माझे शेल्फ
निःशब्दाचे मौन
वेदनेचे विभिन्न पोत... दीप्ती जोशी यांच्या या संग्रहातील काही कथा संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या दर्जेदार कथांना मासिकांच्या व संकेतस्थळांच्या कथा स्पर्धांमधून अव्वल स्थान मिळाले आहे. ‘निःशब्दाचे मौन’ हा कथासंग्रह १४ आशयसंपन्नव वैविध्यपूर्ण कथावस्तू लेवून आपल्या भावविश्वामध्ये अलगद प्रवेश करतो. शिक्षा ही कथा आयुष्यभर कठोर परीक्षा दिल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखांवर लाथ मारत नवऱ्याला ‘शिक्षा’ देणाऱ्या अनुराधाच्या स्वाभिमानाची कहाणी सांगते. ‘व्यथा त्या दोघींची’ ही भिन्न जीवनशैली असणाऱ्या एक माणसांच्या गोतावळ्यात व जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली तर दुसरी वेळ कसा घालवावा व गुजगोष्टी कोणाशी कराव्यात ही व्यथा कुरवळणारी अशी दोन बहिणींचे चित्र रेखाटणारी. खरेदीमध्ये सासरी जबाबदारीने वागणाऱ्या आणि माहेरी येऊन आईकडून लाड पुरवून घेणाऱ्या, एकाच वेळी अल्लड व जबाबदार दोन्ही असणाऱ्या सायलीचा प्रसन्न संचार डोंबिवलीच्या जुन्या दुकानांमधून होताना डोंबिवलीच्या लोकांनाही तिथून सहज फिरवून आणते. आठवणींची मोरपिसं अरुंधतीच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडवितानाच सहजच तत्त्वज्ञानाच्या दोन ओळी देऊन जातात. ‘तेरे फुलों से भी प्यारी’ मधली श्रेयाच्या नशिबाचा फेरा डोळ्यात टचकन पाणी आणतो. मात्र तिचे मनोव्यापार बरेच काही शिकवून जातात. ‘उदध्वस्त’मधल्या देवदत्ताच्या वेदनेचा आणि ‘निःशब्दाचे मौन’मधल्या समीरच्या वेदनेचा पोत भिन्न आहे. परंतु त्यातून जन्म घेणारी कल्याणकारी वृत्ती मात्र जिथे मनोमन हात जुळावे अशीच आहे. लेखिकेच्या भावविश्वाचे धागे सांस्कृतिक शहर डोंबिवलीशी घट्ट विणलेले आहेत. अनेक कथांमधून तसा उल्लेख आहे. श्यामची आजी मधल्या आजीची व्यक्तिरेखा देवळाच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत राहणाऱ्या मंद ज्योतीशी नातं सांगते. विश्चामित्राची धडपड आणि त्या संकल्पाचा व्यवस्थित अन्वय जाणल्यावर दोन मनांचं जोडलं जाणं मनाला भावून जातं. कधी अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या, कधी जीवानाचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगणाऱ्या, मौनाचे गूढ उकलणाऱ्या, गबाळेपणातल्या सौंदर्याची जाण ठेवणाऱ्या आणि नजरेचे भान जपणाऱ्या या कथा सौम्य व रंजक आहेत.