माझे शेल्फ
नो नॉट नेव्हर
नो नॉट नेव्हर...सत्तरीच्या लेखकाचा साहित्यिक चमत्कार! ही बाबाराव मुसळे यांची बहुचर्चित कादंबरी वाचली. चार दिवस या कादंबरीने पिच्छा सोडला नव्हता. पुण्यातलं एक इंजिनिअरिंग कॉलेज. विदर्भातल्या वाशीम जिल्ह्यातल्या ब्रम्हा या खेडेगावातल्या राणी, आणिमंकी ( मृणाल ) या दोन विद्यार्थिनी. दोघींचे स्वभाव अतिभिन्न, अगदी टोकाचे म्हणावे असे. जणू दोन समांतर रुळ एकमेकांसोबत धावणारे पण कधीही जवळ न येणारे असे. या महाविद्यालयात प्रवेश करतानाचा विद्यार्थ्याचा सुरुवातीचा सैरभैरपणा, कॉलेज विश्व, स्टाफ, कर्मचारी, प्रिन्सिपॉल, संस्थाचालक, लायब्ररी, कॅन्टीन, व्यवस्थापनाची कडक शिस्त, जर्नल्स, प्रॅक्टिकल्सची रुक्ष बाजू... सगळं काही लेखकाने कष्ट घेवून, मेहनत करुन अभ्यासपूर्ण शैलीने समजून घेवून तंतोतंत मांडलंय, त्यामुळे ते सगळं काही जसंच्या तसं वाचकांच्या अनुभवास येतं. कादंबरीचा प्रवास जसा सुरू होतो तसा आपलाही या महाविद्यालयात प्रवेश होतो. नंतर जे जे घडत जातं त्याला आपण साक्षीदार उरतो. राणी, मंकी, भट्टी, मंदार, संजना, जाधव सर, देशपांडे सर... कादंबरीतलं एक एक पात्र हळूहळू आपल्या ओळखीचं होत जातं. कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी लेखक आपल्याला त्या विश्वात फिरवत राहतो. मुळात सत्तर वर्षे वयाच्या लेखकाने तिसऱ्या पिढीतल्या तरुणाईच्या मानसिकतेत शिरून, तरुणाईची भाषा जाणून घेवून, इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्यांचं अॅडव्हान्स्ड कॉलेज लाईफ कादंबरीत हुबेहुब चितारणं हा एक साहित्यिक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार लेखक बाबाराव मुसळे यांनी करुन दाखवलाय. लेखकाला परकाया प्रवेश करता यायला हवा असं म्हणतात. पात्रांच्या मनात शिरुन त्यांच्यासारखं, लेखकाला लिहताना मानसिक पातळीवर जगावं लागतं, तरच ती पात्रं जिवंत होतात, जिवंतपणे कादंबरीमध्ये वावरू लागतात. इथं बाबाराव मुसळे तरुण पिढीच्या मनात शिरुन त्यांचं जगणं भोगणं समर्थपणे जाणतात.