माझे शेल्फ
प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची
भीष्मांच्या जीवनाचं चिंतनीय पुनरवलोकन ‘महाभारत’ या महाकाव्याने विविध भाषांतील साहित्यिकांना प्रभावित केलेलं दिसतं. मानवी मनाची, जीवनाची जी अभेद्य व्यूहरचना महाभारतात केली गेली आहे, ती या साहित्यिकांना साद घालते, विचारप्रवृत्त करते. गुजरातीमधील नामंत साहित्यिक ध्रुव भट्ट यांनाही महाभारताने, विशेषत: त्यातील भीष्मांच्या व्यक्तिरेखेने आकर्षून घेतलं आणि त्यातून निर्मिती झाली ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची’ या कादंबरीची. या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे अंजनी नरवणे यांनी. भीष्म ही महाभारतातील एक वंदनीय व्यक्तिरेखा. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या डोळ्यांसमोरून गतजीवनाचा पट सरकतो आहे आणि ते आत्मपरीक्षण करत आहेत, अशी या कादंबरीची कल्पना आहे. वर्तमानकाळ-भूतकाळ-वर्तमानकाळ अशा साखळीतून ही कथा पुढे सरकत राहते. भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी एक होते. गायीचे हरण केल्यामुळे या अष्टवसूंना एका ऋषींनी शाप दिला होता, की पृथ्वीवर मनुष्यजन्माला येऊन तुम्हाला मनुष्ययोनीतील भोग भोगावे लागतील. या शापामुळे घाबरलेले वसू गंगा नदीला शरण गेले. त्यांच्यासाठी गंगेने मनुष्यरूप धारण केलं आणि ती शंतनू राजाची राणी झाली. शंतनू आणि गंगेला सात पुत्र झाले. या सातही बालकांना जन्मानंतर लगेच गंगानदीने पाण्यात बुडवलं. शंतनू राजा वचनबद्ध असल्यामुळे सातही वेळेला तिच्या या कृतीमागचं कारण त्याने विचारलं नाही; पण आठव्या वेळेला मात्र त्याने गंगेला अडवलं; मात्र राजाने तिच्याकडे विचारणा केल्यामुळे ती गुप्त झाली. जन्माला आलेल्या पुत्राला ती बरोबर घेऊन गेली. त्याचं नाव देवव्रत. देवव्रताने परशुरामांकडून शस्त्रास्त्र विद्या संपादन केली. त्यानंतर शंतनूराजाशी त्याची भेट झाली. गंगेने शंतून त्याचा पिता असल्याचं सांगितलं. शंतनू देवव्रताला आपल्याबरोबर हस्तिनापूरला घेऊन गेला. त्यानंतरची कथा सर्वज्ञातच आहे. शंतनूचा सत्यवतीशी विवाह, सत्यवतीला होणारी मुलंच भविष्यात राजगादीवर बसतील, अशी सत्यवतीच्या वडिलांची अट असल्यामुळे देवव्रताने आजन्म अविवाहित राहण्याची आणि राज सिंहासनावर कधीही न बसण्याची घेतलेली प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेमुळेच देवव्रताचा ‘भीष्म’ झाला. त्यानंतर सत्यवतीची मुलं अल्पायुषी ठरल्याने हस्तिनापूरच्या गादीला वारस कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहिले. त्यामुळे सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून देण्याचा एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे सत्यवती-पराशरमुनी यांच्या संबंधांतून जन्मलेल्या व्यासांना पाचारण करणे. सत्यवतीच्या विनंतीनुसार व्यासांनी सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून दिली. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर या व्यासपुत्रांच्या जीवनातील घटना, कौरव-पांडव यांच्या जीवनातील घटना आणि कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडव युद्ध या सगळ्या घटनांमध्ये भीष्मांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळेच द्रौपदीला राजसभेत फरपटत आणण्याचा प्रसंग ते टाळू शकले असते; पण केवळ प्रतिज्ञाबद्धतेमुळे त्यांना तसं करता आलं नाही. पांडवांचा वनवास, अज्ञातवास यालाही ते प्रतिबंध करू शकले नाहीत, कौरव-पांडव युद्धही त्यांना थांबवता आलं नाही. कारण एकच होतं, त्यांची प्रतिज्ञाबद्धता. भीष्मांच्या या प्रतिज्ञा घेण्यामागचं आणि जीवनभर त्याचं दृढतेने पालन करण्याचं कारण काय होतं, तर भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी आठवे वसू होते. परत स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर त्यागमय जीवनच जगायला हवं, सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं, असं त्यांना वाटत होतं; मात्र त्यांच्या या प्रतिज्ञेच्या दृढ पालनामुळे बरेच अनर्थ ओढवले, असा आरोप गंगा, सत्यवती, द्रौपदी, अंबा यांनी भीष्मांवर केला. तेव्हा भीष्मांच्या प्रतिज्ञाबद्धतेभोवती फिरणारी ही कादंबरी एका वेगळ्या पद्धतीने महाभारतातील नाट्य अधोरेखित करते. शरपंजरी पडलेल्या भीष्मांना कृष्ण आत्मचिंतन करायला भाग पाडतो, या प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि महाभारतावरील एक कलात्मक साहित्यकृती वाचल्याचा आनंद देते.