माझे शेल्फ
रेड टेप
दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर काल्पनिक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते. बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे. या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे. कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. ‘रेडटेप !’.