मुखपृष्ठ
परमवीर चक्र

माझे शेल्फ

परमवीर चक्र

इंग्रजी शीर्षक
Paramveer Chakra
सारांश

परमवीर चक्र हे आपल्या देशातलं सर्वोच्च लष्करी सन्मानचिन्ह आहे. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य, पराक्रम गाजवणाऱ्या रणमर्दाला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येतं. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्याझाल्या पाकिस्तानी सैन्याने पठाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण केलं होतं. त्या युद्धापासून १९९९ सालच्या कारगिल युद्धापर्यंतच्या विविध समरप्रसंगात पराक्रम गाजवणाऱ्या एकूण २१ योद्ध्यांना आजवर परमवीर चक्राने सन्मानीत करण्यात आलेलं आहे. कोण आहेत हे २१ परमवीर? त्यांचीच नावं आणि त्यांच्या पराक्रमकथा प्रस्तुत ‘परमवीर चक्र’ या पुस्तकात तपशीलवार देण्यात आल्या आहेत. या कथा सांगणारा लेखक हा स्वत:देखील एक बहाद्दर सैनिक आहे. लेखक मजर जनरल (निवृत्त) इयान कारडोझो हे हिंदुस्थानी सैन्यात ‘५ गुरखा रायफल्स’ या पलटणीत सेवा बजावत असताना, एका लढाईत त्यांचा पाय शत्रूने पेरलेल्या सुरुंगावर पडला. ते जबर जखमी झाले. त्याही स्थितीत या बहाद्दराने स्वत:च्या कमरेची कुकरी काढली आणि आपला चिंधड्या उडालेला पाय सरळ स्वत:च कापून टाकला. अपंग बनल्यावरही त्यांना उच्च सेनाधिकाऱ्यांची सेवेतून काढून न टाकता, त्यांच्या शौर्याची कदर करून त्यांची सेवा पुढे चालू ठेवली, असे ते पहिले सेनाधिकारी होत.१९९३ साली हिंदुस्थानी सैन्यदलाच्या पूर्वेकडील कोअरचे चीफ ऑफ स्टाफ अशा उच्च पदावरून ते निवृत्त झाले. शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गायिला, की तो श्रोत्यांच्या काळजाला अधिकच भिडतो. त्याचप्रमाणे मेजर जनरल कारडोझोनी लिहिलेली परमवीर चक्राच्या मानकऱ्यांची ही पराक्रमगाथा मोठी वेधक, प्रेरक उतरली आहे. युद्धात पराक्रम गाजवणाऱ्यांना सन्मानीत करून त्यांचा व सर्वच सैनिकांचा उत्साह वाढवण्याची प्रथा, परंपरा फार प्राचीन काळापासून जगभर सर्व देशांमध्ये आहे. आपल्याकडेही ती होतीच. महाराजा शिवछत्रपती आपल्या बहाद्दर सैनिकांच्या हातात सोन्याचे तोडे घालीत. त्यांना सर्जेराव, हंबीरराव, प्रतापराव, विश्वासराव असे मानाचे किताब देत. पालखी, हत्ती, नौबत, निशाण अशी मानचिन्हे देऊन गौरवीत. इंग्रजी अमदानीत हिंदुस्थानी सैनिकांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, व्हिक्टोरिया क्रॉस इत्यादी मानचिन्हे दिली जात. स्वतंत्र हिंदुस्थानात व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च लष्करी सन्मानाला समकक्ष असं परमवीर चक्र हे पदक अस्तित्वात आणलं गेलं. मध्यभागी अशोकस्तंभावरील चार सिंह आणि चार बाजूंना इंद्राच्या वज्राची चार चिन्हं, असं हे पदक सावित्रीबाई खानोलकर या संस्कृत साहित्याची प्रकांड पंडिता असणाऱ्या महिलेने सुचवलं. मेजर जनरल विक्रम खानोलकर या मराठी सेनाधिकाऱ्याची ही पत्नी मूळची स्वित्झर्लंडची होती. तिची आई रशियन आणि वडील हंगेरियन होते. योगायोग पाहा. पठाणी टोळीवाल्यांचा हल्ला उधळून लावून पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरण्याचा अतुल पराक्रम गाजवल्याबद्दल ज्या मेजर सोमनाथ शर्मांना स्वतंत्र हिंदुस्थानचं पहिलं परमवीर चक्र मिळालं, ते मेजर शर्मा सावित्रीबाईंच्या मुलीचे दीर होते. अशा अनेक रोमांचक हकीकतींनी पुस्तक अत्यंत वाचनीय बनलं आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद