मुखपृष्ठ
नाना आणि महादजी

माझे शेल्फ

नाना आणि महादजी

इंग्रजी शीर्षक
Nana Ani Mahadaji
सारांश

गारद्यांनी नारायणराव पेशव्यांची हत्या केल्यानंतर पेशवाई रसातळाला जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना नाना फडणवीस आणि महादजी शिंदे पेशवाईचे तारणहार ठरले. त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाही कळसाला पोहोचली. त्यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा कुदन तांबे यांची ‘नाना आणि महादजी’ ही कादंबरी घेते. थोरल्या माधवराव पेशव्यांचा १९७२मध्ये वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे गादीवर आले. मात्र काका रघूनाथरावांकडून भित्र्या स्वभावाच्या नारायणरावांची हत्या केली जाते. त्यासाठीची कटकारस्थाने, गारद्यांना लावलेली फूस यांनीच कादंबरीची सुरुवात होते. त्यानंतर गादीवर बसण्याचे रघुनाथराव उर्फ राघोबादादांचे मनसुबे नाना फडणवीस आणि रघूनाथरावांकडून कसे उधळले जातात याचे वर्णन आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर राघोबादादांमुळे मराठेशाहीत फूट पडली, मात्र नाना फडवीसांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठेशाही तरली हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने या कादंबरीत केला आहे. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमध्ये नाना फडणवीसांना अर्धे शहाणे समजले जाते. कारण तलवारबाजीत ते वाकबगार नसले तरी त्यांची चतुराई व मुत्सद्देगिरी वाखाण्याजोगी होती. प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही कुटनीतीमुळे अनेक लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. राघोबादादांना रोखण्यासाठीचे त्यांचे राजकीय डावपेच या कादंबरीत उलगडून दाखवले आहेत. खरे म्हणजे नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांची कारकिर्द ५० वर्षांची. मात्र या कादंबरीने माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतरचा म्हणजे १७७२ ते १७८४ या एका तपाचा काळ वर्णिला आहे. रघुनाथरावांना पेशवाईपासून दूर ठेवण्यासाठी केलेले बारभाईचे कारस्थान या कादंबरीत सविस्तरपणे देण्यात आले आहे. या कादंबरीत नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा असला तरी कादंबरीतील बहुतेक भागांत नानांचे कर्तृत्व दाखवण्यात आले आहे, तरीही महादजी शिंदे यांची मुत्सद्दी आणि शौर्य यांचीही माहिती कादंबरीत देण्यात आली आहे. ही कादंबरी नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्यावर आधारित असली तरी पेशवाईच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे स्वभाववर्णन कादंबरीत देण्यात आले आहे. रघूनाथरावांची कपटनीती, साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले सखारामबापू बोकील यांची गोंधळलेली स्थिती, न्यायमूर्ती रामशास्त्री यांचा करारी बाणा, पतीच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांच्या कूटनीतीत समील झालेल्या आनंदीबाई, पेशवाईतील गोंधळाचा फायदा घेण्यासाठी आतुर इंग्रज गव्हर्नर हॉर्नबी या विविध स्वभावांच्या व्यक्तींचा आढावाही या कादंबरीत घेण्यात आला आहे. सखारामबापू बोकील हे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक मानले जातात. मात्र कठीण प्रसंगी त्यांचा झालेला गोंधळ लेखकाने उत्कृष्टरित्या मांडला आहे. सखारामबापूंना आपल्या बाजूने वळवण्यात नानांनी दाखवलेली चाणाक्षनीती लेखकाने मांडली आहे. बापूंच्या मनात इंग्रजांविषयी चीड निर्माण व्हावी यासाठी नाना त्यांना सांगतात, ‘‘पुण्यश्लोक अहिल्याबाईनी म्हटल्याप्रमाणे इंग्रज हा अस्वलासारखा महाभंयकर शत्रू आहे. एकवेळ वाघ परवडला कारण तो मर्दाप्रमाणे लढून मारेल! म्हणून आपण सर्वांनी मिळून टोपीकर इंग्रजांना नेस्तनाबूत केलं पाहिजे.’’ त्याशिवाय कोणाचीही भीड न बाळगणार्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांच्या निष्पक्ष न्यायदानावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. हे चरित्र नसून कादंबरी असल्याने काल्पनिक प्रसंगांचा वापर केल्याची कबुली लेखकाने प्रस्तावनेतच दिली आहे. मात्र काही प्रसंग इतिहासाशी विसंगत असल्याचे जाणवते. ‘नारायणरावांना धरा’ असे आदेश रघूनाथरावांनी केल्यानंतर आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला, असे इतिहास सांगतो. मात्र या कादंबरीत सुमेरसिंग गारद्याने रघुनाथरावांनी दिलेल्या चिठ्ठीत खाडाखोड करून ‘धरावे’च्या ऐवजी ‘मारावे’ केली, अशी नवी माहिती देते. कादंबरीतील काही काल्पनिक प्रसंग इतिहासाशी विसंगत वाटत असले तरी वस्तूस्थितीशी पूर्ण फारकत घेणारेही नाहीत. मराठेशाहीतील या दोन्ही कर्तबगार पुरुषांचे कर्तृत्व कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. इतिहासाशी विसंगत नाही घटना वगळता कादंबरी नाना आणि महादजी या दोन्ही कर्तबगार व्यक्तींना न्याय देणारी आहे. केवळ राष्ट्रहितासाठी वैयक्तिक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी बजावलेल्या संयुक्त कामगिरीला ही कादंबरी उजाळा देते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद