मुखपृष्ठ
मगरडोह

माझे शेल्फ

मगरडोह

इंग्रजी शीर्षक
Magardoha
सारांश

गूढकथांच्या डोहातला थरार... हुलकावण्या, चकवा, उत्कंठा, नाट्यमयता, अनाकलनीय, अमानवी पात्र, भयावह प्रसंग यांच्या समग्र भट्टीत जन्म घेते ती एखादी रहस्यमय, गूढ कथा. दृश्यमाध्यमातून ते प्रेक्षकांसमोर मांडताना संगीत, कॅमेरा यांची भूमिका विशेष असते. मात्र ुस्तकातून ज्यावेळी एखादी कथा तुम्ही वाचकांच्या हाती सोपवली जाते ते काम कर्मकठीण. कारण प्रसंग, संवाद, पात्र यांची पकड मजबूत असावीच लागते, पण तुमची कल्पनेची बैठकदेखील तितकी मजबूत असणे गरजेचे असते. लेखक शशिकांत काळे यांनी ‘मगरडोह’ या कथासंग्रहात गूढ कथेच्या सर्व कक्षांना सामावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यातील घातचक्र, मगरडोह, अरुंधतीचा डबा, बंद पाकीट, उजाली यांसारख्या कथा वाचकांना थरार आणि भीतीच्या प्रांतात मुक्त संचार करून आणतात.पुनर्जन्मावर आधारित पहिलीच कथा ‘घातचक्र’..पत्नीसह रेल्वेप्रवासाला निघालेल्या श्यामकांतच्या गप्पांमध्ये त्याची गतकाळातील स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्याच प्रवासात श्यामकांत अचानक गायब होतो..श्यामकांतच्या या गायब होण्यामागचं रहस्यं आणि त्याच्या शोधाचा थरार यांची विलक्षण गुंफण ‘घातचक्र’मध्ये अनुभवास येते. ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील नायक एका लहानशा अपघातात एका खड्ड्यात पडतो. पण त्याला जाग येते तेंव्हा तो थेट १८६० सालात पोहोचलेला असतो. तर ‘चकवा’ ही कथा आहे घरदार सोडलेल्या संजय गितेची. हा गिते उतारवयात आपल्या मूळ गावी भेट देतो, त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्याच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. संजय गितेभोवतीचं हे गूढवलय वाचकांनाही गुंगवून सोडतं. ‘रेखाचा आरसा’ आणि ‘रंजनाची प्रतिमा’ या कथांच्या नायिकाही अशाच विस्मयकारक जाणिवांशी जोडलेल्या आहेत. आपल्या मित्राला आरसा भेट देणारी रेखा, त्या आरशातूनच रोज रात्री त्याला भेटायला येते ही कल्पनाच थरारक वाटते. तर ‘रंजनाची प्रतिमा’ कथेतली रंजना एखाद्या गूढ नायिकेसारखी स्तंभित करते. कथासंग्रहाचं शीर्षक असणारी ‘मगरडोह’ही कथाही उत्कंठेचा शिरोबिंदू गाठायला लावणारी आहे. एका चित्राभोवती फिरणारी गूढता या कथेत रहस्यमयरीत्या साकारलेली आहे. ‘पहेली’, ‘अरुंधतीचा डबा’, ‘बंद पाकीट’, ‘डोकेदुखी’, ‘उजाली’या कथाही माणसाचे मनोव्यापार...त्या मनोव्यापारांतील गूढता...मानवी जीवनातील अतर्क्यता...याचं रंजकतेने चित्रण करतात. लेखक दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग घेऊन अशा प्रसंगांनाही एका अनामिक गूढवलयाशी जोडतो. आणि वाचकाला नवी वाचनानुभूती देतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद