माझे शेल्फ
फॉल्स इम्प्रेशन
जेफ्री आर्चर या लेखकाच्या बहुतेक रहस्यकथा दुर्मिळ चित्राची चोरी व / किंवा विक्री या विषयाभोवती गुंफलेल्या असतात. त्या चित्राची सगळी स्टोरी वाचत जाताना उलगडत जाते. त्याची किंमत आपले डोळे फिरवते. या चित्राची नकल सुद्धा भाव खाऊन गेलेली असते. या प्रवाात असली चित्रकृती आणि त्याची बेमालूम नक्कल व ती ओळखणारी काही खास खुण, अशा दुर्मिळ चित्रांची कला दालने, तिकडे होणारे व्यवहार, काम करणारी चित्र पारखी माणसे, बँका, गुंड , एफ बी आय एजंट, अशा चित्रांसाठी करोडो रुपयाचा खुर्दा करायला तयार असलेले दर्दी, दुर्मिळ चित्राची चोरी होणे , अशा चित्रांचे होणारे लिलाव, तो व्यवसाय करणाऱ्या संस्था, सगळया खंडात कथानकाचा प्रवास, लंडन चे राज घराणे, त्यांची लफडी, त्यांचे कर्जबाजारी होणे, अब्रू झाकून ठेवायचा प्रयत्न, अशा चित्रांचा विमा काढायचा व्यवसाय अशा अनेक बाबी कथानकाची रंगत व रहस्य उत्तरोत्तर वाढवत नेतात. हे पुस्तक सुद्धा याला अपवाद नाही. या कादंबरीत अमेरिकवर झालेल्या मोठ्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची बॅकग्राऊंड, रहस्य अजून वाढवण्यासाठी वापरली आहे. कर्जबाजारी झालेली उमराव घरण्यातली स्त्री. तिच्या कडे वारसा हक्काने असलेले एक अती दुर्मिळ चित्र. त्या चित्रावर डोळा असलेला एक निष्ठूर पण चित्र रसिक बँकर, त्याच्या हाताखाली काम करणारी एक हुशार चित्र तज्ञ, तिने उमराव स्त्रीला तुमचे ते एकच चित्र 50 लाख डॉलर मिळवून देईल हा दिलेला सल्ला. असा सल्ला तिने दिलेला तिच्या बॉसला आवडत नाही व तिला कामावरून काढून टाकले जाते. एक रहस्यमय स्त्री मारेकरी त्या उमराव बाईचा सुरीने गळा कापून खून करते व ते चित्र पळवू नेते. दुसरीकडे एफ. बी.आय चा.एजंट कर्जबाजारी झालेले लोक, त्यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवणारा तो बँकर व त्या व्यक्तींचा खून होणे या घटनेत काही दुवा आहे का शोध घेत असतो. पळवलेले चित्र परत मिळवण्यासाठी कोण कसे प्रयत्न करते व शेवटी ते कोणाला मिळते हा भाग एकदम उत्कंठावर्धक आहे. सुधाकर लवाटे यांनी केलेले मराठी भाषांतर छान आहे .जरूर वाचावी अशी रहस्यकथा !