मुखपृष्ठ
मुघल सत्तेचा सारिपाट

माझे शेल्फ

मुघल सत्तेचा सारिपाट

इंग्रजी शीर्षक
Mughal Sattecha Saripat
सारांश

सत्तापिपासू राजकारणावर दृष्टिक्षेप... भारताचा राजकीय इतिहास मुघल साम्राज्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. तब्बल ३५० वर्षे दिल्लीच्या तख्तावर मुघलांनी राज्य केले. बाबरपासून सुरू झालेल्या या साम्राज्यात महत्त्वपूर्ण काळ आहे औरंगजेब बादशाहचा. गाबाजी करून आणि आपल्या साऱ्या भावंडांना बाजूला सारून औरंगजेबाने सत्तारोहण केले. ‘मुघल सत्तेचा सारिपाट’ ही कादंबरी औरंगजेब सत्तारूढ होण्यासंदर्भातील घटनांवर सखोल दृष्टिक्षेप टाकते. श्रीनिवास राव अडिगे यांच्या ‘द मुघल हाय नून’ या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद उदय भिडे यांनी केला असून सत्तेच्या लालसेपोटी एकमेकांचा काटा काढणाऱ्या मुघल साम्राज्याविषयी ही कादंबरी माहिती देते. १७व्या शतकाच्या मध्यकाळात प्रकृतिस्वास्थ्य बिघडल्यामुळे मुघल सम्राट शहाजहान मृत्युशय्येवर आहे. मात्र पित्याच्या पश्चात सत्ता कुणी हस्तगत करावी यासाठी शहाजहानची चारही मुले आपापसात झुंजत आहेत. दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद ही शहाजहानची चार मुले. या चारही मुलांची स्वभाववैशिष्ट्ये, वागणूक यांचे वर्णन कादंबरीत करण्यात आले आहे. शहाजहानचा थोरला मुलगा दार शुकोह त्याच्या अतिसंवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याची ही अतिसंवेदनशीलताच सत्ता हस्तगत करण्यात त्याच्या आड येते, हे या कादंबरीत दाखवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये थांबलेला दारा आपल्या पित्याची नीट काळजी घेत आहे. अत्यंत कडक बंदोबस्तात शहाजहानवर उपचार सुरू असताना पित्याबाबत दार शुकोहला वाटत असलेली काळजी या कादंबरीत दाखवण्यात आली आहे. हकिमाच्या औषधांचा गुण येत नसल्याचे दिसताच तो पित्यावर गुपचूप एका हिंदू वैद्याकडून उपचार करून घेतो. हिंदू वैद्यालाही शहाजहानवर कडेकोट बंदोबस्तात उपचार करावे लागले हे सांगत ही कादंबरी तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थिती आपल्यापुढे उभी करते. मुघल बादशहावर अत्यंत कडक बंदोबस्तात उपचार सुरू असल्याने अफवांचे पीक भरमसाठ फोफावते. त्यामुळे दिल्लीपासून दूर असलेल्या अन्य तीन भावंडांना चुकीची आणि अर्धवट माहिती मिळत राहते आणि त्यामुळे त्यांच्यातील सत्तासंघर्ष वाढत जातो. मुघल साम्राज्यातील गुप्तहेर आणि हस्तकांनी चुकीची माहिती आणि त्याबरोबरच अर्धसत्य गोष्टी पसरवल्याने भावाभावांतील तणाव कसा वाढत जातो याचे वर्णन ही कादंबरी करते. या कादंबरीत प्रत्येक पात्राची गुण वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहेत. शहाजहानचा धाकटा मुलगा मुराद याची अतिभोगलालसा आणि शुजा याच्या आतातायीपणाचे वर्णन कादंबरीत करण्यात आले आहे. दारा, मुराद आणि शुजा यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे सम्राट म्हणून दिल्लीच्या तख्ताचे सत्तारोहण करण्यासाठी औरंगजेबासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, याचे वर्णन या कादंबरीत करण्यात आले आहे. सत्ताग्रहण,श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांना या कादंबरीत लालित्यपूर्ण पद्धतीने धांडोळा घेण्यात आला आहे. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज मुघल तसेच वासना, नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे चित्रण आहे. शिकारीच्या नावाखाली शुजाकडून निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांना सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णन या कादंबरीत आहे. कादंबरीची भाषा ओघवती असली तरी कादंबरी असल्याने ऐतिहासिक वस्तुस्थितीऐवजी काल्पनिक घटनांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येते. अनेक घटना इतिहासची मोडतोड केलेल्या वाटतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे उलगडत जात ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे चांगले चित्रण या कथानकातून करण्यात आले आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद