माझे शेल्फ
फॉर हिअर ऑर टू गो?
राहिले दूर घर माझे... अनेकांना भेटून, त्यांना बोलतं करून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनातली उलघाल जाणून घेऊन अपर्णा वेलणकर यांनी ‘फॉर हिअर, ऑर टू गो’ हे आपलं पुस्तक सिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवणाऱ्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीच्या संर्षाची ही कहाणी म्हणजे म्हणाल तर ‘यशोगाथा’ आहे; म्हणाल तर साता समुद्रपारचं राज्य जिंकूनही मनात होणाऱ्या तगमगीचा अध्याय आहे. अमेरिका म्हटलं की न्यूयॉर्कचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा. अमेरिका म्हटलं की डिस्नेलँड आणि मॅनहटन स्वेकर. अमेरिका म्हणजे अमुक आणि अमेरिका म्हणजे तमुक. मुख्य म्हणजे अमेरिका म्हणजे स्वदेशापेक्षा चांगला देश; कारण अमेरिका म्हणजे पगाराच्या नोकऱ्या. अमेरिका म्हणजे आलिशान घरांत ऐषारामी वास्तव्य आणि अमेरिका म्हणजे भलतं सलतं काहीही करायचं स्वातंत्र्य. मग जेहत्ते काळाच्या ठायी काहीही होवो; आपण आपला देश सोडून अमेरिकेतच जायचं. याचाच कंसातला अर्थ असा होता की, तिथं जाऊन खूप मज्जा मारायची. इकडे जे स्वातंत्र् आई-वडिलांनी, बाहेरच्यांनी मिळू दिलं नाही, ते ओरबाडून घ्यायचं. मग त्यासाठी भले जी किंमत द्यायची असेल, ती आम्ही देणारच. नव्हे तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. ही आणि अशी भावना अनेक देशांतल्या अनेकांच्या मनात अनेकदा जागृत झाली आणि लोक आपापले देश सोडून अमेरिकेच्या दिशेनं धाव घेऊ लागले. भारतात आणि विशेषत: मराठी माणसाच्या मनात ही भावना खऱ्या अर्थानं जागृत झाली. ती १९६०च्या दशकात. याच दशकात ‘खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपत मनाचा हिय्या... एवढ्या भरवशावर या माणसांनी दहा हजार मैलांची उडी मारली. ऐहिक पातळीवर त्यांचं आरपार नवं आयुष्य सुरू झालं. कुणाच्या हाती एकदम पैसा खुळखुळू लागला. तर कुणाला साधं एक बर्गर विकत घेण्यासाठी झाडूपोत्याची कामं करावी लागली. पण तसं ‘इकड’च्या माणसांना कळवायची त्यांची हिंमत नव्हती. कारण घरच्यांच्या-बाहेरच्यांच्या आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या अंतर्मनाच्या एका कोपऱ्यातून झालेल्या विरोधाला तोंड देऊन त्यांनी हे ‘स्थलांतर’ केलं होतं. त्या काळात अमेरिकेत जाणं आजच्या इतकं सोपं नव्हे तर कमालीचं कठीण होतं. आजच्या अमेरिकेतल्याच काय भारतातल्याही तरुणांना त्याची कल्पना येणार नाही. अमेरिकेची स्वप्नं पाहणाऱ्या मराठी माणसाचा आचारविचारांचा आवाका कमालीचा मध्यमवर्गीय होता. शुभंकरोती, दिव्यादिव्या दीपत्कार, आमटीभाताचं किंवा फार झालं तर सोड्याच्या खिचडीचं जेवण आणि वर्षाकाठी राज कपूर वा देव आनंद यांचे दोन सिनेमे या पलीकडे त्याची मजल जायची होती.घराघरांत घुसलेली शेकडो केबल चॅनेल सोडाच, साधा टीव्हीही त्यांनी पाहिलेला नव्हता. सॅटेलाईट फोन्स, थर्ड जनरेशनचे मोबाइल सोडा, त्या त्या घराच्या परिघातही साधी लँडलाईन नव्हती. इंटरनेट सोडाच ‘फोटोकॉपी’चाही (म्हणजे ज्याला आजचे सारेच पुढारलेले लोक ‘झेरॉक्स’ म्हणतात!) शोध लागलेला नव्हता. एकदा अमेरिकेला जाऊन पोहोचलात की इकडचे सारे पाश तुटलेच म्हणून समजा. तरीही अनेक मराठी तरुणांनी या अज्ञाताच्या प्रदेशात उडी घेतली आणि सामोऱ्या आलेल्या अकटोविकट संकटांशी शर्थीनं झुंज देऊन शिवाय वर ‘मराठी बाणा’ ही कायम राखला. हाताला यश आलं. खिशात डॉलर्सच्या चळती, शिवाय बऱ्यापैकी स्थावर-जंगम इस्टेटही त्या विदेशी भूमीवर उभी राहिली. बघता बघता पासपोर्टवर ‘नॅशनॅलिटी’च्या कॉलमात ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’अशी अक्षरं उमटू लागली आणि त्या पाठोपाठ मनाची जीवघेणी उलघाल सुरू झाली. या अमेरिकेत ‘सेटल’ झालेल्या लोकांच्या घरातली दुसरी पिढीही तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी राहिली. इकडचे पाश तुटले होतेच. माणसं नुसती दुरावली नव्हतीच, तर काही दंगावलीही होती... पाऊल थकले, माथ्यावरती जड झाले ओझे... हे इंटरनेटवरून डाऊनलोड करून एकांतात ऐकण्यापलीकडे काही उरलं नव्हतं. अशा लोकांना भेटून, त्यांना बोलतं करून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनातली उलघाल जाणून घेऊन अपर्णा वेलणकर यांनी ‘फॉर हिअर, ऑर टू गो?’ हे आपलं पुस्तक सिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवणाऱ्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी म्हणजे म्हणाल तर ‘यशोगाथा’ आहे; म्हणाल तर साता समुद्रापारचं राज्य जिंकूनही मनात होणाऱ्या तगमगीचा अध्याय आहे. लेखिकेला २००३ सालच्या पहिल्या अमेरिका भेटीतच ही तगमग आणि उलघाल जाणवली होती. वरवरची ऐहिक सुबत्ता मोठी होती आणि त्याचवेळी मनात खूप काही खदखदत होतं. त्यात ‘नोस्टॅल्जिया’ ची भावना होतीच; शिवाय काहीशी अपराधीपणाचीही. विजय तेंडुलकर यांच्याशी अमेरिकतेच झालेल्या गप्पांतून या विषयानं आकार घेतला आणि वेलणकर यांनी जिद्दीनं या विषयावर काम करायचं ठरवलं. पुढं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांच्या निमित्तानं त्या अमेरिकेला जात राहिल्या आणि अधिवेशन संपल्यावरही तिथल्या ‘मराठी माणसां’बरोबर बोलत राहिल्या.