माझे शेल्फ
नागासाकी
सोमवार, ६ ऑगस्ट १९४५. सकाळी ८.०५ला ‘लिटल बॉय’ हिरोशिमाच्या दिशेनं झेपावला. हिरोशिमातील हानीचे वृत्त सर्व जपानला कळण्याआधीच ९ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ११वाजता नागासाकी शहरावर ‘फॅट मॅन’ हा दुसरा अणुबाँब टाकण्यात आला. दोन्ही हल्ल्यात निरपराध अज्ञातांचा निंकुश संहार झाला. ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत हिरोशिमा व नाकासाकीतील प्रत्यक्ष घटनांचा अभ्यास करून क्रेग कोली यांनी पुस्तक लिहिले. क्रेग कोली हे ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी निर्माता व दिग्दर्शक आहेत. दैनंदिन व्यवहारात मग्न असणाऱ्या यामागुची निशिओका, टाकिगाव, मिस्त्यू, सातोषी नाकामुरा, फादर तमाया, फादर सायमन, डॉ. नागाई, डॉ. आकिझुकी, युद्धकैदी मॅकग्रथ-कर, चीक या व अशा असंख्य लोकांना या स्फोटांचा चटका बसला. असंख्या जीव गमावले तर अनेकांनी मरणयातना भोगल्या. जवळजवळ एक लाख लोक मरण पावले. प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती, डायऱ्या, पत्र यांच्या आधारे क्रेग कोली यांनी ही ऐतिहासिक सत्यकथा अनेक पातळ्यांवर लिहून त्या भयंकर दिवसांचे यथार्थ चित्रण केले आहे. लेखकाने अनेक व्यक्तिरेखा खूप समरसतेने उभ्या केल्या आहेत. सामान्य लोक नरकयातना भोगत असताना जगाच्या पटावरील अमेरिकन, रशियन व इतर नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न होते. अनुवादक डॉ. जयश्री गोडसे यांना असे वाटते की, हिरोशिमा स्फोटानंतर जपानने लगेच शरणागती पत्करली असती तर नागासाकी वाचले असते. अमेरिकेच्या अधिकाऱ्याची वृत्ती, शास्त्रज्ञांची हुशारी अशी संहारक शस्त्र तयार करण्यासाठी वापरली गेली आणि मानवतेला लाजवणारी घटना घडली. मुखपृष्ठावरील मशरूम आकाराचा ढग, चेहऱ्यावर साकळलेले दु:ख व लाल रंगातील ‘नागासाकी’ अक्षरे हा अनुभव गडद करतात. जगाला कलाटणी देणाऱ्या संहाराविषयीचे हे पुस्तक आवर्जून वाचावे, संग्रही ठेवावे असे आहे.