माझे शेल्फ
मोहिनी
खिळवून ठेवणारी ‘मोहिनी’… मनोरुग्ण स्त्रीची कहाणी कादंबरीतून मांडण्याचे मोठे आव्हान पारू मदन नाईक यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीत लेखिकेने या नायिकेचे विश्व ज्या पद्धतीने मांडले आहे, ते पाहता नाईक यांची ही पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वास बसणार ाही. मोहिनी ही या कादंबरीची नायिका. एका सुखवस्तू इनामदाराची पत्नी. दोन्ही सरकार घराणी असल्यामुळे परंपरागत इनामदारी संस्कारात ती वाढली आहे. खानदानी मोहिनीचा विवाह प्रतापराव या संगीतप्रेमी सतारवादकाशी होतो. मोहिनीलाही ते सतारवादन शिकवतात. त्यांचे आयुष्य सुखाचे सुरू होते. मोहिनीला दोन मुलीच होतात. त्यामुळे वंशाला ‘वारस’ मिळावा यासाठी हे इनामदार दापत्यं झुरत असतात. मोहिनी पुत्रप्राप्तीसाठी वेडीपिशी झालेली आहे. आपली प्रतिष्ठा, भावी जीवनाचे अस्तित्व इनामदार घराण्याचा वंशवेल पुढे वाढावा यावर अवलंबून आहे, अशा भयगंडात मोहिनी जगत असते. त्यासाठी तिचे देवदेवतांना नवस-उपास, तापास सुरूच असतात. अखेर थोड्याफार उशिरानेच तिला दिवस जातात आणि अपेक्षेप्रमाणे गुटगुटीत मुलगा होतो. मोहिनीच्या आनंदाला पारावार राहता नाही. पण चार महिन्यातच या मुलाचा अकल्पित मृत्यू होतो. मोहिनीचे सारे भावविश्वच हादरते. तिच्या आईवेड्या मनावर याचा गंभीर परिणाम होतो. तिला वेडाच झटके येतात. मोहिनीच्या अशा वागण्यामुळे सासर-माहेर उद्ध्वस्त होते. निष्पाप भोळ्या भावनाशील मोहिनीला ‘स्क्रिझोफोलिया’ या दुर्धर रोगाने पछाडले. अधूनमधून त्याचे झटके तिला येतात, तेव्हा ती हिंस्त्र बनते. घरातील सारेजण तिच्या अशा या वागण्यामुळे घाबरून गेलेले असतात. मोहिनीच्या सासर-माहेराकडील घरचे वातावरण पूर्ण बदलून जाते. दोन्ही घरातील भावभावनांचा कल्लोळ लेखिकेने या कादंबरीतून अचूक मांडला आहे. मोहिनीचे आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं, नोकर-चाकर, सासू-सासरे, पती यांच्या वागण्यात बोलण्यात हळूहळू अंतर पडू लागते. बदललेल्या वातावरणाचा गंभीर परिणाम मोहिनीवर पडत असतोच. शेवटी तिला मनोरुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येतो. लेखिकेने मोहिनीच्या मनोरुग्णालयातील वास्तवाचे एक वेगळे विश्व या कादंबरीतून उलगडलेले आहे. मोहिनीने या रुग्णालयात एक-दोन नव्हे तर उणीपुरी एकवीस वर्षे काढली. शॉक ट्रिटमेंट, इतर रुग्णांचे वागणे, घरापासून दूर, अनोळखी लोकांमध्ये मोहिनीने काढलेले हे वेगळे आयुष्य वाचले तर तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. या काळात मोहिनीने स्वत:चे गोकुळ या रुग्णालयात निर्माण केलेले असते. या संपूर्ण काळात ती घरच्यांना विसरलेली नकळत आपण त्यांच्यातले असूनही ते घर आपल्याला मिळू शकणार नाही ही तिला जाणीव आहे. या साऱ्या प्रवासात ती आपल्या मुला-मुलींना विसरलेली नाही. तो अजूनही जिवंतच आहे, या भ्रमात ती जगत असत. पती प्रतापराव अशा काळातच तिच्याशी घटस्फोट घेतात आणि दुसरा विवाह करतात. मोहिनी हतबल होते. तिने ज्या विश्वासाने आपले रुग्णालयातील आयुष्य सुरू केलेले असते, त्यालाच तडा जातो. मोहिनीचे आई-वडिल, माहेरची सारी माणसे हताश होतात. मोहिनी हा आघात हळूहळू पचवते. लेखिकेने मोहिनीचे वागणे, तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे केलेले वर्णन अप्रतिम आहे. मोहिनीविषयीचा लळा, प्रेम, जिव्हाळा या साऱ्यांचे वर्णन लेखिकेने या कादंबरीतून जिवंत केले आहे. रुग्णालयातून बरे होऊन माहेरच्या घरी येण्याचा प्रसंग भावपूर्ण आहे. मोहिनीची सवत, मोहिनीच्या दोन्ही मुली, त्यांचे पती, नातू या साऱ्या नातेसंबंधात मोहिनी पुन्हा गुरफटते. या काळातही मोहिनी आपल्या पतीला विसरलेली नाही. घटस्फोटानंतरही ती प्रतापरावांवर प्रेम करत असते. प्रतापरावही केवळ वृद्धावस्थेतील सोबत म्हणूनच दुसरा विवाह करतात, पण त्याचे पहिले प्रेम मोहिनीच असते. या काळात प्रतापरावांचाही मृत्यू होतो, तेव्हा मोहिनीवर दुसरा आघात होतो. या धक्क्यातून ती सावरते. वडिलाच्या मायेच्या सावलीत आपले उर्वरित आयुष्य घालवणाऱ्या मोहिनीवर तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा आघात होतो. पण मोहिनी आघातावर आघात झेलूनही आता संयमी बनलेली आहे. संवाद हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. वेगळा व गंभीर विषय हाताळताना लेखिकेने या कादंबरीची गती कमी होऊ दिलेली नाही. गंभीर प्रसंगातून एका मनोरुग्ण स्त्रीचे जीणे उलगडून दाखवलेले आहे. मनोरुग्ण होण्यापूर्वीचा काळ, प्रत्यक्ष मनोरुग्णाचा काळ, त्यातून सावरलेली नायिका, तिचे पूर्ण बरे होणे, त्यानंतर सातत्याने होणारे आघात झेलत जगणाऱ्या नायिकेला हा प्रवास वाचनीय झाला आहे.