मुखपृष्ठ
राधेय

माझे शेल्फ

राधेय

इंग्रजी शीर्षक
Radheya
सारांश

रणजित देसाई हे नाव मराठी वाचकाला काही नवीन नाही . रणजित देसाईंच मी वाचलेलं हे तिसरं पुस्तक . ह्याआधी स्वामी आणि श्रीमान योगी वाचलं . तस पाहायला गेलं तर स्वामी ही पेशवेकालीन कादंबरी , श्रीमान योगी ही शिवकालीन आणि त्यातल्यात राधेय ही पौराणिक महाभारतकालीन कादंबरी , पण तरीही तीनही काळात रणजित देसाई आपल्याला अगदी सहजपणे,नकळत उचलून घेऊन जातात . त्यामुळे रणजित देसाई ह्यांची लिखाणावरील पकड जाणवते . महाभारतातील उपेक्षित पात्रांपैकी एक म्हणजे कर्ण . ज्येष्ठ कौंतेय असतानाही ज्याला आपले आयुष्य राधेय म्हणून कंठावे लागले असा महारथी . क्षत्रिय असुन ही नीच कुळातील वागणूक सहन करावी लागली असा ज्येष्ठ कौंतेय . साक्षात सुर्यपुत्र असूनही जो सूतपुत्र म्हणून वाढला असा कर्ण . ज्याच्या कर्तुत्वाला साक्षात इंद्रालाही याचकांच्या रांगेत उभं राहावं लागलं असा श्रेष्ठ दान वीर . मृत्यू डोळ्या समोर असूनही ज्याने आपल्या मैत्रीसाठी मृत्यूला कवटाळले असा मित्र . कर्तृत्व आणि दातृत्व ज्याच्या ठायी वसलं आहे असा पराक्रमी , दिग्विजयी वीर. ह्या कर्णाची कथा म्हणजेच राधेय . मृत्युंजय वाचल्यावर कर्णाबद्दल आणखी काही वाचेल अस वाटलं नव्हतं . पण हा गैरसमज रणजित देसाईंच्या राधेय ने खोडून काढला . मृत्युंजय वाचून अगदी भारावून झाल्यानंतर सुरुवातीला राधेय वाचताना जरा पकड सैल झाली होती पण पाना मागे पानं सरताना मी ही हस्तीनापुर , कुरुक्षेत्रावर आहे अस जाणवायला सुरुवात झाली . लेखकांनी कादंबरीला युद्धातील कर्ण पर्वा पर्यंत अतिशय वेगवान घटनाक्रम दिला आहे . द्युत व द्रौपदी वस्त्रहरण वगळता कोणतीही घटना किवा प्रसंग जास्त लांबवला नाही . शिशुपाल वध , कीचक वध , गंधर्व युद्ध , विराट युद्ध , पांडवांचा वनवास व अज्ञातवास सगळंच अगदी कमी ओळींत व पानांत संपवलं आहे . कादंबरी कर्णाबद्दल असल्यामुळे लेखकांचे तसं करणही योग्य आहे . कर्णा बद्दल घडलेल्या गोष्टींना अधिक उजाळा देण्याचा काम केलं आहे . कर्णाच्या पात्राची उंची वाढवण्यासाठी इतर पात्रांची उंची कुठे तरी कमी केली आहे अस उगीच जाणवते . पण लेखकांची प्रतिभासंपन्न लेखणी त्या बद्दल दुमत जाणवू देत नाही . कादंबरी वाचल्यावर कर्ण हा महाभारता पुरता मर्यादित न राहता तो आपलासा वाटतो . तो आपल्या आजूबाजूला आहे असच कायम जाणवत राहतं . प्रत्येकाच्या आतमध्ये एक कर्ण दडलाय अस वाटतं . तो कर्ण कायम उपेक्षित राहिला , जातीव्यवस्थेने ग्रासलाय अस भासतं . कादंबरीची सुरुवात होते ती चंपनगरी पासून जिथे कृष्ण - कर्ण भेट घडते . मग त्या पुढे द्रौपदी स्वयंवर , इंद्रप्रस्थ राज्य , मय सभा , द्यूत , वनवास सगळ सुरू होतं . कादंबरीतील काही वाक्य रचना अगदीच सुंदर आहे .महाभारतकालीन छोट्या छोट्या प्रसंगातून आजच्या मानव जीवनाचे वास्तविक दर्शन व तत्वज्ञानाची सांगड लेखकांनी घालून दिली आहे . महाभारत लेखी क्षुल्लक असणारे पात्र वृषाली , अधिरथ , चक्रधर हे सुद्धा महत्वाचे भासतात . मृत्यूंजय व राधेय वाचल्यानंतर काही प्रसंगाची वेळ मागेपुढे झाल्यासारखे वाटते . द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग झाल्यानंतर कृष्ण तिथे उपस्थित होता का ? राधेय मधे ह्यांच उत्तर हो असं तर मृत्युंजय मधे नाही असं मिळतं . पण तुलना न करता वाचल्या तर दोन्हीही कलाकृती ह्या साहित्याच्या उत्कृष्ट नमुना आहेत हे जाणवतं . कर्ण कितीही पराक्रमी , श्रेष्ठ , दान वीर असला तरीही तो अधर्माची कास धरणारा होता . आणि अधर्माचा शेवट हे त्रिकालसत्य आहे . धर्माच्या प्रस्थापने साठी अधर्माने लढल्या गेलेल्या धर्मयुद्धात कर्ण खर्ची पडला ते केवळ आपल्या मैत्री निष्ठेसाठी . युद्धात पांडवांचा साथ देऊन हस्तीनापुरचा सम्राट होणं , जिच्या अहंकाराचा जो कायम शिकार झाला अशा द्रौपदीला स्वतःची पत्नी बनवणं त्याच्यासाठी कठीण नव्हत. पण मैत्री निष्ठेने त्याला अधर्मा ची साथ द्यावी लागली . जन्मतः ज्या आईने त्याला पाण्यात सोडलं त्या आईने युद्धाच्या चाहुलीने आपल्या मुलांच्या जीवाचं दान मागितलं . ज्या दान वीराने आपल्या दातृत्वाने इंद्रालाही आपला याचक बनवलं तो दान वीर आईला कसं दाना पासून परावृत्त करेल . त्या विराने तुझे ५ पुत्र जिवंत राहील असे दान दिलं . पण युद्ध भूमीत ज्येष्ठ कौंतेय हा पांडव कसा होईल ह्या कल्पनेने त्याने अर्जुना समोर शरणागती पत्करली . आई तुझे पाच पांडव सुखरूप आहेत , ज्येष्ठ कौंतेय हा पांडव नाही तो शेवट पर्यंत राधेय च असुदे म्हणत ह्या सूर्याचा अस्त झाला . कर्ण ही केवळ एक व्यक्तिरेखा नसून एक मनोवृत्ती आहे . आयुष्याच्या शेवटपर्यंत जो उपेक्षित राहिला , साक्षात सूर्याचं तेज घेऊन जन्मणारया त्या सुर्यपुत्राला कायम उपेक्षितरुपी अंधारात च जीवन अर्पण करावं लागलं . शेवटाला सूर्य सुद्धा अस्त होतो पण तो पुन्हा नव्याने उगवण्या साठी .

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद