माझे शेल्फ
मजल दरमजल
किरण बेदी यांच्या जीवनाची सूत्रे... किरण बेदी यांच्या ‘आय डेअर’ आणि ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ या पुस्तकांना मराठी वाचकांची भरघोस दाद मिळाली. एक तडफदार पोलीस अधिकारी या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचे वेगळेपण आणि मोठेपण सर्वांनाच स्तिमित करणारे वाटते. तिहार जेलचा त्यांनी तीन वर्षांत कायापालट घडवून आणला आणि कैदी म्हणून तुरुंगात खितपत पडलेल्या गुन्हेगारातील माणूसपणाचा शोध घेत, त्यांनी त्यांचा आत्मसन्मान जागा केला. त्यांनी विपश्यना वगैरे मार्गाने आत्मचिंतनास, समाजोपयोगी कार्य करण्यात व आपल्यातील चांगुलपणाचर बूज राखण्यास प्रेरणादायक वातावरण निर्माण केले. आपल्या वैयक्तिक क्षमतांच सुयोग्य विकास करून त्यांना कलात्मक, सृजनशील स्वरूप देऊ शकणाऱ्या व्यक्तीच समाजाला दिशा दाखवू शकतात, हे वास्तव स्वीकारून किरण बेदी यांनी प्रत्येक कामाकडे नव्या नजरेने बघून अपारंपरिक अशा मार्गांचा अवलंब करून हाती घेतलेल्या कामांमध्ये हेवा वाटण्याजोगे यश मिळवले. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. अनेक अडीअडचणींना असीम धैर्याने तोंड दिले. ‘मजल दरमजल’ हे त्यांचे नवे मराठी पुस्तक छोटेच असले, तरी त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचे व्यापक दर्शन घडवणारे आणि त्या कार्यामागची वैचारिक बैठक स्पष्ट करणारे आहे. ‘मोर्चा दर मोर्चा’ या सरोज वशिष्ट संपादति हिंदी पुस्तकाचे भारती पांडे यांनी केलेले हे मराठी भाषांतर आहे. तिहार जेल– माझे दुसरे घर,विपश्यनेची शक्ती, नशामुक्ती कार्यक्रम, पोलीस यंत्रणेतील सुधारणांची दिशा, माध्यमांची जबाबदारी, कुटुंब-स्त्रीशक्ती, युवाशक्ती यांचे महत्त्व वगैरे विषयांवरील किरण बेदी यांचे अनुभवसिद्ध चिंतन या पुस्तकात आले आहे. त्याचबरोबर मी आणि माझे जीवन, जगण्याची काही सूत्रे या लेखांमधून त्यांची जीवनसूत्रेही प्रकट होतात. ‘मी आणि माझे जीवन’ या छोटेखानी लेखात किरण बेदी यांनी आपल्या दिनक्रमाची व युवाशक्ती यांचे महत्त्व वगैरे विषयावरील लेखांमधून त्यांची जीवनसूत्रेही प्रकट होतात. ‘मी आणि माझे जीवन’ या छोटेखानी लेखात किरण बेदी यांनी आपल्या दिनक्रमाची व पूर्यायुष्यातील काही साक्षात्कारी क्षणांची कल्पना दिली आहे. सकाळी सहाला एक कप चहा पिऊन तासभर फिरायला जायचे; परतल्यावर एक कप दूध व फलाहार. दुपारचे जेवण हलके. रात्री एक पोळी डाळ, भाजी, फळे. संध्याकाळच्या पार्ट्या त्यांना आवडत नाहीत. अधेमधे काही खाणे त्या टाळतात. शारीरिक फिटनेसबरोबर मानसिक फिटनेसबाबतही त्या दक्ष असतात. संगीताची आवड आहे. वाचन, लेखनही चालू असते. नव्या लोकांना भेटायला आवडते. रिकामपण टाळतात. निरोगी राहण्यासाठी शांत स्वभावाचीही उपयुक्तता मोठी असते, असे त्या मानतात. आपल्या आवडीचा एक तरी खेळ असावा व तो नियमित खेळावा. खेळाने व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित होते. ‘‘आज मी जी काही आहे त्यामागे टेनिसकोर्ट आहे.’’ मी मुलगा की मुलगी हा सवालच कधी मला पडला नाही. मुलांना न जमणाऱ्या गोष्टीही सहजपणे करायची प्रवृत्ती, अंगात बाणली गेली. निर्भयपणा आला. विचारांत मोकळेपणा आला. कॉलेजातही लहानसहान प्रसंगातून त्यांची विद्रोही मानसिकता घडत गेली. नोटीस बोर्ड वाचताना उंच मुलेमुली पुढे उभ्या, किरण बेदी उंचीने कमी. त्यांनी मुलांना म्हटले, ‘अरे, तुम्ही दुसऱ्यांना नोटीस बोर्ड बघू देणार की नाही? वाहने उभी करण्याच्या जागी काही मुले मुलींची छेड काढत. किरण बेदींनी प्राध्यापकांना म्हटले, ‘‘मुलींच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किग करा.’’ डॉ. राधाकृष्णन यांची उपनिषदांवरची पुस्तके त्यांनी वाचली. मार्गारेट थॅचरचे पाथ टू पॉवर, राजमोहन गाधींचे द गुड बोटमन- वगैरे पुस्तकांनी झपाटले. वेळेचे नियोजन, आत्मविकास, अध्यात्मिक अनुभव, सकारात्मक जीवनदृष्टी याबद्दलची पुस्तके वाचण्यात त्यांना रस वाटू लागला. कविता लेखनाचीही उर्मी प्रबळ असे. टेनिसच्या आवडीमुळे ओळख झालेल्या ब्रिजशी लग्न. पती ब्रिजचे वास्तव्य व्यवसायामुळे अमृतसरला असते. दांपत्य जीवनाबद्दल किरण बेदींना समाधान आहे. सासूचे प्रेम आहे. आपले दैव आपल्या मुठीत आहे आणि जे काही घडेल ते आपल्या कर्माचा परिणाम म्हणून घडेल.’’ अशी त्याची श्रद्धा आहे. मी एक प्रशिक्षित कार्यकर्ती आहे. अभ्यास, धावणे, खेळणे- आपले प्रत्येक पाऊल विशिष्ट ध्येयाच्या दिशेने पडते आहे. नजर शिखरावर खिळलेली आहे. पेचप्रसंगांनीच जीवनाला गती येते, असे त्या मानतात. आपल्या जीवनाची सूत्रे म्हणून किरण बेदी काही गोष्टींना महत्त्व देतात. वेळेचा सदुपयोग, मानसिक, आंतरिक बळावरचा विश्वास, आत्मसन्मानाची जाणीव, सतत क्रियाशील राहण्याची वृत्ती, ज्ञानप्राप्तीची लालसा, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा व दुसऱ्याला आनंद देण्याचा निर्धार, विपश्यना, साधना, योग, चिंतन, प्रार्थना, मन, शरीर, व्यवसाय, मैत्री, प्रकृती या सर्वांत काही आंतरिक सुसंगती हवी तर मग आनंदाचा खरा अनुभव येतो.
गेल्या शतकातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांची मुळातून होत असलेली ही ओळखसुद्धा या कादंबरीची महत्त्वाची बाजू आहे. कारण त्यामुळे वाचकाच्या ज्ञानात बरीच मौलिक अशी वैचारिक भर पडते. या कादंबरीच्या वैचारिक बाजूविषयी खूप लिहिता येईल. उदाहरणार्थ, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेविषयी जोतिरावांनी केलेलं भाषण हा या कादंबरीतील वैचारिकतेचा उत्तम नमुना आहे. या भाषणातून म. फुल्यांची सत्यधर्माच्या स्थापनेविषयी भूमिका सहजच स्पष्ट होते. माझ्या मनात म. जोतिबा फुल्यांविषयी असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या कादंबरीने मला दिली आहेत. संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी म. फुले यांनी जे कार्य केले ते पाहून माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर अधिक द्विगुणित झाला. ‘महात्मा’ ही कादंबरी वाचून इतरांनाही हाच अनुभव येईल, अशी मला खात्री आहे. लेखकाच्या स्पष्ट, निर्भिड, रोकठोक भाषाशैलींचे प्रत्यंतर कादंबरी वाचताना ठिकठिकाणी येत राहते. कादंबरीची निवेदनशैली परखड तशी प्रसंगी मृदू मुलायमही आहे. लेखकाची निवेदनशैलीच अशी ओघवती आणि धारदार आहे की, तिच्याद्वारे महात्मा फुले यांचे विचार अगदी थेटपणे वाचकांच्या मनात जाऊन पोचतात. त्यावरून म. फुले यांची भाषा कशी होती, याचीही कल्पना आपणास या कादंबरीमुळे अनेक प्रसंगांची चित्रदर्शी वर्णने वाचत असताना ते प्रसंग अगदी सहजपणे डोळ्यांसमोर उभे राहतात. या कादंबरीच्या भाषेचे रूप ठिकठिकाणी आलेल्या संवदातूनही प्रकट झाले आहे. कादंबरीतील अनेक संवाद वाचकाला विचारप्रवृत्त करतात. ‘उद्या महारमांगांची पोरे शिकून अंमलदार झाली तर आम्ही काय त्यांना मुजरे करायचे काय? होय रे?’ संवादातून झालेली अनेक वाक्ये अशी सूचक व अर्थगर्भ आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही कादंबरी कुठेही सनावळीत आणि अनावश्यक अशा तपशीलात अडकून राहत नाहीत. त्यांचा संदर्भ चार ते पाचच उल्लेख या कादंबरीत येतात. तेही आवश्यक आहेत म्हणून काळाचे उल्लेख फार नाहीत म्हणून लेखकाचे काळाचे भान सुटले आहे असे मात्र नाही. त्याकाळाचे वातावरण निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. म. फुले या लोकोत्तर महामानवाविषयी कितीही लिहिले तरी ते कमीच ठरते. म्हणूनच त्यांच्यावर कादंबरी लिहिणे ही निश्चितच सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉ. रवींद्र ठाकूर यांनी कष्ट व कुशलता या बळावर ते अवघड कार्य पार पाडले आहे. एवढे मात्र निश्चित की, म. फुले यांच्याविषयी आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, परंतु त्या सर्व पुस्तकांमध्ये ‘महात्मा’ ही कादंबरी अधिक लक्षवेधी आहे आणि उद्याही कदाचित ती तशीच राहील.