माझे शेल्फ
पावनखिंड
छत्रपती शिवाजी महाराज, भारतमातेच्या पोटी जन्म घेतलेला महान योध्दा,पराक्रमी तितकाच कनवाळू राजा. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघलांच्या अन्यायी तावडीत सापडलेल्या अखंड महाराष्ट्राला स्वातंत्र्याच सोनेरी स्वप्न दाखविणारा हा महापराक्रमी महापुरुष. गुलामगिरीची सवय झालेल्या किवा स्वत:च स्वत्व विसरलेल्या लढाऊ, जिगरबाज अशा मावळ्यांची मोट बांधून महाराजांनी त्यांना स्वत्वाची ओळख करून दिली, मातीचं ईमान शिकवलं, त्यांंच्या लढाऊ वृत्तीला स्वातंत्र्याचं कोंदण दिलं, अशा परीचीत- अपरीचीरी मावळ्यांना संगतीने घेऊन महाराजांनी स्वराज्य तोरण उभं केलं. खरतर हा स्वराज्याचा महायज्ञ धगधगता ठेवताना महाराजांना अनेक कठीण प्रसंगाना तोंड द्यावे लागले त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजेच "पन्हाळ्याला वेढा" पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड ! सिद्दी जौहरने पन्हाळयाला करकचून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले. सिद्दीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि वेढा ढिला पडला आणि महाराजांनी आखलेल्या रणनीतीनुसार महाराज खेळणा किल्यावर जाण्यासाठी पलायन करतात, महाराजांच्या पलायनाची वार्ता कळताच सिद्धी महाराजांच्या मागावर लागतो, त्याला थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू स्वत:च्या अवघ्या तीनशे मावळ्यांनीशी खांद्यावर घेतात आणि महाराज गडावर सुखरुप पोहचले अशी तोफेची खुण जोपर्यंत ऐकु येत नाही तोपर्यंत प्राणपणाने घोडखिंड लढवण्याची शिकस्त करतात आणि आपला प्राण स्वराज्यासाठी अर्पण करतात. त्या प्रसंगाच वर्णन करणारी ही रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. खरंतर ही कादंबरी निव्वळ त्या प्रसंगाच वर्णन करणारी नाही, ती आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची महती सांगणारी, त्यांचा पुर्व इतिहास सांगणारी कादंबरी. बाजी प्रभू हे मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. वतनदारी संपवुन एकसंघ स्वराज्याची स्थापना करण्याच्या दृष्टीने वतनदारी नष्ट करणे गरजेचे होते. अशातच महाराजांनी मावळवर चढाई करुन मावळ स्वराज्याला तर जोडलाच परंतु बाजींचे शौर्य, पराक्रम पाहून त्यांना स्वराज्यात आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. श्रीमान योगी सारखी अजरामर कलाकृती रेखाटणाऱ्या रणजित देसाई यांनी आपलं सगळं कसब वापरून पावनखिंडीतील थरारचं रेखाटन केलं आहे. आणि इथेही त्यांच्या शब्दांची जादू आपल्या मनावर गारूड कायम राखते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची गुणग्राहकता, जिज्ञासू वृत्ती, मधाळ वाणी, कार्यतत्परता इ.गुणांची ओळख जागोजागी आपल्याला करुन होतं राहतेच परंतु महाराजांच्या सहकाऱ्यांच, बहीर्जी नाईक,नेताजी पालकर, शिवा काशिद, इ व्यक्तिरेखांनाही योग्य न्याय देण्यात आला खहे. घोडखिंडीतील थराराचं वर्णन अंगावर काटा उभा करणारा आहे. खरतर रणजित देसाई यांचा हा हातखंडा आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या भीमपराक्रमाच वर्णन करणारी कादंबरी संग्रही असावीच.
काही कथाबीजे कादंबरीच्या आवाक्याची असल्यामुळे लहान आकारात गुदमरतात. कथानकाच्या सांकेतिक पकडीतून सुटण्याच्या प्रयत्नात एखादी कथा नीट उभीच राहू शकत नाही. जसे ‘कलश’ ही कथा. तरीही दि. बा. मोकाशी यांच्या कथेला अर्पण केलेला हा संग्रह मोकाशी यांच्या कथेच्या आंतरिक सत्त्वाशी आणि देशीय संवेदनेशी सहज नाते सांगून जातो.