माझे शेल्फ
प्लँचेट
गूढकथा म्हटले की, मराठीत हटकून रत्नाकर मतकरी नारायण धारप यांची नावे आठवतात. कोणी काही म्हटलं तरी मराठी गूढकथांवर मतकरींचा ठसा आहेच. मराठी गूढकथांना ज्या ‘नवल’ मासिकाने प्रतिष्ठा मिळवून दिली त्याच ‘नवल’ मासिकात सातत्याने लेखन करून पुढे आलल्या स्नेहल जोशी यांचा ‘प्लँचेट’ हा नवा गूढकथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गूढकथा पुरुष लेखकानेच लिहावी हा तथाकथित समजही स्नेहल जोशी यांनी आपल्या सकस कथांनी चक्क मोडीत काढला आहे. एक स्त्री न भिता मानवी मनाला भोवळ आणणारे, तर्क न ओलांडणारे, गूढ व विलक्षण लिहू शकते याचा प्रत्यय ‘प्लँचेट’मध्ये वारंवार येतो. स्नेहल जोशी यांनी यापूर्वी ‘कॉलगर्ल’ आणि ‘अधांतर’ या कादंबऱ्या व विपुल कथालेखन केलं. पण नंतर त्या प्रामुख्याने गूढकथांमध्ये रमल्या. ‘प्लँचेट’मध्ये एकूण १४ गूढकथा आहेत. त्यापैकी भृगुसंहितेचा बळी, काव.. काव.., सुश्रुत-बी १४, निरोप, मिस्टर राईट, सफर अशा कथात मानवी जीवनातल्या अतक्र्य घटना तर्क कोठेही विस्कटू न देता मनाची पकड घेतात आणि आपण त्या सलग वाचतच जातो. गूढकथांची खरी शक्ती वातावरण निर्मितीची असते व ती इथे पुरेपूर आढळून येते. भीती हा तर माणसाचा स्थायीभाव. चंचल स्वभाव, मनातले द्वंद्व, अद्भुत भास याला जर विचित्र घटनांची मालिका चिकटली, तर माणूस त्यात गरगरत राहतो. हाच अनुभव यातील प्लँचेट, ओझं, निरोप, झपाटलेली, इजा बिजा तिजा, जेथे राघव तेथे सीता अशा कथा देतात. उत्सुकता आणि धक्कादायक शेवट हीही गूढकथांची वैशिष्ट्ये. ती तर स्नेहल जोशी यांची बलस्थाने ठरवीत अशा पद्धतीने एकेक कथा अनुभवांना धक्के देत विलक्षण वेगाने वेगळ्या वाटेने जाते. जन्म आणि मृत्यू याचे कोणत्याही माणसाला विलक्षण आकर्षण वाटते. एकदा गूढाचे वा भविष्याचे वेड लागले की, मनोव्यापार कसा बदलत जातो याचे अर्थपूर्ण प्रत्यंतर ‘भृगुसंहितेचा बळी’ कथेत येते. गूढकथालेखिका म्हणून स्नेहल जोशी यांची वाटचाल पक्की होण्यास ‘प्लँचेट’ संग्रह मदतरूप होईल यात वाद नसावा.