मुखपृष्ठ
मी एरिक

माझे शेल्फ

मी एरिक

इंग्रजी शीर्षक
Mi Eric
सारांश

श्वानांच्या विचारांचे भावचित्र... खरे तर माणसाला तो सोडून निसर्गातले बाकीचे प्राणी सारखेच. तरीही काही प्राण्यांवर त्याचे जरा जास्त प्रेम असते. त्यातलाच एक प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला माणसाचा मित्र असेच म्हटले जाते. श्वानप्रेमींवर आजवर अनेक साहि्यिकांनी लिहून झालेले आहे. श्वानप्रेमींची लक्षणे, त्यांचे नखरे, त्यांचा जिव्हाळा, ऋणानुबंध अशा अनेक गोष्टी साहित्यातून येऊन गेल्या आहेत. पण प्राणी स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगतायत, असे थेट साहित्य फारसे वाचनात नसते. अर्थात अशा प्रकारचे चित्रपट आपण पाहिलेले असतात. कार्टून्समधून बोलणारे कुत्रे पाहिलेले असतात. तरीही एखादा कुत्रा स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगताना कसे वाटेल? ‘मी एरिक’ या पुस्तकात असाच एक मस्त केसाळ पॉमेरियन त्याची गोष्ट सांगतो आहे. ‘माय नेम इज एरिक’ या रेई किमुरा यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. मुळात पुस्तकाचा मूड मस्त खेळकर आहे. ती एका पाळीव कुत्र्याची गोष्ट आहे, त्यामुळे त्याचे लोभस नखरे, त्याच्या कुटुंबावरचे त्याचे प्रेम, किस्से असे सगळे काही आहे. पण हा खेळकर मूडमध्ये हसवणारा कुत्रा त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी अशा सहजपणे सांगून जातो की आपल्या डोळ्यांत नकळत पाणी येते. अगदी सुरुवातच करायची तर पहिल्या प्रकरणात एका श्वान प्रजोत्पादन केंद्रामधील एका एरिकचे आयुष्य आणि आईपासून दूर होताना त्याची अवस्था, याचे वर्णन आपल्याला अस्वस्थ करते. पाळीव प्राण्यांच्या दुकानात गेल्यावर तिथले गोजिरे श्वान, गोबऱ्या मांजरी आपले लक्ष वेधून घेतात. पण आपल्या सुखासाठी या पिलांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते, हे आपल्या लक्षातही येत नाही. ती गोष्ट ‘मी एरिक’चे पहिले प्रकरण सहज सांगून जाते. विमानातून या प्राण्यांची होणारी ने-आण, गैरसोय, त्यामध्ये त्यांना वाटणारी निसर्गसुलभ भीती, त्यांच्या मनाची द्विधा अवस्था सगळे काही एरिक आपल्याला सांगतो. पाळीव प्राण्यांच्या दुकानातून त्याच्या मालकाच्या म्हणजे जेनिफर आणि तानियाच्या घरी आल्यावर मात्र एरिकचे अच्छे दिन सुरू होतात. इथपासून म्हणजे प्रकरण तीनपासून एरिकच्या धम्माल कसरतींना सुरुवात होते आणि पुस्तकातील खेळकरपणा, गंमत परत येते. एरिकचा स्वभाव, त्याचे मालकिणीला म्हणजे त्याच्या भाषेत त्याच्या मानवी आईला आपल्या तालावर नाचवणे, घरातील इतर माणसांसोबतचे त्याचे नातेसंबंध, पिंजऱ्यातून घरी जाण्यासाठी त्याने श्वानसुलभ भावनेने घरच्या लेकीला लावलेला मस्का अशा सगळ्या गोष्टी मजा आणतात. एरिकचा आगाऊपणा, त्याचे कचऱ्याचे वेड, धुण्याच्या कपड्यांचा त्याने केलेला उकिरडा या गोष्टी या कुत्र्याबद्दल राग वाटू न देता त्याच्याबद्दलचे प्रेमच जागृत करतात. एरिकच्या अशक्य दंग्याला कंटाळून त्याला आज्ञापालन केंद्रात दाखल केले जाते. तिथला किस्साही धम्माल आणतो. एरिकचा शेजारी असलेल्या ‘कोल’ या जर्मन शेफर्डसोबतची त्याची खुन्नस, त्याचा कोलने काढलेला राग, एरिकला झालेला अपघात, श्वानसौंदर्य स्पर्धेत खट्याळ एरिकने घातलेला गोंधळ या सगळ्या गोष्टी हसू आणतात. एरिकचे सामर्थ्य आणि तथाकथित पुरुषार्थ दाखवणारे तसेच त्याच्या आगाऊपणामुळे त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे प्रकरण वाचनीय आहे. दोन्ही प्रकरणांत एरिक आपल्या लहान असण्याची काळजी न करता उद्योग करून बसतो आणि मग त्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात. पहिल्या प्रकरणात एरिक घरात शिरलेल्या चोराच्या पायाचा कडकडून चावा घेतो आणि त्याला पळवून लावतो. त्याच्या धाडसाचे खूप कौतुक होते; परंतु त्याला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते, तर दुसऱ्या प्रसंगात एरिक घरात कुणी नसताना हट्टाने उड्या मारतो आणि पायाचा घोटा दुखावून बसतो. मरणाच्या दारातून अनेकदा परत आलेला एरिक त्याच्या कुटुंबीयांना अधिकाधिक हवासा होत जातो तसाच आपल्यालाही. संपूर्ण पुस्तकात एक गोष्ट सतत येते, ती म्हणजे एरिकला त्याच्या ऑस्ट्रेलियन वंशाची, आईची येणारी आठवण. माणूस कुठेही गेला तरी त्याला त्याचे बालपण आठवतेच. तो ते विसरू शकत नाही. कुत्र्यांचेही असेच असेल का, अशी एक पुसटशी शंका यामुळे येऊन जाते. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी केली जाते. अनेक पाळीव कुत्र्यांबाबतही मालक तोच निर्णय घेतात. कुत्र्यांचे खच्चीकरणही केले जाते. ही गोष्ट प्राणिमित्रांना पटत नाही, त्याबद्दल खरे तर फारसे बोललेच जात नाही. कारण जिथे मानवाच्या लैंगिकतेबद्दल बोलणेच कठीण तिथे प्राण्यांबद्दल कोण बोलणार? पण पुस्तकातला एरिक मात्र त्याच्या खच्चीकरणाच्या अनुभवाबद्दल सविस्तर लिहितो. त्यात शेवटी तो म्हणतो, हे होणे कुत्र्यांसाठी आणि त्याहीपेक्षा कुत्र्यांच्या जवळच्या मित्रासाठी म्हणजे माणसासाठी फार महत्त्वाचे असते. अशी वाक्ये विचारात पाडतात. श्वानप्रेमींबरोबरच इतरांनाही हे पुस्तक आवडू शकेल. कारण नुसतेच ‘आमचा टॉम्या बाई गुण्णाचा!’ असे भारावलेले हे पुस्तक नाही.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद