माझे शेल्फ
पिझ्झा टायगर
डॉ. सुधीर राशिंगकर यांनी डॉमिनोज पिझ्झा या आंतरराष्ट्रीय पिझ्झा साखळी स्टोअर्सचा संस्थापक टॉम मोनाघन यांचे पिझ्झा टायगर हे आत्मचरित्र अनुवादित करून एका अमेरिकन उद्योजकाच्या धडपडीची आणि त्यातून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजकाच्या धडपडीची आणि ्यातून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगाची प्रेरणादायी चरित्रकहाणी मराठीत उपलब्ध करून दिली आहे. टॉमचा जन्म २५ मार्च १९३७ रोजी अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील एका छोट्या गावात झाला. त्याच्या वयाच्या ४थ्या वर्षी त्याचे वडील वारले आणि टॉम आणि त्याचा धाकटा भाऊ जिम यांचे हाल चालू झाले. आईने गरीबीमुळे पैसे वाचवायचे म्हणून. दोघांना अगदी लहानपणी ६ वर्षे अनाथाश्रमात राहण्यासाठी पाठवले. तिथून परत आल्यावर घरी आईशी त्याची कडाक्याची भांडणे व्हायची म्हणून तिने टॉमला २-३ कुटुंबात आश्रित म्हणून रहायला पाठवले. तिथेच त्याचे शालेय शिक्षण झाले. नंतर तो कॉलेजच्या फीचे पैसे जमवण्यासाठी वृत्तपत्रे विकण्याचे आणि अन्य हलकी कामे करून लागला. पुढे तो सैन्यदलात मरीन म्हणून भरती झाला. त्याला जपान आणि फिलिपाइन्समध्ये पाठवण्यात आले. परतल्यावर त्याचे तिथे साठवलेले २००० डॉलर्स एका लबाड माणसाने ते लखाणीच्या व्यवसायात गुंतवण्यासाठी त्याला गळ घालून हडप केले. तो कंगल झाला. मग एका वृत्तपत्राच्या कचेरीत काम करून आणि नंतर स्वत:चे वृत्तपत्राचे दुकान काढून पैसे कमवू लागला. त्याच्या भावाने एक पिझ्झाचे दुकान विकाऊ होते ते भागीदारीत चालवण्यासाठी घेण्याचा प्रस्ताव त्याच्यापुढे मांडला आणि दोघांनी पैसे जमवून ते दुकान चालवायला विकत घेतले. काही महिन्याने भाऊ त्यातून बाहेर पडला. मग टॉमने पिझ्झा विक्री हे आपले जीवनध्येय ठरवून पिझ्झा साखळी दुकानांचे स्टोअर्स उघडणे १९६० साली चालू केले. त्यात जम बसल्यावर त्याचा विस्तार केला. ३० मिनिटात घरपोच पिझ्झा हे उद्दीष्ट ठेवून पुढील ३० वर्षात हजारो पिझ्झा स्टोअर्स त्याने देशभर आणि परदेशी उघडले. भारतातही ते आहेत. या कामात अनंत अडचणी होत्या. एका प्रसंगी तर कर्जाच्या ओझ्याखाली दिवाळे काढण्यापर्यंत वेळ आली होती, एकदा त्याचे संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, काही स्टोअर्सधारकांनी फसवले तर डॉमिनोज पिझ्झा या नावाच्या साधम्र्यामुळे डॉमिनोज शुगर नावाच्या मोठ्या कंपनीने कॉपीराईट कायद्याअंतर्गत खटला भरला. ५ वर्षांनी तो टॉमने जिंकला. पुढच्या काळात डॉमिनोज पिझ्झा इंटरनॅशनल ही कंपनी स्थापन करून डॉमिनोज पिझ्झा सर्वदूर लोकप्रिय केला. उत्तम ग्राहक सेवा, वाजवी दर आणि दर्जाची हमी या तत्त्वावर भर देऊन जगभर नेले. त्याचा प्रेमविवाह मार्गी या तरुणीशी झाला आणि तिच्यासाठी त्याने सिगारेट आणि मध्यपान कायमचे सोडले. तिने त्याला उद्योगात साथ दिली. टॉमने अनेक नवे उद्योजक स्टोअर्स चालवण्यासाठी विकसित केले. आपल्या गोदामांची घडी बसवली. त्यासाठी प्रशिक्षण संस्था काढली. पुढे कंपनी सार्वजनिक करून तो कोट्याधीश झाला, त्याने बेसबॉलचा टायगर हा प्रसिद्ध संघ आपल्या मालकीचा केला. कंपनीचे भव्य कार्यालय अन् आर्बर येथे बांधले. त्याला अनेक सन्मानही मिळाले... तो अलिशान पद्धतीने राहत होता. पण एका व्हॅटिकनच्या भेटीत त्याला उपरती झाली आणि त्याने समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घ्यायचे जीवनोद्दिष्ट ठरवले, आपला व्यवसाय त्याने १९९८ साली १०० कोटी डॉलर्सला विकला आणि आलेले पैसे या कामासाठी वापरले. त्यातून दक्षिण अमेरिकेत त्याने आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात भरपूर काम केले. प्रत्येकाने आपल्या जीवनाची आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक प्राधान्ये जीवनात ठरवायला हवीत असे ती म्हणतो. त्याने स्वत: ती पाळली. या संपूर्ण जीवनप्रवासाच्या दरम्यान त्याला आलेले अनेक अनुभव, उपलब्धी आणि अपयश याचे अनेक प्रसंग त्याने विस्ताराने आत्मचरित्रात मांडले आहेत. नवउद्योजकांना उपयुक्त अशा टिपणीही दिल्या आहेत. त्यातून यशस्वी उद्योगपतीलाही किती अडचणीतून मार्ग काढून यश संपादन करावे लागते याचे समग्र दर्शन या आत्मचरित्रात घडते. डॉ सुधीर राशिंगकर यांनी साध्या, सोप्या भाषेत अनुवाद केल्याने मूळ पुस्तकातील आशय चांगला राहिला आहे.