माझे शेल्फ
मी का नाही?
मी का नाही?’ याचं उत्तर द्यावेच लागेल! तृतीयपंथीयांच्या जीवनावर यापूर्वी शिवसेनेचे नेते कै. प्रमोद नवलकर यांनी लेखन केले आहे. तसेच इंग्रजीत या समाजाविषयी भरपूर लिखाण प्रसिध्द आहे. आता मदन पारु नाईक यांनी मी का नाही?’ ही कादंबरी लिहिल आहे. वास्तविक ही कादंबरी नसून सत्य घटनेवर आधारित या समाजाच्या जीवनशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. हा समाज पूर्णपणे उपेक्षित आहे. त्यांच्या जीवनाच्या काही सामाजिक, सांस्कृतिक जगण्याविषयीच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे मत प्रारंभीच लेखकाने नोंदविले असून, ते योग्यच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या आज १.३० कोटींच्या घरात आहे. विविध जाती-धर्माचे आणि पंथाचे लोक या महानगरीत वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात. यामध्ये तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. या शहरात तृतीयपंथीयांच्या शेकडो वसाहती आहेत. चर्चगेट ते विरार आणि व्हीटी ते उल्हासनगरपर्यंत कुठेना कुठे तृतीयपंथी समूहाने राहताना दिसतात. हे लोक बहिष्कृताचे जीवन आजही जगत आहेत. त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने पाहत नाही. ते अत्यंत हलाखीचे आयुष्य जगतात. कायद्याने त्यांना कोणतेच अधिकार दिलेले नाहीत आणि हेच अधिकार मिळविण्यासाठी नाज’ नावाचा तृतीयपंथी पुढाकार घेतो. व्यवस्थेशी संघर्ष करतो. हिजडा समाजानेही शिक्षण घ्यावे, नोकरी करावी, वैद्यकीय उपचार व्हावेत, सामाजिक कार्य करावे, अनिष्ट चालीरीतींना तिलांजली द्यावी, हावभाव बदलावेत यासाठी कादंबरीतील नायक नाज (पाळण्यातील नाव नरेंद्र) समाजाशी संघर्ष करतो. मंत्रालयात आणि न्यायालयात लोक हिजडा म्हणून टिंगलटवाळी करतात. तुम्ही कुठे न्यायाची भाषा करता? हिजड्यांना कुठला आला अधिकार?’ असे प्रश्न करणाऱ्या माणसाची नाजला कीव येते. काही वेळा हतबल नाजला आधार देते ती त्याची आई. वास्तविक पारु नाईक यांनी या पुस्तकातून समाजाला महत्वाचा संदेशही दिला आहे. कोणी कुठे जन्माला यावे हे कोणाच्या हातात नसते. इतर मुलामुलींप्रमाणे कुणाच्या तरी पोटी हिजडे जन्माला येतात; मात्र त्यांच्यात भेदभाव केला जातो. म्हणून नाज आईला प्रश्न विचारतो; ``आई, परमेश्वरानं नारी जातीला मातृत्व दिलं आणि वात्सल्याची नाड जोडली. हे खरं असेल तर आमच्यासारख्यांना पाहून ही वात्सल्याची नाड कशी तोडली जाते?’’ त्यावर आई म्हणते, ``नाज, वात्सल्य लोपत नाही. सामाजिक कुचेष्टेचा क्रूर राक्षस आड येतो. त्याला दूर करायचं धाडस मोजक्याच माता दाखवतात. हे धाडस नसलेल्या माता आतल्या आत कुढत असतात. उपजत वात्सल्य कधीच लोप पावत नाही.’’ नाज आणि त्याचा एक भाऊ एकाच आईच्या पोटी जन्माला येतात. नाज हिजडा असूनही आईनं त्याला कधीच अंतर दिलं नाही. एका प्रसंगात सद्गदित होऊन नाज आईला म्हणतो, ``आई, जगातल्या अभागी जिवांना तुझ्यासारख्या खंबीर माता मिळाल्या असत्या, तर किती बरं झालं असतं!’’ नाज आणि आईमधील संवाद लेखकानं उत्तमप्रकारे मांडला आहे. आज हा समाजही बदलतो आहे. सरकारही दखल घेत आहे. न्याय मिळत आहे. तरीही नाज समाजाला काही प्रश्न करतो. तो म्हणतो, ``माणसासारखीच माणसं आम्ही; पण समाजानं आम्हाला कधीच जवळ केलं नाही. हिजडा, किन्नर, खोजा अशा नावाचं ओझं आम्ही कसं सोसतो हे समाजाला कसं कळणार? आमच्यातील बुध्दिवंतांची बुध्दी कुजवली जाते. त्याची खंत कोणीही बाळगत नाही. रस्त्यावर टाळ्या वाजवून लोकांना अडवणारे आमचे घोळके दिसतात; पण ते असं का करतात, याचा विचार कुणी केलाय? आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो; मात्र तेथेही कुचेष्टाच होते.’’ ज्या समाजाचा आज लोक तिरस्कार करतात, त्या समाजाविषयी लेखकानं जिव्हाळा दाखविला आहे. पाच वर्षं या विषयासाठी खर्च केली आहेत. पुस्तकात कोणत्याही त्रुटी जाणवत नाहीत. एक ना एक दिवस हा समाजही बदलेल... मुख्य प्रवाहात येईल आणि आपल्या सर्वांची दृष्टी बदलेल, असं वाटतं. `मी का नाही?’ या प्रश्नाचं उत्तर मात्र एक ना एक दिवस समाजाला द्यावंच लागणार आहे.