नेताजी पालकर
गेल्या पाचशे वर्षांत उत्तर हिंदुस्थानात जे घडू शकले नाही ; ते दक्षिण हिंदुस्थानात घडवून दाखवावे आणि सदाचाराच्या , संस्कृतीच्या ह्या रानटी वैऱ्यांना त्यांच्या उन्मत्त सिंहासनावरून तंगडी धरून खाली खेचावे अशी प्रचंड महत्त्वाकांक्षा शिवाजी महाराजांनी अन् त्यांच्या सवंगड्यांनी आपल्या सिंह - हृदयात धरली होती . पुरुष प्रयत्नांची पराकाष्ठा मांडली होती . हजारो अडचणींच्या व संकटांच्या अग्नीप्रलयातही उसळत्या ज्वालेवर स्वार होऊन शिवाजी महाराज व त्यांचे सवंगडी छातीवर मूठ आपटीत बजावीत होते , ‘ पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच आम्ही जन्माला आलेलो आहोत . आमच्या मायभूमीचे संरक्षण करणे आमचे आद्यकर्तव्य आहे . अन् ते बजावण्यास आम्ही कधीही कसूर करणार नाही !!! आता नव्या मराठी रणनीतीचे सूत्र ‘ आक्रमण ’ असेच राहील ! केवळ संरक्षण म्हणून नव्हे !’ म्हणूनच तर भारताच्या श्रेष्ठ पुरुषांमधे शिवाजी महाराजांची गणना होते . शिवाजी महाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते . ते मुत्सद्दी सेनानायक होते . त्यांनी आपल्या समाजापुढे हे एकच ध्येय ठेवले होते . अन् ह्या ध्येयासाठी लढणे आणि प्राणत्याग करणे कसे श्रेयस्कर व आवश्यक आहे ते त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पटवून स्वराज्याची स्थापना केली . एका थोर इतिहास - संशोधकाने आपल्या ऐतिहासिक लेखात म्हटले आहे की , “ साऱ्या जगातील अहिंदू शक्तींशी व शत्रूंशी त्या काळी एकटा हिंदू महाराष्ट्रच झुंजला ! शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अन् त्यांच्या चरित्रातील संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे .” छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवाभावाचे सवंगडी त्यांच्या धैर्य , शौर्य व आत्मसमर्पणाने मराठी माणसाला माहीत झालेले आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा करून अनेक लढवय्ये धारातीर्थी पतन पावले . महाराष्ट्राच्या परदास्य विमोचनाची महान कामगिरी ह्या सवंगड्यांनी घरदार , शेतीवाडी इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणार्पणाने केली . देहाचा बळी दिला , स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला . हिंदवी स्वराज्याचा इतिहास असा बलिदानाने घडला आहे . देवासाठी , धर्मासाठी , स्वराज्यासाठी आणि राजासाठी स्वतःच्या प्राणांचा नैवेद्य अर्पिला . महाराजांच्या अनेक साथीदारांनी स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याच्या मशाली पेटविण्याचे ( जणू सतीचे ) वाण घेतले होते . त्या काळातील अशा वीराग्रणींची नामावली फारच मोठी आहे . पण असे अगणित पुरुषसिंह ह्या महाराष्ट्राच्या गडागडावर , दऱ्याखोऱ्यात , घाटीखिंडीत लढता लढता मरण पावले आहेत . त्यांची नावे - गावेच काय पण त्यांची एकूण संख्यादेखील इतिहासाला ठाऊक नाही . परंतु इतके मात्र निश्चितच की त्यांच्या ह्या बलिदानामुळेच स्वराज्य मिळाले अन् स्वराज्य वाढले ! असे वीर शिवरायांचे शिलेदार नेताजी पालकर यांची गाथा