माझे शेल्फ
मना सर्जना
वैद्यकीय व्यवसायात ५० वर्षे पूर्ण केलेले निष्णात सर्जन डॉ. अनिल गांधी यांच्या आयुष्यातील विलक्षण अनुभवांचा समावेश असलेल्या अर्थातच डॉक्टरांच्या प्रांजळ आत्मकथनाचे ‘मना सर्जना’चे प्रकाशन उद्या शनिवार पुण्यात होत आहे. माढा येथे जन्म झालेल्या डॉ. गांधी ांचे पुस्तक केवळ त्यांचे आत्मकथन म्हणून नाही, तर गेल्या ५० वर्षांतील घडामोडींचे व वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा नोंद घेणारा दस्तावेज म्हणूनही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, डॉक्टरांचे निकटचे मित्र आणि चरित्रलेखिका चित्रलेखा पुरंदरे अशा अनेक मंडळींच्या आग्रहातून डॉक्टर आपले अनुभव शब्दबद्ध करायला तयार झाले. चित्रलेखा पुरंदरे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन व संपादन केले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकामुळे डॉक्टरांचा संघर्ष तर वाचकांना समजेलच, त्याचबरोबर डॉक्टर अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार कसे ठरले व आपल्या व्यावसायिक निष्ठांचा विसर पडू न देता अनेक आव्हानांना ते सामोरे कसे गेले हेदेखील लक्षात येईल. पुण्यात अत्यंत गाजलेल्या मंजुश्री सारडा खून प्रकरणाशी डॉ. गांधी यांचा संबंध कसा आला व त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे सारडा खुनातील आरोपी शरद सारडा याला कशी शिक्षा झाली, या घटनाक्रमाची माहिती मिळते. ब. ना. भिडे यांच्यासारख्या कायदेपंडितासमोर डॉक्टरांनी कशी साक्ष दिली व त्यांच्या प्रश्नांच्या फैरींना कसे उत्तर दिले हे सारे यातून समजते. प्रत्येक बाब नियोजनबद्ध रीतीने करणे, इंटर्नशिप पुण्याऐवजी औरंगाबादला का केली, त्यातून काय फायदे झाले ते कळते. त्यापेक्षा डॉक्टर किती प्रारंभापासून नियोजन करत होते व शिस्त आणि नियोजनाचा कसा फायदा होतो हेदेखील समजते. सर्जन म्हणून आलेले अनुभव आणि एक सर्जनशील मनाला आलेल्या अनुभवाच्या सुसंवादाचे रूप म्हणजे हे आत्मकथन आहे. तुमचे पुस्तक वाचून प्रस्तावना लिहायची की नाही असे स्पष्टपणे सांगणाऱ्या डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी पुस्तक हातात घेतले आणि वाचूनच संपवले, मी प्रस्तावना लिहितो, अशी आशीर्वादात्मक दिलेली दाद, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी हस्तलिखित वाचले त्या सगळ्यांची पसंती, यामुळे हे पुस्तक वेगळे ठरले. एकदा पुस्तक लिहायचे ठरल्यावर डॉक्टरांनी अवघ्या एक वर्षात हे पुस्तक पूर्ण केले आहे. शब्दांकन करणाऱ्या चित्रलेख पुरंदरे यांनी या संदर्भात सांगितले की, डॉक्टरांची स्मरणशक्ती अफाट आहे. त्यांनी मला इतकी तपशिलवार माहिती दिली, की कुणीही थक्क होईल. मी त्यांच्या पेशंट्सना भेटले, त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली. प्रत्येक वेळी डॉक्टरांचा वेगळा पैलू मला जाणवला. केवळ स्वतःचे कौतुक करण्याचा त्यांचा कुठेही हेतू नाही. जे जसे घडले ते त्यांनी सांगितले. तसेच त्यांचा विविध विषयांचा अभ्यास व त्यांच्या आवडीचे विषय याबद्दलही त्यांनी यात लिहिले आहे. डॉक्टरांनी आदिवासींसाठी ‘आदिशक्ती’ ट्रस्टच्या माध्यमातून काम केले. आदिवासींसाठी आश्रमशाळा उभी करण्याचे ठरवले तेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी दिली. डॉक्टरांचे समाजकार्य बघून जगप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीनिवास मित्तल यांनीही या कार्याला कशी मदत केली हे सारे या पुस्तकामुळे समजते. आपल्याकडील सुताराच्या ऑपरेशन व त्याच्या औषधासाठी स्वतःचे दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम खर्च करणाऱ्या अनिल गांधी यांच्यासारख्या निःस्पृह माणसाचा मित्तल यांच्यासारख्या कुबेराशी स्नेह कसा जुळला व वृद्धिंगत होत गेला हेही या पुस्तकातून कळते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा कारभार, वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांना स्पर्श करणारं अर्धशतकाचं हे आत्मचिंतन केवळ एकाच माणसाचं न राहता गेल्या ५० वर्षांतील समाजजीवनातील बदलाचं सक्षमपणे आणि सजगपणे नोंद घेणारं ‘समाजचित्र’च रेखाटणारं पुस्तक ठरतं हे नक्की!