माझे शेल्फ
मी झारा गहरमानी : एक देशद्रोही
झारा गहरमानी या सामान्य मुलीची ही आत्मकथा आहे. झारा ही एक सामान्य पर्शियन मुलगी. एव्हिन तुरुंगासारख्या भीषण ठिकाणी राहण्याची तिच्यावर वेळ येते. मात्र ती तेथून निसटते. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ती जी जिद्द दाखवते, ती निश्चितच स्तिमित करणारी आहे. तिचया या बाह्य प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाचे दर्शनही या पुस्तकात घडते. एका सामान्य स्त्रीपासून एका धाडसी, निग्रही कार्यकर्तीमध्ये झालेले तिचे रूपांतरही या पुस्तकातून दिसते.‘माय लाईफ अॅज अ ट्रेटर’ या मूळ पुस्तकाचा अनुवाद प्रभावीपणे करण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्यासमवेत होऊ शकेल, अशा एका वातावरणात राहत असतानाही तिने ज्या पद्धतीने परिस्थितीचा सामना केला आहे. ते वाचताना आपणही झाराच्या भावविश्वाशी एकरूप होऊन जातो. या प्रवासात तिला सोबत असते ती सोहराब नावाच्या एका वेडसर कैद्याची. तो तिच्या वरच बंदिस्त असतो. सुरुवातीला ज्याला ती झिडकारत असते, तोच एकमेव संवादाचा आधार आहे, हे तिच्या लक्षात येते. त्यालाही नकळतपणे तिची काळजी वाटत असते. तो तिला वेळोवेळी सावधही करत असतो. त्याच्या प्रेमात तर आपण पडलो नाही ना, असेही तिला वाटून जाते. अशा झारा जेव्हा बाहेर पडते आणि मोकळ्या वातावरणात येते व घरी परत जाते तो प्रवास आपल्यालाही सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो.