माझे शेल्फ
पुणे : एक साठवण
सुरस पुणेरी बाणा... पुणे आणि पुणेकर हा विषय (पुण्यातल्या) लेखकांचा आवडता विषय आहे. त्यांचा पुणेरी बाणा हा ऐतिहासिक असून दानशूरता हा आध्यात्मिक स्वभाव आहे. बसवाले आणि रिक्षावाले (हमालसुद्धा) यांच्याशी पैशांबाबत तात्त्विक घासाघीस करणे आणि पगडीपासून दगी बंगल्यापर्यंत (स्वत:च्या) जाहीर कौतुक करणे ही स्वभावनिष्ठ सवय आहे. वस्तुनिष्ठ समस्या शब्दनिष्ठ पद्धतीने कशा सोडवाव्यात याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे पुणे आणि पुणेकर. प्रा. श्याम भुर्के (अर्थात पुणेकर) यांनी प्रस्तुत पुस्तकात हेच दिलखुलास (नवल आहे ना?) सांगितले आहे. पहाटे पुण्यातील बागांमधून रामदेवबाबांचे अनुयायी ‘प्राणायाम’ करताना दिसतात. यावर एक विनोद प्रसिद्ध आहे. एकाने मित्राला प्रश्न केला, ‘तू व्यायाम काय करतोस?’ ‘पहाटे फिरायला जातो शुद्ध हवेत.’ ‘त्याचा काही उपयोग नाही.’ ‘का?’ ‘त्यावेळी बाबांचे अनुयायी हवेतला सगळा प्राणवायू खेचून घेतात. मग तुला कुठून मिळणार? असे अनेक किस्से मोठे मजेदार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ अन् स्वातंत्र्योत्तर काळातील गमतीदार आठवणी आहेतच. आधुनिक काळातील ‘चितळ्यांच्या दुकानाच्या वेळा’ हा चर्चेचा विषयही इतर विषयांप्रमाणेच (पुणेकरांच्या फक्त) जिव्हाळ्याचा आहे. हा दुर्मिळ माहितीचा खजिना न-पुणेकरांनाही आवडेल असा सुरस अन् (चमत्कारिक) अद्भुत आहे.