माझे शेल्फ
नोबेल ललना
ग्रंथ संपदा भरपूर असलेल्या वाचनालयात एखादे जुने पुस्तक अचानक हाती पडते मात्र ते वाचनात आल्यावर काहीतरी वेगळे व सकस वाचल्याचा आनंद प्राप्त होतो.किस्त्रीम मासिकाच्या उपसंपादिका,लेखिका,कवयित्रीं,गणित,विज्ञान विषयतज्ञ श्रीमती मीरा सिरसमकर यांनी लिहिलेले व नोव्हेम्बर 2008 साली प्रकाशित झालेले " नोबेल ललना " हे अद्वितीय पुस्तक मला असाच वाचनानंद देउन गेले. जगदमान्य अशी ओळख असलेला अग्रमानांकित,सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने प्राप्त झालेल्या जगातील 36 मान्यवर स्रियांवरील " नोबेल ललना" लेखिका मीरा सिरसमकर अतिशय परिश्रमपूर्वक लिहिला.सुरुवातीला 2006 पासून 2008 पर्यंत लेखिकेने स्त्री मासिकात लेखमाला या स्वरूपात काही नोबेल विजेत्या स्रियांची माहिती प्रसिद्ध केली.परंतु मेरी पीएर क्यूरी, त्यांची कन्या आयरिन क्यूरी,पर्ल बक,मदर तेरेसा या ज्ञात अशा मोजक्या नोबेल पारितोषिक विजेत्या व्यतिरिक्त उर्वरित सर्वच नोबेल विजेत्या स्रियांचे कार्यकर्तुत्व मराठी जनतेला ज्ञात व्हावे म्हणून लेखिकेने हे पुस्तक लिहिण्याचे ठरविले.त्यात अनेकांचे प्रोत्साहन,सहकार्य लाभले.लेखन करताना पाश्चिमात्य संदर्भ ग्रंथ वापरावे लागले.अहोरात्र वाचन,लेखन करत असताना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्यात लेखिका व्यस्त होती.पाश्चिमात्य देशातील 1950 पूर्वीच्या सामाजिक,राजकीय संदर्भाचा अभ्यासमय उल्लेख या पुस्तकात आहे.त्या कालखंडात विविध क्षेत्रात अफाट कार्यकर्तुत्व केलेल्या या कर्तबगार महिलांच्या ज्ञानमय माहितीपट पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला झोकून देऊन,प्रतिकुलतेवर मात,करून,अविरत मेहनत घेउन आपले स्वप्न साकारणाऱ्या,ध्येय साध्य करणाऱ्या व त्यातून जगाचे कल्याण साधणाऱ्या या जिद्दी, बुद्धिवादी वीरांगनाचे कार्य इतके अमोल आहे की अनेकांना त्यापासून कृतीशीलतेची प्रेरणा,स्फूर्ती मिळावी. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 1833 साली दजन्मलेले जगदविख्यात रसायनशास्त्रज्ञ सर आल्फ्रेड नोबेल यांनी वैज्ञानिक संशोधनातून जी संपत्ती कमावली तिचा विनियोग नोबेल पारितोषिकात करण्याचे ठरविले.जगातील जात,धर्म,देश विरहित जे शास्रज्ञ,संशोधक,विचारवंत,साहित्यिक,शांतिदुत हे समस्त मानव जातीच्या विकास व कल्याणस्तव आपल्या क्षेत्रात भरीव कार्य करतील,त्यायोगे मानव जातीचा उद्धार होईल व वैश्विक बंधुभाव,सामंजस्य,शांतता प्रस्थापित होईल त्यांना दरवर्षी 10 डिसेंबर आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.रसायनशास्त्र,भौतिक शास्त्र,वैद्यकीय, शरीर शास्त्र,साहित्य,शांतता,व अर्थशास्त्र या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्यांना नोबेल पुरस्कार दिला जातो.2008 पर्यंत जगातील ज्या 36 महिलांना हा नोबेल पुरस्कार प्रदान झाला आहे त्यांची ओळख व त्यांनी केलेले कार्य त्याचा समावेश या पुस्तकात झाला आहे.