माझे शेल्फ
मी मलाला
अक्षरशक्तीसाठी झुंजणाऱ्या मुलीची गोष्ट प्रगती बाणखेले बंदुकीच्या गोळ्यांनी आणि दहशतीच्या बळावर मुलींना कुणी पुस्तकापासून दूर ठेऊ शकत नाही, असं खणखणीतपणे बजावणाऱ्या नोबेल पुरस्कारविजेत्या मलाला युसूफजईचं ‘मी मलाला’ हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसनं मराठीत आणलं आहे. या पुस्तकातून उलगडणाऱ्या मलालाच्या चित्तथरारक आयुष्याचा घेतलेला वेध... परवाच पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन झाला. स्वातंत्र्याची सात दशकं पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या देशात अद्याप मुलींना शिकण्यासाठी जिवावर उदार होऊन झुंजावं लागतं, बाकी माणूस म्हणून त्यांना कसं वागवलं जातं, हा त्यापुढचा प्रश्न. बंदुकीच्या गोळ्यांनी आणि दहशतीच्या बळावर मुलींना कुणी पुस्तकापासून दूर ठेऊ शकत नाही, असं खणखणीतपणे बजावणी शाळकरी मुलीला भेकडपणे शाळेच्या वाटेवर डोक्यात गोळ्या घातल्या जातात.... जगण्या-मरण्याच्या सीमेरेषेवर मृत्यूशी कडवी झुंज देत ही मुलगी प्रचंड जीवनेच्छा आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या शुभेच्छांमुळे बरी होते आणि पुन्हा उमेदीने शिक्षणापासून वंचित असलेल्या हजारो मुलींचा आवाज बनून जगासमोर येते... अशा मुलीची, मलाला युसूफजईची कहाणी म्हणजे ‘मी मलाला’ हे क्रिस्टिना लॅम्ब या सहलेखिकेसह तिने लिहिलेलं पुस्तक. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठीत उत्तम अनुवाद केलाय आणि मेहता पब्लिशिंग हाऊसनं ते प्रकाशित केलंय. मलालानं गेल्याच महिन्यात अठरावा वाढदिवस साजरा केला. त्याआधी वर्षभर या बहाद्दर मुलीनं नोबेल शांतता पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. मलालाचं गाव आहे स्वात खोऱ्यात. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अफगाणिस्तानच्या सीमेला खेटलेलं, हिंदुकुश पर्वताच्या कुशीत वसलेलं हे स्वात नदीचं खोरं अतिशय निसर्गसंपन्न आहे. एकेकाळी बुद्धानं दिलेला शांततेचा संदेश जगणारं हे खोरं आज दहशतवादाच्या जाळामध्ये होरपळतं आहे. मलाला तिच्या या भागाला स्वर्गीय राज्य म्हणते. पुस्तकभर अधूनमधून स्वातच्या अप्रतिम निसर्गाची अभिमानानं केलेली वर्णनं येत राहतात. हा प्रदेश ती आपल्या नजरेसमोर जिवंत करते. डोंगराच्या कुशीतलं बरकाना हे तिच्या कुटुंबाचं मूळ गाव, पण मलाला जन्मली, वाढली मिंगोरामध्ये. हे स्वातमधलं मध्यम आकाराचं शहर. झियाउद्दिन हे मलालाचे वडील. शिक्षण हा वंचिताच्या जगण्याला प्रकाश देणारा मार्ग आहे, यावर विश्वास असणारा, स्वातमधल्या मुलांसाठी उत्कृष्ट शिक्षणाचं स्वप्न बघणारा, शून्यातून आधुनिक शिक्षण देणारी उत्तम शाळा उघडणारा आणि त्या शाळेसाठी सारं आयुष्य वाहणारा हा माणूस म्हणजे मलालाची प्रेरणा आहे. मलालाची गोष्ट तिची एकटीची नाही. तिच्या शिक्षणाला पाठिंबा देणारा, तिच्या सर्वांगीण विकासासाठी वाट्टेल ते झेलायला तयार असणारा अन् जग बदलण्याचा स्वप्न तिच्या डोळ्यात पेरणारा तिचा पिता, अशा दोघांची ही गोष्ट आहे. गंमत म्हणजे शिक्षणाच्या प्रसारासाठी नोबेल मिळवणाऱ्या मलालाची आई, तोर पेकई कधी शाळेतच जाऊ शकलेली नाही. खुशाल आणि अटल हे मलालाचे धाकटे भाऊ. अत्यंत धार्मिक असलेल्या तोर पेकईची धर्मावर नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धा त्यांनी मलालामध्ये रुजवली आहे. मलाला तिच्या जगण्याबद्दल, कुटुंबाबद्दल, शाळेबद्दल जितक्या सहजतेनं सांगते, तेवढ्याच सहजतेनं ती पाकिस्तानच्या इतिहासाबद्दल सांगते. बुद्ध राजांच्या काळापासून, ब्रिटिश राजवट, फाळणीनंतरचा कालखंड, झिया उल हक यांची धार्मिक कट्टरतावाद पोसणारी अकरा वर्षांची काळी राजवट, बेनझीर भुत्तोंवर पाक जनतेनं केलेलं प्रेम, त्यांची हत्या झाली, तेव्हा हादरलेला देश, जनरल मुशर्रफ यांचा आधुनिकतेचा स्पर्श झालेली एकाधिकारशाही... हे सारं मांडताना हे १६ वर्षांच्या मुलीनं लिहिल्याचा नवखेपणा कुठेही नाही, उलट अत्यंत समतोलपणे गरज असेल तेव्हा परखडपणे तिने हे मांडलंय. मलाला पश्तून आहे. अत्यंत लढाऊ, विश्वासू आणि शब्दाला जागणारे, उपकार आणि वैर कधीही न विसरणारे अशी त्यांची ख्याती. पश्तुनांची संस्कृती, त्यांच्या बऱ्या-वाईट सवयी याबद्दल ती लिहिते. अफगाणिस्तानातील थोर वीरांगना मैवंद इथल्या मलालाईच्या नावावरूनच मलालाचं नाव तिच्या वडिलांनी ठेवलंय. कुठल्याही सर्वसामान्य मुलीसारखंच मलालाचं बालपण आहे. तिच्या मैत्रिणी आहेत. सगळ्यांत जास्त भांडणारी तरीही सर्वांत जवळची मोनिबा आहे. अभ्यासात स्पर्धा करणारी मल्का ए नूर आहे. शेजारीण सफिना आहे. या मुली गप्पा मारतात, गाणी ऐकतात, गोष्टी वाचतात. टीव्ही पाहतात, पण या मुलींना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. जगापासून दूर पर्वताच्या कुशीतल्या छोट्या शहरातल्या या मुलींची स्वप्नं मोठी आहेत. त्या चित्र काढतात, लिहितात, वत्तृâत्व स्पर्धा गाजवतात. हातांवर मेंदी काढताना पान, पुâलं न काढता रसायनशास्त्राची समीकरणं लिहितात.