मुखपृष्ठ
मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी

माझे शेल्फ

मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी

इंग्रजी शीर्षक
Mi,sampat Pal,gulabi Sadiwali Ranaragini
सारांश

संपत पाल या उत्तर प्रदेशातील गडरिया या धनगर जातीतील एका स्त्रीची ही आत्मकथा आहे.दुर्बलांवर होणार्या अन्यायाविरुद्ध एकटीने आवाज उठवणारी ही रणरागिणी आहे.एक १२-१३ वर्षाची लहानशी मुलगी न्यायासाठी बंड करत गुलाबी गँग` या गँगची लीडर कशी बनली याची ही हाणी तिच्याच शब्दांत आहे.विशेष म्हणजे एका फ्रेंच पत्रकार स्त्रीने या तिच्या कहाणीचे मूळ फ्रेंच शब्दांकन केले व त्यानंतर हे आत्मकथन "मेहता पब्लिशिंग हाऊस" कडून सुप्रिया वकील यांनी अनुवादित करुन प्रसिद्ध झाले आहे.खूप सुंदर शब्दांत,ओघवत्या शैलीत व वाचकाला अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा अनुवाद प्रेरणादायी आहे.समाजातल्या सगळ्यात तिरस्कृत समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेली - शिक्षणाची प्रचंड ओढ असलेली पण ते घेऊ न शकलेली एक हुशार मुलगी. परिस्थितीपुढे तिने हार मानली नाही. कुरकुरत बसली नाही. रडलीभेकली नाही. बाबा-बुवाच्या नादी लागली नाही. स्वत:च्या मनाचा कौल महत्त्वाचा मानला. आणि झुंजार लढवय्यी स्त्री बनली त्याची ही कहाणी. उपजतच तिचे विचार स्त्रीवादी होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या शिबिरांमुळे आपण योग्य पद्धतीनेच विचार करतो आहोत याची खात्री पटली आणि मग जसजशी समज वाढत गेली तिने आपले विचार कृतीत उतरवायला सुरुवात केली. हे काम सोपं अजिबात नव्हतं. उत्तरे प्रदेशातली ती खेडेगावं - जातीची उतरंड - अस्पृश्यता पाळणारा समाज - त्याचा फायदा घेणारे सवर्ण आणि या सामाजिक परिस्थितीत अन्यायाला बळी पडणारा दलित वर्ग. स्त्रिया या सर्वांच्या बळी होत्याच याशिवाय कुटुंबातही त्यांच्यावर अन्याय होत होता. गडरिया (धनगर) जातीत जन्म झालेल्या संपतजींनासुद्धा हे सगळं चुकलं नव्हतं. चालीरितीप्रमाणे संपतचं लवकर लग्न झालं. लग्नासंबंधी काहीही माहिती नसताना नवऱ्याबरोबरच्या पहिल्याच संबंधात भीतिदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. सासूने छळलं. हा अन्याय सहन न होऊन संपत त्या विरोधात उभी ठाकली.घर आणि नंतर गावही सोडावं लागलं. तरी माघार न घेता शेती केली, शिवणकाम शिकली, कष्टाला मागेपुढे पाहिलं नाही. पुन्हा घर उभं केलं. आणि असाच अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना मदत करता करता त्यांच्यासह स्वत:ची एक गँग तयार केली. गुलाबी गँग! कुठल्याही कामगिरीवर निघताना ही गँग गुलाबी साडी नेसून, हातात दंडुका घेऊन तय्यार असते. गुलाबी साडी ही त्यांची निशाणीच झाली आहे. अन्यायग्रस्तांना या गँगचा आधार वाटतो तर अन्याय करणारे जरा दबकूनच असतात. स्वत:ही अन्याय सहन करायचा नाही आणि दुसऱ्यावरही तो होऊ द्यायचा नाही. झाला तर तो दूर करण्यासाठी झुंज द्यायची. कुटुंबीयांशी त्यांनी नाही ऐकलं तर सरपंच, पोलीस यांची मदत घ्यायची, त्यांनी नाही जुमानलं तर वरचे अधिकारी, प्रशासकीय आधिकारी, जिल्हाधिकारी, मॅजिस्ट्रेट आणि वेळ आली तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचं पण प्रश्न सोडवल्याशिवाय थांबायचं नाही. हीच त्यांच्या कामाची पद्धत. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक नियोजन करून करायची हेच संपतजींचं वैशिष्ट्य! स्वत:चे सामर्थ्य आणि मर्यादा याची स्पष्ट जाणीव त्यांना आहेच पण विरुद्ध पार्टीला जोखण्याची त्यांची ताकद विलक्षण आहे. ‘मी संपत पाल’ हे या लढवय्या स्त्रीचं आत्मकथन आहे.त्याचं मूळ फ्रेंच शब्दांकन अॅनी बरथॉड यांचं आहे. त्याचा सुंदर मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. मूळचं पुस्तक मराठीच असावं इतका तो सहज आहे. हे पुस्तक वाचणं म्हणजे स्वत:लाच समर्थ बनवणं आहे. ते वाचताना आपण आश्चर्यचकित होतो, थक्क होतो. मनापासून संपतजींच्या कामाला दाद देतो आणि शेवटी एक कडक सलाम ठोकतो. विलक्षण आहे त्यांचं सगळं काम! ‘द गार्डियन’ या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये संपत पाल यांची निवड केली आहे. संपत पाल यांची मुलाखत घेण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, कोरिया असे देशोदेशीचे पत्रकार येतात. बीबीसीने त्यांच्यावर डॉक्यूमेंटरीही केली आहे. भारतातल्या माध्यमांनी मात्र त्यांची पाहिजे तेवढी दखल घेतली नाहीये याची खंत त्यांच्या मनात आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद