माझे शेल्फ
राजा रवि वर्मा
राजा रवि वर्मा ह्या विख्यात चित्रकाराची हा जीवनप्रवास.... कादंबरी खिळवून ठेवते.... आपण रवि वर्माच्या कथेतइतके गुरफटत जातो की जणू त्यातले एक पात्र. रणजित देसाई सरांनी ह्या कादंबरी साठी पाच वर्षे अभ्यास केल्याचे , देशाविदेशात फिरून माहिती गोळा केल्याचे म्हटले आहे ते अगदी यथार्थ वाटते... एकूणात रवि वर्मा ह्यांचा प्रवास दाखविताना जे विस्तृत लेखन केलेलं आहे ते अफाट अभ्यास करूनच शक्य आहे. चित्र , रंग आणि चित्रकला ह्यांचाही अभ्यास प्रचंड कमाल आहे... अगदी बारीक बारीक सांगायचे झाल्यास पूर्वी रंग खलून तयार केले जात मग विदेशातून तैल रंग येऊ लागले ... हा सगळा प्रवास कमाल रेखाटला आहे. अगदी एक उदाहरण द्यायचे झाल्यास एके ठिकाणी ब्राउन ते ब्लॅक मधील अनेक रंगछटांचा उल्लेख केला आहे... तो पाहून आपण थक्क होतो. अप्रतिम सुंदर , विख्यात असणारी त्यांची काही निवडक चित्रे देखील समाविष्ट केलेली आहेत. कलाकाराचे कलेच्या रंगात न्हाऊन जाणे, त्याच्यावर लुब्ध होणाऱ्या स्त्रिया, सर्वसामान्य आणि जुनाट विचारसरणीची बायको... सगळं अगदी सहज मांडल आहे. मामाचा मृत्यू, आईचा आणि धाकट्या भावंडांचा मृत्यू प्रसंग कमाल चितारला आहे . हिंदू देवदेवतांची विटंबना केली असा आरोप ठेऊन लावलेला खटला आणि त्याचे यशस्वीपणे केलेले खंडन अप्रतिम आहे. "नग्नता ही पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते" हे राजा रवि वर्मा इतक्या प्रभावीपणे मांडतात की आहा! चित्रकाराच्या आयुष्यात मॉडेल म्हणून येणाऱ्या अलौकिक सौंदर्यवतीबाबत कुठलेही पुरुष म्हणून आकर्षण न वाटण इतकं कलाकार म्हणून स्थिर असणं कमाल आहे. देहापलीकडची ओढ अतिशय सुंदर वाचकांपुढे ठेवली आहे. थोडक्यात, जरूर जरुर वाचा.