुभवाचा कस लावणारा नव्हता. त्यामुळे कान्हेरेंनी ‘भारत मॅन्युफॅक्चरिंग’ नावाने स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. या उद्योगाने सुरुवातीला शेगड्या, इस्त्री अशा विद्युत्चलित गोष्टी बनवायला सुरुवात केली. आईसफ्रूट बनवणे, प्लेटिंग करणे अशी कामे सुरू केली. मात्र दोन्ही कामांचा ताण आल्याने त्यांनी ‘भारत इलेक्ट्रिकल’ची जबाबदारी दुसरीकडे सोपवली. पुढे मॅस्वीचा विस्तार करत त्यांनी त्याची शाखा कोल्हापूरलाही सुरू केली. कंपनीकडे पुढे एअर इंडियाने काही वस्तू बनवण्यासाठी विचारणा केली आणि १९५३ मध्ये मॅस्वीत वस्तुंचीही निर्मिती सुरू झाली. सुरुवातीला सामान ठेवण्यासाठी रॅक्स आणि लोखंडी स्कॅफोल्डिंग बनवले आणि पुढे विमानाच्या दाराशी जाईल अशी शिडी बनवण्यात येऊ लागली. असंख्य कसोट्यांना पार करत ही शिडी एअर इंडियाला योग्य वाटली आणि हीच या कंपनीसाठी यशाची शिडी ठरली. पुस्तकाचे चरित्र लेखकही अभियंते असल्याने या शिडीचे तांत्रिक बारकावेही तयांनी कुशलतेने लिहिले आहेत. मॅस्वी उद्योगाने यानंतर पुण्यात स्वतंत्र कारखाना उभा केला. या कारखान्यात केवळ विमानांसाठी शिड्याच नव्हे तर अनेक उत्पादने घेतली जाऊ लागली. जुन्या उत्पादनातही त्यांनी कल्पक सुधारणा केल्या. लेखकांनी हा भाग तांत्रिक तपशील अन् आकृत्या देत अतिशय स्पष्ट लिहिला आहे. पुढे एअर इंडियासाठी टायर ट्रान्सपोर्ट डॉली, पॅरॅफिन एअरक्लिनिंग इक्विपमेंट बॅगेज ट्रॉली अशी अनेक उत्पादनं बनवली आणि विमानतळावर लागणाऱ्या वस्तुंचे कान्हेरे प्रमुख उत्पादक बनले, एवढेच नव्हे तर देशात आयात होणाऱ्या या वस्तूंचे उत्पादन भारतातच झाल्याने देशाचे लक्षावधी डॉलरचे परकीय चलन वाचवले. एअर इंडियाच्या ‘इंजिन इन्स्ट्रॉलेशन अॅन्ड रिमूव्हल स्टॅन्ड’ या उत्पादनासाठी कान्हेरेंना १९७३ साली राष्ट्रपती पदकही मिळाले. पुढे १९७१ नंतरच्या आर्थिक मंदीच्या काळात मात्र मॅस्वीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अगदी दिवाळखोरीलाही सामोरे जावे लागले. या सगळ्या काळात वृद्धत्वाकडे झुकलेल्या कान्हेरेंनी अतिशय ठामपणे निश्चयाने आपला लढा सुरू ठेवला आणि देणेकऱ्यांचे पैसे देण्यात यशही मिळवलं. मॅस्वीची ही वाटचाल लेखकाने अतिशय बारकाईने लिहिली आहे. विशेषत: त्यातला तांत्रिक भाग सखोलतेनं लिहिला आहे. अतिशय सुसंस्कृत प्रयोगशील माणसानं कष्टानं उभा केलेला हा उद्योग यशाची उंचीही गाठतो आणि अपयशाने पूर्णत: खचतो. त्यामुळे ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करते, अनुभवाचे धडेही देते. लेखकाने आपल्या पित्याचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची प्रयोगशील वृत्ती अन् हुशारी अत्यंत जवळून अनुभवली असल्याने आशयाची अस्सलता लेखनात उतरली आहेच. व्यवसायाबद्दल, वडिलांबद्दल तटस्थतेने लिहिण्याचा प्रयत्न केला असला, तरी आपल्या माणसांविषयी आस्था, आदर अन् त्यांच्या यशापशातलं गुंतणंही पुस्तकात वाचायला मिळतं. एकूणच एका कर्तबगार, संवेदनशील वत्सल माणसानं आपला व्यवसाय, कुटुंबाचा मांडलेला हा लेखाजोखा वाचकांनाही आपलंसं करून घेतो. व्यवसायाचं चरित्र लिहित असताना उत्पादनातल्या तांत्रिक गोष्टी अन् त्यामागचे विचार, अनुभव, उत्पादन अधिकाधिक उत्कृष्ट. बनवण्यासाठी घेतलेला ध्यास परिपूर्णतेनं आला आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद