माझे शेल्फ
नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य
प्रेरणादायी व मार्गदर्शक जीवनचरित्र... मूळ तमीळ लेखक एन. चोक्कन यांनी ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हा ग्रंथ लिहिला असून त्याचा गुजराती अनुवाद अदित्य वासू यांनी केला आहे व त्याचा मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. ‘नारायण मर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने देखण्या मुखपृष्ठासह आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या नारायण मूर्तीच्या जीवनाची कथा अलिखित करणारं हे चरित्र! अनंत अडचणीतून मार्ग काढून एखादी व्यक्ती यशाचं शिखर कसं गाठू शकते याची प्रेरणा देणारं व मार्गदर्शन करणारं नारायण मूर्तींचं जीवनचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर सहजसुंदरतेने उलगडून दाखविते. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात २० ऑगस्ट १९४६ रोजी नारायण मूर्तींचा जन्म झाला आणि हेच नारायण मूर्ती सध्या इन्फोसिस टेक्नोलॉजीज लिमिटेड या बेंगलोर स्थित जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. द इकॉनॉमिस्ट ने २००५ मध्ये जगातील सर्वाधिक आदरणीय व्यवसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री नारायण मूर्तींची नोंद केली आहे. इतकंच नाही तर भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून तर ब्रिटिश सरकारकडून सीबीई ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ‘नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य’ हे जीवनचरित्र असल्याने लेखकानं त्याचे बालपण कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, आई-वडील यांच्याकडून त्यांच्यावर होणारे संस्कार यांचा तपशील देत, नारायण मूर्तींच्या मनाची जडण-घडण कशी झाली याचे अतिशय हृद्य शब्दांकन केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणीनुसार नारायण मूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे विशेष त्यांच्या बालपणी प्रकट होत होते. त्यावर प्रकाशझोत लेखकाने टाकला आहे. त्यांना असलेली वाचनाची आवड व सिनेमाविषयीची अरुची तसेच त्यांचा समजुतदार स्वभाव, परिस्थितीची जाण यामागे त्या वयातही त्यांची स्वत:ची अशी वैचारिक भूमिका होती. जी उत्तरोत्तर विकसित होत गेली. खूप पैसे मिळवून चैनीचं आयुष्य जगण्यापेक्षा नीट अभ्यास करून जगाबद्दल ज्ञान मिळविणं जास्त चांगलं, गरीब असण्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. या भूमिकेमुळे ते कायमच स्वाभिमानानं राहायचे. स्वार्थापेक्षा समाजाच्या कल्याणाचा विचार करावा हा विचारही आईवडिलांकडून त्यांच्या मनात रुजला आणि नंतर फोफावला. त्यांची सिम्फनी संगीताची आवड तर इतकी प्रेरक, प्रेरणादायी ठरली की सिम्फनी संगीताबद्दल समजून घेताना विचारांची वीज त्यांच्या मनात चमकली की स्वत: हुशार असून नुसतं चालत नाही तर इतरांबरोबर समन्वय करून एकजुटीनं चांगलं काम करणं जास्त महत्त्वाचं. हाच विचाराचा प्रकाश त्यांना उत्तम व्यवस्थापक बनविण्यास कारणीभूत झाला. आयुष्यातल्या अडचणींवर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे चांगले शिक्षण! हा दृष्टिकोन उरात ठेवून वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या शैक्षणिक उंचीचा आलेख लेखकाने या ग्रंथात रेखाटला आहे, तसेच अपेक्षित शिक्षणात उंची गाठण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे चित्रणही केले आहे. परिस्थितीवर काबू मिळवून मला सफल झालंच पाहिजे. या दृढनिश्चयाने त्यांनी आय.आय.टी. कानपूरला एम.टेक साठी प्रवेश कसा मिळवला. आय बी एममध्ये बनवला गेलेला कंम्प्युटर बघून ते कसे अवाक झाले. आय आय एममध्ये पगार कमी असूनही ते रुजू का झाले, पाठ्यपुस्तकांतील शिक्षण व जीवनानुभव यांची सांगड घालणे कशासाठी महत्त्वाचे आहे. इ. गोष्टींवर प्रकाश टाकीत लेखकाने त्यांच्या विस्तारलेल्या ज्ञानक्षितिजांचे दर्शन घडवले आहे. नारायण मूर्तींचे व्यावसायिक अनुभव व त्याआधारे त्यांनी जीवनात महत्त्वाचे घेतलेले निर्णय यांचे चित्रण करताना लेखकाने त्यांच्या सामाजिक भानाचे, जीवनमूल्यांवरील निष्ठेचे, पैसा मिळविण्यामागील कारण व त्यांच्या उपयोगाची योग्य दिशा याविषयीचे विचार उलगडून दाखविले आहेत.त्यांच्या मते, एक सुसंस्कृत समाज ज्याला म्हणता येईल, ज्या समाजात प्रत्येक पिढीतील व्यक्ती, येणाऱ्या पिढीचं भविष्य जास्त चांगलं, आनंदाचं व्हावं म्हणून व्यक्तिगतरित्या स्वार्थत्याग करीत राहील. नोकरी सोडून स्वतंत्र कंपनी काढण्याचा त्यांचा निर्णय, सुधा मूर्तींची त्या संदर्भात झालेली मदत, कंम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांच्या विकासाच्या दृष्टीनं असलेली सरकारची उदासीनता, परदेशात हा व्यवसाय वृद्धिंगत करण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, कायदे, कंपनीच्या विकासातील अडथळे व या सर्वांवर मात करत ठामपणे उभे राहणारे व निष्ठा, प्रेम व दूरदृष्टी यांचा साक्षात्कार घडवून सीईओची आपली इमेज बाजूला करत नेता ही इमेज सहकाऱ्याच्या मनात निर्माण करत नारायण मूर्ती कसे यशस्वी झाले याचे अत्यंत मार्मिक, रोचक, प्रासादक व प्रवाही
‘आत्मचरित्र हा एका व्यक्तीने स्वत:च, स्वजीवनाचा नेटकेपणाने काढलेला चैतन्यपूर्ण व कलात्मक आलेख असतो’ या वस्तुस्थितीद्वारे आत्मचरित्र समीक्षेची सूत्रे निश्चित करता येतील असे मत मांडून अखेर आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार आहे, असा समारोप डॉ. यादवांनी केला आहे. प्रत्यक्ष जीवन जगलेला ‘मी’ आणि आत्मचरित्र लिहिणारा ‘मी’ यांच्यातील सखोल ताणाचा अपरिहार्य परिणाम अभिव्यक्तीवरही होणारच! आत्मचरित्रांसंबंधी स्वतंत्र असे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘चरित्र आणि आत्मचरित्र’ या श्री. सदा कऱ्हाडे यांच्या ग्रंथात आत्मचरित्रावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे; परंतु त्यातल्या पहिल्याच वाक्याशी डॉ. यादव सहमत नाहीत. ते वाक्य असे, ‘आत्मचरित्र हा चरित्राचाच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्रातील सत्यासत्यता हा फारच गुंतागुंतीचा प्रश्न वाटतो. स्वाभाविक विस्मरण,औचित्यासाठी केलेला सत्यापलाप, आठवणींची कल्पनाशक्तीने केलेली भरपाई, इत्यादींमुळे आत्मचरित्रातील सत्य धूसर बनत जाते. चरित्रातील सत्याप्रमाणे ते पडताळून पाहता येत नाही, हे खरेच आहे; परंतु आत्मचरित्राच्या वाचकांनी लेखकावर पूर्ण विश्वास टाकावा, की इतर मार्गांनी त्याच्या लेखनातील खरेखोटेपण शोधून काढावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळेच ‘प्रांजळपणा’ हे मूल्य कसे सिद्ध करता येईल, ते कळत नाही. ‘एका पानाची कहाणी’च्या प्रस्तावनेत आत्मकथा हा लेखनाचा सर्वांत अवघड प्रकार आहे, असे मान्य करून वि. स. खांडेकर म्हणतात की, ‘पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं,’ आणि म्हणून त्यांनी आत्मकथा लिहिली. तर आत्मचरित्र हा एक लपवाछपवीचा खेळ आहे, असे जयवंत दळवींचे मत असल्याने ते आत्मचरित्राऐवजी लेख लिहितात! घटनांच्या निवडीइतकेच त्यांचे शब्दांकनही कठीण असते. कारण लेखनसरावाचा आत्मचरित्राला उपयोग होऊ शकत नाही. हे म्हणजे, ‘पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जोखीम’ आहे, अशा योग्य शब्दात डॉ. यादव त्याचे वर्णन करतात. ज्या आत्मचरित्रांमध्ये स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अतिशयोक्ती दिसते ती ‘आत्मपूजेची खाजगी देवळे वाटतात’ हे विवेचनही अतिशय नेटके वाटते. तर ‘मनातली मळमळ व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्रे लिहिणे म्हणजे ढेकूण, डास मारण्यासाठी तोफा डागण्याचा प्रकार असतो’ या विधानात त्यांना आत्मसमर्थनाची वाटणारी चीड व्यक्त होते. ‘विशेषत: स्त्रियांची आत्मचरित्रे संकुचित भावनेने प्रेरित होऊन पूर्व घटनांच्या केवळ स्मरणावर लिहिली जात असावीत.’ हे डॉ. यादव यांचे मत सहजी मान्य होईलसे वाटत नाही. नवजागृत समाजातल्या तरुण पिढीची आत्मचरित्रे आयुष्यात फार लवकर लिहिलेली म्हणून अर्धीकच्ची राहतात, असे डॉ. यादव म्हणतात; तर चंद्रकुमार नलगे व डॉ. गंगाधर पानतावणे यांना असे वाटते की, त्या आविष्काराला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथन म्हणावे. आत्मचरित्र आयुष्याच्या मावळतीला लिहिली जातात. प्रौढत्वामुळे ती स्थिर व संयमी असू शकतील; परंतु आत्मकथने आयुष्याच्या ऐन उमेदीत लिहिलेली असतात. त्यात तारुण्याच्या तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यात प्रवाह असतो. आत्मकथने बहुतांशी नाकारलेल्या समाजघटकांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. त्यात आत्मपरीक्षण आढळते, इतिहासलेखन नव्हे. सैद्धान्तिकदृष्ट्या प्रत्येकच जण आत्मचरित्राचा विषय आहे; परंतु प्रत्यक्ष आत्मचरित्र लेखन हा साहित्यप्रकार किती कसोट्यांमधून उतरावा लागतो हे ‘आत्मचरित्रमीमांसा’ वाचल्यावर लक्षात ये, म्हणूनच तो ‘जीवघेणा’ आहे, या डॉ. आनंद यादव यांच्या मताशी आपण सहमत होतो!